घरमुंबईमुंबईतील पत्रकारांची उद्या निदर्शने; शशिकांत वारीशे हत्येचा निषेध

मुंबईतील पत्रकारांची उद्या निदर्शने; शशिकांत वारीशे हत्येचा निषेध

Subscribe

मुंबईः रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांची झालेली निर्घृण हत्या आणि राज्यातील पत्रकारांवर दिवसेंदिवस होत असलेले हल्ले या सर्व घटनांचा निषेध करण्यासाठी उद्या, शुक्रवारी १० फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी २.०० वाजता मुंबईतील पत्रकार काळ्या फिती लावून मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ मूक निदर्शने करणार आहेत.

गुरुवारी मुंबईतील पत्रकारांच्या विविध संघटनांची बैठक मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वार्ताहर कक्षात पार पडली. या बैठकीत मूक निदर्शन करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. मुंबईतील पत्रकार संघटनांनी या निदर्शनामध्ये सहभागी व्हावे, असे सर्व संघटनांच्या प्रमुखांनी आवाहन केले आहे.

- Advertisement -

शशिकांत वारीशे निर्घृण हत्या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा. वारीशे यांची हत्या करणारा पंढरीनाथ आंबेरकर याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्याला मकोका लावावा आणि हा खटला चालविण्यासाठी विशेष सरकारी वकील नियुक्त करावेत आणि वारीशे यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता त्यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपये मदत सरकारने द्यावी, आदी मागण्या करण्यावर बैठकीत एकमत झाले.

रिफायरनी प्रकल्पाला विरोध म्हणून वारीशे यांची हत्या करण्यात आली. यातील आरोपी पंढरीनाथ आंबेकरला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा सर्वस्तरातून निषेध होत आहे. मुंबईतील पत्रकारांनीही याचा निषेध नोंदवण्यासाठी काळ्या फिती लावून मूक निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

या बैठकीला मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, मुंबई मराठी पत्रकार संघाच्या विश्वस्त राही भिडे, अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे, संयुक्त कार्यवाह विष्णू सोनवणे, बीयूजेचे इंदरकुमार जैन, मंत्रालय-विधीमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, कार्यवाह प्रवीण पुरो, भगवान परब, म्हाडा पत्रकार संघाचे अध्यक्ष दीपक पवार, मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव दीपक कैतके, अध्यक्ष राजा अदाटे, महानगर पालिका वार्ताहर संघाचे श्रीरंग सुर्वे, मुंबई क्राईम रिपोर्टर असोसिएशनचे अध्यक्ष विशाल सिंह, आशिष सिंह, पत्रकार सुधाकर काश्यप, नाणार रिफायनरी विरोधी आंदोलनातील नेते सचिन चव्हाण, नरेंद्र जोशी आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -