घरमुंबईबंद जुना कसारा घाटात वाहनांची घुसखोरी

बंद जुना कसारा घाटात वाहनांची घुसखोरी

Subscribe

रस्ता वाहतूकबंदी धाब्यावर ,अपघातात एकाचा मृत्यू दोघे जायबंद

मुंबई -नाशिक महामार्गावरील जुना कसारा घाट प्रशासनाने वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचे घोषित केल्यानंतरही वाहनांची घुसखोरी सुरूच आहे. या मार्गावर दोन्ही लेनवरील वाहने भरधाव वेगात धावत असल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. असे असतानासुद्धा संबंधित प्रशासन व ठेका कंपनीच्या अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत आहे.

दोन महिन्यांपूर्वी अतिवृष्टीमुळे जुना कसारा घाट खचल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नाशिक विभागाने काम पूर्ण होईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर नाशिक वाहिनीवरील नवीन कसारा घाट रस्त्यावर दुहेरी वाहतूक चालू करण्यात आली. मात्र, वाहतूक कोंडीचा ताण एकाच रस्त्यावर आल्याने नाशिकच्या दिशेने धावणार्‍या लहान वाहनांची कोंडी फोडून काही दिवस जुन्या कसारा घाटातून सोडण्यात आल्या. परंतु, जव्हारच्या दिशेने जाणार्‍या वाहनांना पर्यायी मार्ग नसल्याने तीही वाहने याच मार्गावरून संतगतीने जात होती.

- Advertisement -

त्यानंतर यात अधिकाधिक वाहनांची भर पडत गेल्याने बंद घाट रस्त्यावर प्रवाशांच्या सुरक्षेचा बोजवारा उडाल्याचे पाहायला मिळाले आणि ते आजमितीस कायम आहे. शिवाय घाट रस्ता नागमोडी वळणाचा असल्याने दोन्ही दिशेने भरधाव वेगाने धावणार्‍या वाहनांची धडक होऊन मोठा अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.

घाट रस्ता खचल्यानंतर या मार्गावर एक महिन्यात तीन बाईकस्वारांचे अपघात झाले आहेत. यात दोन जण जायबंद झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. एकीकडे ठेका कंपनीने खचलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी खोदकाम करून ठेवले आहे, तर दुसरीकडी कामासाठी लागणारी डंपर, जेसीबी आणि पोकलेन मशीन उभ्या करून काम चालू असल्याचे भासवत आहे. जुन्या कसारा घाटात काही ठिकाणी टेकडीतून निसटलेला मातीचा ढिगारा आणि दगड तसेच आहेत. हे काम पूर्ण होण्यास 2020 उजाडणार असल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

बंद घाट रस्त्यादरम्यान घडलेल्या अपघाताची माहिती घेण्यात येईल. तसेच जुन्या घाटातून सुरू असलेल्या वाहतुकीची माहिती घेऊन पुढील उपाययोजना करण्यात येईल.
-दिलीप पाटील, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग, नाशिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -