घरमुंबईमुंबईचे सोनू-मोनू; मालाडचे अजय-अतुल म्हणून प्रसिद्ध

मुंबईचे सोनू-मोनू; मालाडचे अजय-अतुल म्हणून प्रसिद्ध

Subscribe

बेंजो म्हणजे स्फूर्ती...वातावरणात उत्साह निर्माण करणारे संगीत. परंतु, सगळ्याच बेंजो पार्टीला हे कसब जमेलच असे नाही. अनेक बेंजो कर्णकर्कश पद्धतीने वाजविले जातात. याला अपवाद ठरवत मुंबईचा खरा बेंजोवाला होण्याचे काम सोनू-मोनू यांनी केले आहे.

बेंजो म्हणजे स्फूर्ती…वातावरणात उत्साह निर्माण करणारे संगीत. परंतु, सगळ्याच बेंजो पार्टीला हे कसब जमेलच असे नाही. अनेक बेंजो कर्णकर्कश पद्धतीने वाजविले जातात. याला अपवाद ठरवत मुंबईचा खरा बेंजोवाला होण्याचे काम सोनू-मोनू यांनी केले आहे. रहीम आणि करीम शेख या जुळ्या भावंडांची नावे आहेत.अंगी कला असेल तर आयुष्याला कलाटणी मिळते. हेच सोनू-मोनू या मुंबईच्या बेंजो पार्टीवाल्या स्थानिक संगीतकारांनी दाखवून दिले आहे. घरची गरिबी, मोठे कुटुंब, कमी शिक्षण, एक वेळची खायची भ्रांत यावर मात करत सोनू-मोनू आज मालाडचे अजय-अतुल म्हणून प्रसिद्ध पावले आहेत. म्हणूनच त्यांच्या बेंजो पार्टीला गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, लग्न, पार्टी याला मोठ्या प्रमाणावर मागणी मिळत आहे.

- Advertisement -

सोनू-मोनू मालाडमध्ये लहानाचे मोठे झाले. इयत्ता सातवीपर्यंत शिकले. वयाच्या अकराव्या वर्षांपासून छोट्या नोकर्‍या केल्या. 25 रुपये रोजंदारीवर काम केले. परंतु, वाजवण्याचे उपजतच ज्ञान त्यांना होते. मालाडच्या आप्पापाडा येथे एक बेंजो पार्टी होती. वयाच्या बाराव्या वर्षी दोघांनी तिथे प्रवेश मिळवला. काम करता करता बेंजो वाजवण्याचे बारकावे त्यांनी आत्मसात केले. तिथून ते सुनील कटरे यांच्या पार्टीत सामील झाले आणि तिथूनच ते प्रसिद्ध झाले. त्यांचा पेहराव, जुळवेपण, वाजवण्याचा जोश याची भुरळ लोकांना पडू लागली. यानंतर 2005 साली त्यांनी सचिन पटेल, नागेश सुर्वे, तुषार मालप, दिनेश जाधव, शंकर आडाम, धर्मेश धवारे, कपिल प्रभू, राजेश पटेल, दिलीप गाडे यांच्या सोबतीने सोनू-मोनू बिट्स या नव्या ग्रुपची स्थापना केली. सुरुवातीला भाड्याने साहित्य घेऊन वाजवले. एकदा भाड्याने साहित्य घेतले असता त्यातील थोडेसे सामान हरविले. त्यावेळी मालकाने त्यांचा अपमान केला. तुमची लायकी नाही, असे मालक म्हणाला.

ही बाब जेव्हा त्यांच्या आईला समजली तेव्हा तिने स्वतःचे दागिने विकले आणि त्यांना बेंजोचे साहित्य विकत घेऊन दिले. यानंतर मागणी वाढू लागली. दिवस पालटले. रस्त्यावर वाजवणारे सोनू-मोनू आता स्टेजवर वावरू लागले. रुपये तीन हजारांची ऑर्डर घेणारे हे बंधू आता तीन लाखांवर पोहोचले आहेत. भाड्याच्या घरात राहणार्‍या सोनू-मोनूने स्वत:ची दोन घरे खरेदी केली आहेत. त्यांनी ‘खुदा गवाह’ चित्रपटातील ‘खुदा गवाह…खुदा गवाह…’आणि ‘चोली के पिछे’ या ‘खलनायक’ चित्रपटातील गीताची धून मोहल्ला मोहल्लात, नाक्यानाक्यावर प्रचंड लोकप्रिय केली.

- Advertisement -

डिजेच्या जमान्यात बेंजोला आले चांगले दिवस
आजच्या डीजेच्या जमान्यात बेंजो पार्टींना चांगले दिवस आणण्याचे काम सोनू-मोनू करत आहेत. तर याच सोनू-मोनूना वाईट दिवसात तारण्याचे काम बेंजोने केले होते. आज याच उपकाराची परतफेड करत हे दोघे भाऊ बेंजोला लोकप्रिय करत आहेत.

डिजिटल मार्केटिंग
यु ट्युबला त्यांच्या व्हिडीओला आतापर्यंत 10 लाखांपेक्षा जास्त व्युवर्स मिळाले आहेत. हा व्हिडीओ मुंबई म्युझिकल आर्ट्स या संगीताला वाहिलेल्या डिजिटल चॅनेलने अपलोड केला आहे. लोकप्रियता वाढल्याने 2015 साली त्यांना चिंचपोकळीच्या चिंतामणीची ऑर्डर मिळाली. मुंबईतील मानाचा गणपती असल्याने सोनू-मोनूचे प्रस्थ वाढत गेले. 2014 साली त्यांच्या ग्रुपमधील जतीन पेडणेकरने डिजिटल मार्केटिंगला सुरुवात केली. जतीनने फेसबुक, यु ट्यूबवर तरुणाईशी सोनू-मोनू बिट्सला जोडण्याचे काम केले आहे.

कोकणपट्ट्यातही लोकप्रियता
कोकणपट्ट्यातही सोनू-मोनूला लोकप्रियता लाभली आहे. कोकणातील अनेक भागांत आम्ही गेल्याचे त्यांनी सांगितले. राज्याबाहेरही त्यांनी कार्यक्रम केले आहेत. आता सातासमुद्रापार जायचे असल्याचे त्यांनी सांगितले.

लहानपणापासून आम्हाला संगीताची आवड होती. शाळेत बाकावर, घरी डब्यावर आम्ही संगीत वाजवण्याचा प्रयत्न करायचो. तीच आवड आम्हाला या प्रसिद्धीकडे घेऊन आली आहे. अनेक संकटे मागे सारत आम्ही हा रस्ता पार केला आहे. घरच्या परिस्थितीमुळे शिक्षण सोडावे लागले याची खंत वाटते. माझ्या यशस्वी होण्यामागे बँडमधील प्रत्येक सदस्याचा हात आहे. ते नसते तर आम्ही इथपर्यंत पोहोचलोच नसतो   – सोनू शेख

आम्ही खूप हलाखीच्या दिवसात आयुष्य काढले. मुलांना योग्य शिक्षण देऊ शकलो नाही. पण सोनू-मोनूने केलेली मेहनत रंगत आणत आहेत. प्रेक्षकांनी दाद दिली म्हणून ते आज या स्तरावर पोहोचले आहेत. मनात आणलं तर तुम्ही काहीही करू शकता. – कमरुद्दीन शेख – सोनू-मोनूचे वडील

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -