घरमुंबईउपायुक्त 'टाटा चेंबर्स'चा सदस्य असल्यानेच 'ताज'ला कोट्यवधींची खैरात

उपायुक्त ‘टाटा चेंबर्स’चा सदस्य असल्यानेच ‘ताज’ला कोट्यवधींची खैरात

Subscribe

पालिका विरोधी पक्ष नेते रवी राजा यांचा गंभीर आरोप  'त्या' उपायुक्ताच्या नावाची करणार पोलखोल

एखाद्या गरीब, सामान्य नागरिकाने रस्ते, पदपथावर जर अतिक्रमण केल्यास पालिका तात्काळ त्यावर तोडक कारवाई करते. मात्र महापालिकेचा एक उपायुक्त ‘टाटा चेंबर्स’चा सदस्य असल्याने ताज हॉटेलसमोरील रस्ता, पदपथ सुरक्षिततेच्या नावाखाली आपल्या ताब्यात ठेवणाऱ्या ताज हॉटेलला ८ कोटी ५० लाख रुपयांची सूट देण्याचा घाट प्रशासनाकडून घालण्यात आला आहे, असा खळबळजनक आरोप पालिका विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केला आहे. आगामी स्थायी समितीच्या बैठकीत या उपयुक्ताचे नाव आपण जाहीर करणार असल्याचे रवी राजा यांनी म्हटले आहे.

२६ नोव्हेंबर २००८ ला पाकिस्तानी अतिरेक्यांनी ताज हॉटेलवर भीषण हल्ला केला होता. त्यात ३१ नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी ताज हॉटेलवर पुन्हा हल्ला होण्याची शक्यता वर्तविल्याचे निमित्त करीत ताज हॉटेल व्यवस्थापनाने ताज समोरील रस्ता व पदपथ गेल्या काही वर्षांपासून आपल्या कब्जात ठेवला असून त्याचा सर्रासपणे वापर ताज हॉटेलकडून करण्यात येत आहे. तर सामान्य नागरिकांना ताज समोरील जागा बंदिस्त करून फिरकण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यावर पालिकेने सदर रस्ता व पदपथ वापरत असल्याने ताज कडून ८.५० कोटी रुपये वसुलण्याचे आदेश २०१५ ला तत्कालीन आयुक्तांनी दिले होते. मात्र प्रशासनाने आजपर्यंत ते पैसे वसूल केलेले नाहीत. उलट पालिका प्रशासनाने, ताज हॉटेलकडून देय असलेली ८.५० कोटी रुपयांची रक्कम माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, ताजला रस्ता वापरापोटी दरमहा देय असलेल्या शुल्कातही ५०% सूट देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

- Advertisement -

यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी आला असता सदर प्रस्ताव विनाचर्चा प्रशासनाकडे परत पाठविण्यात आला आहे. आता हा प्रस्ताव पुन्हा पुढील बैठकित मंजुरीसाठी येणार आहे. त्यावर जोरदार चर्चा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मात्र, पालिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी, ताज हॉटेलला ८.५० कोटी रुपये का माफ केले जात आहेत, याचे कारण सुस्पष्ट केले आहे. मुंबई महापालिकेचा एक उपायुक्त तब्बल १ कोटी रुपयांपर्यंत सभासद शुल्क असलेल्या ‘टाटा चेंबर्स’ संघटनेचा सदस्य असल्यानेच ताजवर पालिकेकडून ही मेहरबानी केली जात असल्याचा गौप्यस्फोट केला.

संबंधित अधिकारी या चेंबर्सचा सदस्य झाला आहे. हा अधिकारी या चेंबर्सचा सदस्य असल्याने पालिका प्रशासनाने ताज हॉटेलला सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. ताज हॉटलकडे पैशांची कमतरता नाही. ते पालिकेचे शुल्क भरू शकतात. आज कोरोनामुळे पालिका प्रशासनाची आर्थिक परिस्थीती खराब झाली आहे. अशावेळी ताज हॉटेलसारख्या मोठ्या हॉटेलला शुल्कात कोट्यवधी रुपयांची सूट देणे योग्य नसल्याचे रवी राजा यांनी म्हटले आहे. पुढील बैठकीत याबाबतचा प्रस्ताव आल्यास त्याला विरोध केला जाईल, तसेच बैठकीत या अधिकाऱ्याचे नाव घोषित करू असेही रवी राजा यांनी सांगितले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -