घरमुंबईमोनोरेल प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे

मोनोरेल प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे

Subscribe

मोनोरेलच्या कोचला दोन वर्षापूर्वी लागलेल्या आगीच्या घटनेतून कोणताही धडा न घेता घाईघाईने मोनोरेलचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांच्या मदतीसाठी आणि मोनो ट्रेनमधून बाहेर काढण्यासाठी एमर्जन्सी फायर ईव्हॅक्युएशन सिस्टिम तयार करण्याचे आदेश मोनोरेलला मुंबई अग्निशमन दलामार्फत देण्यात आले होते. पण चार वेळा निविदा प्रक्रिया राबवूनही एकदाही या सिस्टिमसाठी सल्लागार नेमण्याच्या निविदेला प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे मोनोरेल प्रवाशांची सुरक्षा आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीचा पर्याय हा रामभरोसेच आहे.

ज्याठिकाणी अग्निशमन दलाची शिडी पोहचणार नाही अशा ठिकाणी एमर्जन्सी फायर ईव्हॅक्युएशन सिस्टिम तयार करण्याचा सल्ला मोनोरेल चालविणार्‍या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ला देण्यात आला होता. मोनोरेलच्या चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक (जेकब सर्कल, महालक्ष्मी) दरम्यान अनेक अशी ठिकाणी आहेत जिथे रस्त्यावरून फायर ब्रिगेडची शिडी मोनोरेलच्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी पोहचणे शक्य नाही. त्यामध्ये माहुल खाडी परिसर यासारख्या ठिकाणांचा समावेश आहे. पण चार वेळा राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेसाठी एमएमआरडीएला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. एका सिंगापुरच्या कंपनीने या सिस्टिमसाठी रस दाखवला होता. पण एमएमआरडीला हा खर्च न परवडण्यासारखा नसल्यानेच ही प्रणाली स्विकारण्यासाठी प्राधिकरणाने नकारघंटा वाजवली.

- Advertisement -

आगीसारख्या घटना रोखण्यासाठी सध्या मोनोरेलच्या मार्गावर तसेच स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे जाळे बसविण्यात आले आहे. तसेच मोनो ट्रेनच्या चाकातही स्मोर डिटेक्टर्स बसविण्यात आले आहेत. आगीसारख्या घटनांमध्ये तत्काळ निर्णय घेणे शक्य होईल असा विश्वास एमएमआरडीएच्या अधिकार्‍यांना वाटतो. सध्याच्या मोनोरेलच्या सुरक्षिततेच्या यंत्रणेत तीन पद्धतीने प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात येते. आपत्कालीन स्थितीत जमिनीपासून बूमलिफ्टचा वापर करून प्रवासी बाहेर काढण्याचा एक पर्याय आहे. दुसर्या पर्याया अंतर्गत ट्रेन टू ट्रेन पद्धत वापरतात. एकाच ट्रॅकवर दुसरी मोनोरेल आणून त्यामध्ये प्रवासी स्थलांतरीत करण्यात येतात, तर तिसर्या पद्धतीत एक मोनो ट्रेन दुसर्या ट्रेनने खेचून नेण्यात येते. फायर ईव्हॅक्युएशन सिस्टिमअंतर्गत एस्केप शुट्सचा वापर मोनोरेलसाठी करण्याचा प्राधिकरणाचा मानस आहे. या एस्केप शूटचा वापर करून प्रवासी बाहेर काढणे शक्य होईल. यासारख्या अनेक पर्यायासाठीच एमर्जन्सी फायर ईव्हॅक्युएशन सिस्टिमसाठी सल्लागाराची नेमणुक होणे गरजेचे आहे असे एमएमआरडीएच्या अधिकार्‍यांना वाटते. याआधी ८ नोव्हेंबर २०१७ रोजी मोनोरेलच्या कोचला पहाटेच्या वेळेत लागलेल्या आगीमुळे मोनोरेलच्या सुरक्षेचा प्रश्न अतिशय प्रकर्षाने पुढे आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -