घरमुंबईनेरूळ रेल्वे स्थानक की बार अँड रेस्टॉरंट?

नेरूळ रेल्वे स्थानक की बार अँड रेस्टॉरंट?

Subscribe

दारू आणि चाखणा एकाच ठिकाणी मिळणार्‍या नेरूळ रेल्वे स्थानकातच तळीरामांची बसायचीही सोय होत असल्याने हे स्टेशन आहे की बार अँड रेस्टॉरंट, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तळीरामांनी नेरूळ स्टेशनला बार अँड रेस्टॉरंट बनवले आहे. तर दुसरीकडे फेरीवाल्यांनी स्टेशनला कचराकुंडीचे स्वरूप दिले आहे. त्यामुळे सकाळी लवकर जाणार्‍या प्रवाशांना नाक मुठीत घेऊन तर रात्री उशिरा घरी जाणार्‍या प्रवाशांना या ठिकाणाहून मान खाली घालून जावे लागते.

नेरूळ-खारकोपर रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर नेरूळ हे नवी मुंबईतील सर्वात मोठे स्टेशन झाले आहे. त्यामुळे या ठिकाणावरील रहदारीही वाढली आहे. मात्र येथील सुरक्षा कोमात गेल्याने स्टेशनला बकाल रूप आले आहे. या स्थानकातच आणि स्थानकाच्या काही अंतरावर वाईन शॉप असल्याने रात्री ८ नंतर या स्थानकाला बार अँड रेस्टॉरंटचे स्वरूप येते. तळीराम दारू आणि चाखणा उघड्यावरच घेऊन बसतात.

- Advertisement -

फेरीवाल्यांनी तर या स्थानकात हैदोसच मांडला आहे. दिवसा स्टेशनच्या आत आणि सायंकाळी बाहेर, रात्री परत आत, असा क्रम त्यांचा ठरला असल्याने त्यांच्यापुढे सुरक्षा यंत्रणाही फिकी पडते.अनधिकृत फेरीवाल्यांमध्ये महिलांचे प्रमाण जास्त असल्याने त्यांना बोलायच्या भानगडीत कोणीही पडत नाही.दिवसभर व्यवसाय करायचा आणि त्याच ठिकाणी उरलेला कचरा टाकायचा असे नित्यनियमाने होत असल्याने पहाटे कामावर जाणार्‍या प्रवाशांना याचा नाहक त्रास भोगावा लागतो.भिकारी व गर्दुल्ले यांचीही संख्या या स्थानकात मोठ्या प्रमाणात असल्याने यांनी तर स्टेशनला उकीरड्याचे स्वरूप आणले आहे. रात्री १० नंतर नशा करून मिळेल त्या जागी झोपायचे. झोपेतच विधी उरकायचे असे प्रकार सुरू असतात. सफाई कर्मचार्‍यांनाही त्याचा भुर्दंड सोसावा लागतो. स्थानकाच्या बाहेर पार्किंग क्षेत्रात काही फेरीवाल्यांनी कायमस्वरूपी दुकाने थाटल्याने त्यांना परवानगी दिली कोणी असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सुरक्षेच्या तुलनेत या ठिकाणी रक्षकांची संख्या कमी आहे. तीन शिफ्टमध्ये फक्त आठ सुरक्षा रक्षक असल्याने त्यांनी लक्ष ठेवायचे कुठे असा प्रश्न आहे. अनधिकृत फेरीवाल्यांमध्ये महिलांची संख्या जास्त असल्याने त्यांच्यावर कारवाई करताना बर्‍याच अडचणी येतात. त्यातही कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर रक्षकांच्या अंगावर फेरीवाले धावून येतात.गेल्या महिन्यात अशीच कारवाई करत असताना आमच्या महिला कार्मचार्‍याला मारहाण झाली. त्यावर नेरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून कर्मचारीही दहशतीखाली आहेत.
-श्रीकांत गवाळे, सुरक्षा अधिकारी,नेरूळ रेल्वे स्थानक

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -