घरताज्या घडामोडीमोठी बातमी! येत्या २-३ दिवसांत लोकल सर्वांसाठी सुरू करण्याबाबत निर्णय - विजय...

मोठी बातमी! येत्या २-३ दिवसांत लोकल सर्वांसाठी सुरू करण्याबाबत निर्णय – विजय वडेट्टीवार

Subscribe

मुंबईत फक्त महिलांसाठी आजपासून लोकल प्रवास सुरू झाला. सकाळी ११ ते दुपारी ३ आणि संध्याकाळी ७ पासून रात्री शेवटची लोकल जाईपर्यंत महिलांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यापाठोपाठ लोकल सगळ्यांसाठी कधी सुरू होणार? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. मुंबईकरांकडून लोकल लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी वारंवार केली जात असताना राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भात एक मोठी घोषणा केली आहे. मुंबईत महिलांसाठी लोकल प्रवास सुरू झाल्यानंतर आता सगळ्यांसाठीच लोकल प्रवास सुरू करण्यासंदर्भात येत्या २ ते ३ दिवसांत निर्णय होणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे तब्बल ७ महिन्यांनंतर सामान्य मुंबईकरांना लोकल प्रवासाचा पर्याय खुला होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात आज एक महत्वाची बैठक राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाच्या प्रतिनिधींमध्ये झाली असून त्यामध्ये या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

मुंबईत महिलांसाठी लोकल प्रवास विशिष्ट वेळेत सुरू झाल्यानंतर आता सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकल प्रवास कधी सुरू होणार? असा प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तरात ही माहिती दिली. ‘हा निर्णय लगेच होणार आहे. पुढच्या २-३ दिवसांत यासंदर्भातल्या निर्णयावर शिक्कामोर्तब होईल. यासाठी सगळ्या संघटनांशी चर्चा करत आहोत. त्यासंदर्भात गाड्यांची संख्या, प्रवाशांची संख्या यांचा अंदाज घेत आहोत. मुंबईकरांना या निर्णयासाठी फार वाट पाहावी लागणार नाही. वेगवेगळ्या इंडस्ट्रीसाठी वेगवेगळ्या वेळा असतात. असंघटित क्षेत्रासाठी कामाच्या वेळा वेगळ्या असतात. त्यासंदर्भात आढावा घेऊन निर्णय घेतला जाणार आहे’, असं वडेट्टीवार म्हणाले.

- Advertisement -

आजपासून महिलांसाठी लोकल प्रवास

सर्वच महिलांना रेल्वे प्रवासाची परवानगी देण्यावरून गेल्या चार दिवसांपासून निर्माण झालेला तिढा मंगळवारी सुटला. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी २१ ऑक्टोबरपासून सर्वच महिलांना रेल्वे प्रवासाची परवानगी देत असल्याचा निर्णय मंगळवारी जाहीर केला. त्यामुळे आजपासून सर्व महिलांना रेल्वेप्रवास करता येणार आहे. रेल्वे प्रशासनाने सांगितल्यानुसार, सकाळी ११ ते दुपारी ३ आणि सायंकाळी ७ नंतर शेवटची उपनगरी रेल्वे सुटेपर्यंत सर्वच महिलांना रेल्वे प्रवासाची मुभा असेल. या दरम्यान प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांचे फक्त तिकीट ग्राह्य धरले जाईल. त्यांना क्यूआर कोड ई-पासची आवश्यकता देखील नसणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -