घरमुंबईमनसे मॅजिक फ्लॉप, शेवाळे टॉप

मनसे मॅजिक फ्लॉप, शेवाळे टॉप

Subscribe

दक्षिण मध्य मतदारसंघात शिवसेनेचे राहुल शेवाळे आणि काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांच्यात सुरूवातीच्या टप्प्यात काही हजार मतदानाचा फरक होता. मतमोजणीत राहुल शेवाळे यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली असली तरीही एकनाथ गायकवाड यांना झालेल्या मतदानाने राहुल शेवाळे यांच्या मतदानाच्या आकडेवारीचा सातत्याने पाठलाग केला. पण दुपारनंतर काही हजारात असणारी आकडेवारी नंतर लाखात पोहचली.

जसजशा मतमोजणीच्या फेर्‍या वाढू लागल्या तसतसी मताधिक्यातील दरी मात्र वाढत गेली. २०१४ च्या मतदानापेक्षा यंदा राहुल शेवाळे यांना मोठ्या प्रमाणात मतदान झाले. गेल्या निवडणुकीत मनसेने दक्षिण मध्य मतदारसंघात चांगली मजल मारली होती. पण यंदा मतदारसंघात मनसेकडून काँग्रेसला पाठिंबा देण्यात आला होता. त्यामुळे एकनाथ गायकवाड यांना याचा फायदा होईल अशी अपेक्षा केली जात होती. पण प्रत्यक्षात मात्र राहुल शेवाळे यांनाच यंदा मतदारांनी पसंती दिली अशीच राहुल शेवाळे यांच्या मतदानाची आकडेवारी बोलते.

- Advertisement -

राहुल शेवाळे यांना विसाव्या फेरीनंतर ४ लाख २३ हजार ७४३ इतक मतदान झाले. तर एकनाथ गायकवाड यांना २ लाख ७२ हजार ३९३ मतदान झाले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा मनसेची अनुपस्थिती ही राहुल शेवाळे यांच्या मताधिक्क्यात वाढ करण्यासाठी कारणीभूत ठरली आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय भोसले यांनीही मतदारसंघात आपला प्रभाव पाडला आहे. संजय भोसले यांना ६३ हजार २५६ इतके मतदान झाले आहे. धारावी, चेंबूर, चिताकॅम्प, अणुशक्तीनगर यांसारख्या भागातूनही भोसले यांच्यावर मतदारांनी विश्वास दाखवला आहे. गेल्या लोकसभेत जसा आपच्या उमेदवाराला जनतेने मतदान केले होते, तसाच पॅटर्न यंदा भोसले यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या निमित्ताने दिसून आला आहे. मनसेची मते कुणाला जाणार? काँग्रेसला मनसेच्या पाठिंब्याच्या फायदा होणार का? या सगळ्या चर्चेत शिवसेना मात्र भाव खाऊन गेली.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -