घरमुंबईMumbai Water : मुंबईकरांवरील पाणी संकट टळले; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Mumbai Water : मुंबईकरांवरील पाणी संकट टळले; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Subscribe

मुंबई : राज्य शासनाने मुंबईसाठी अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध केला आहे. त्यामुळे आता मुंबईकरांवर ओढवलेले पाणी कपातीचे संकट टळले आहे. याबाबतची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विधिमंडळ अधिवेशनात केली. (Mumbai Water crisis averted for Mumbaikars Announcement of Chief Minister Eknath Shinde)

हेही वाचा – Politilcs : ‘सत्तेच्या मलिद्यासाठी एकत्र आलेले बोके…’; शिवेसना आमदारांच्या वादानंतर ठाकरे गटाची टीका

- Advertisement -

राज्य शासनाने हमी दिल्यामुळे मुंबईच्या पाणीपुरठ्यातील 1 मार्चपासून लागू होणारी 10 टक्के कपात आता रद्द करण्यात आली आहे. शासन मुंबईसाठी मागणी केल्यानुसार जरी अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध करीत असेल तरी नागरिकांनी पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा, असे आवाहन मुंबई महापालिका जल अभियंता खात्याचे प्रमुख पुरुषोत्तम माळवदे यांनी केले आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावातील एकूण पाणीसाठा 45 टक्क्यांवर घसरला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा बाष्पीभवन, जलवाहिन्या फुटणे, गळती, पाणी चोरी आदींमुळे पाणीसाठा 5 टक्के कमी झाला आहे. त्यातच पावसाचा लहरीपणा पाहता मुंबई महापालिकेने नियमित पावसाळा सुरू होईपर्यंत मुंबईकरांना आवश्यक पाणीपुरवठा करण्यासाठी दैनंदिन पाणी पुरवठ्यात 10 टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्याची अंमलबजावणी 1 मार्चपासून करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईसाठी अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध करण्याबाबत हमी देत विधिमंडळ अधिवेशनात मुंबईकरांवरील पाणी संकट टळल्याचे जाहीर केले. आता मुंबईवरील पाणी कपातीचे संकट टळले असून त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Rahul Gandhi : मोदी, ठाकरेंनंतर आता राहुल गांधीही काळारामाच्या दर्शनाला

दरम्यान, मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तानसा, मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, विहार आणि तुळशी या सात तलावधून दररोज 3,850 दशलक्ष लिटर तर ठाणे व भिवंडी या महापालिकांनाही दररोज 150 दशलक्ष लिटर इतक्या पाणी पुरवठा करण्यात येत आहे. सध्या या सात तलावात आज सकाळपर्यंत 6 लाख 48 हजार 535 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा आहे. तलावातील सध्याचा पाणीसाठा पाहता मुंबईला पुढील 5 महिने 12 दिवस म्हणजे पुढील 4 ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे. त्यामुळेच मुंबई महापालिकेने शासनाकडे अतिरिक्त 2 लाख 30 हजार 500 दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची मागणी केली होती. त्यानुसार राज्य शासनाने मुंबईसाठी अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -