घरमुंबईठाण्यातील 'या' पक्षाच्या नगरसेवकांचा बुलेट ट्रेनला विरोध?

ठाण्यातील ‘या’ पक्षाच्या नगरसेवकांचा बुलेट ट्रेनला विरोध?

Subscribe

बुलेट ट्रेनसाठी ठाण्यातील आरक्षित जागांना धक्का लागू न देण्याचा पवित्रा ठाण्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी घेतला आहे.

महापालिकेच्या आरक्षित जमिनीवरून जात असलेल्या बुलेट ट्रेनला राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक महासभेत विरोध करतील, असा इशारा माजी खासदार आणि राष्ट्रवादीचे शहर जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.

एकीकडे मध्य रेल्वे रडत रखडत चालली आहे. उपनगरी रेल्वे सुविधांचा विस्तार करण्याबाबत रेल्वे प्रशासन उदासिन आहे. मात्र दुसरीकडे बुलेट ट्रेनबाबत मात्र उत्सुकता दाखवली जात आहे. हा दुटप्पीपणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

- Advertisement -

आरक्षण फेरबदलांच्या प्रस्तावाला विरोध

आनंद परांजपे यांनी दिलेल्या माहितीनुसार बुलेट ट्रेनसाठी ठाणे महापालिका क्षेत्रातील ३६.६२ हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. मात्र ही जागा विकास आराखड्यात शाळा, पोलीस ठाणे, प्रभााग समिती कार्यालय विविध प्रकल्पांसाठी आरक्षित असल्यामुळे आरक्षणांमध्ये फेरबदल करावे लागणार आहेत. या संदर्भात राज्य शासन स्तरावर एक बैठकही झाली होती. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये महापालिकेने जागा आरक्षण फेरबदलांचा प्रस्ताव तयार केला होता. तो सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीला आणण्यासाठी महापौरांकडे पाठविलाही होता. मात्र या प्रकल्पास विरोध असल्यामुळे सत्ताधारी शिवसेनेने हा प्रस्ताव सभेच्या विषयपत्रिकेवर घेतला नव्हता. आता शिवसेनेने १९ जूनच्या सर्वसाधारण सभेपुढे तो मंजुरीसाठी आणला आहे. त्यास राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला आहे.

बुलेट ट्रेनसाठी या गावातील जमिनींचे करणार संपादन

ठाणे महापालिका क्षेत्रातील शीळ, डवले, पडले, देसाई, आगासन, बेतवडे आणि म्हातार्डी या गावातून बुलेट ट्रेनचा मार्ग जाणार असून म्हातार्डी येथे बुलेट ट्रेनचे स्थानक उभारले जाणार आहे. या ट्रेनच्या मार्गासाठी गावांमधील १९.४९ हेक्टर तर स्थानकाच्या उभारणीसाठी म्हातार्डी गावातील १७.१३ हेक्टर इतके भूसंपादन करावे लागणार आहे. सुरुवातीला शिवसेनेने या प्रकल्पाला विरोध केला होता. मात्र आता बुलेट ट्रेनसाठी पायघड्या घालण्यात येत आहेत.

- Advertisement -

लोकलच्या समस्येकडे दुर्लक्ष

नव्याने निवडून आलेले खासदार मध्य रेल्वेच्या समस्यांकडे पाठ फिरवत आहेत. गेल्या १० ते १५ दिवसांपासून मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत होत आहे. ठाण्याच्या विस्तारीत रेल्वे स्थानकाची एक विटही पुढे सरकलेली नाही. ठाणे ते दिवा पाचवा आणि सहावा रेल्वे मार्ग, दिव्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला सुटणारी लोकल, कल्याण टर्मिनसच्या समस्या या बाबींकडे आता निवडून आलेल्या खासदारांचे दुर्लक्ष होत आहे.

बुलेट ट्रेनला पायघड्या घालून भूमिपुत्रांच्या जमिनीवर नांगर फिरवला जात आहे. भूमिपुत्रांच्या शेतजमिनी संपादित करुन त्यांना देशोधडीला लावण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा तीव्र विरोध असून आमचे सर्व नगरसेवक महासभेमध्ये या प्रस्तावाला विरोध करणार.
आनंद परांजपे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -