घरमुंबईआयपीएस अधिकार्‍याच्या मुलाला ऑनलाईन गंडा

आयपीएस अधिकार्‍याच्या मुलाला ऑनलाईन गंडा

Subscribe

बँक खात्यातून ३५ हजार रुपये गायब

इंटरनेटच्या मदतीने वेगवेगळे फंडे वापरत लोकांची फसवणूक केल्याची प्रकरणे समोर येत असतानाच एका वरीष्ठ आयपीएस अधिकार्‍याच्या मुलालासुद्धा याचा फटका बसला. पोलीस दलात एका उच्चपदावर कर्तव्यावर असणार्‍या या अधिकार्‍याच्या मुलाच्या खात्यातून तब्बल ३५ हजार ३०० रुपयांची रक्कम गायब झाली आहे. चर्चगेट येथील मरीन ड्राईव्ह परिसरात हे अधिकारी वास्तव्याला आहेत. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा शोध घेत आहेत.

मुंबईतील खारमध्ये असणार्‍या थाडोमल अभियांत्रिकी महाविद्यालयात या अधिकार्‍याचा मुलगा शिकतो. मुलाच्या नावाने जुलै महिन्यातच चर्चगेटमधील अ‍ॅक्सीस बँकेत खाते उघडण्यात आले होते. खाते उघडण्यासाठी त्यांनी तब्बल २ लाखांपेक्षा अधिक रुपयांची रक्कम खात्यात ठेवली होती. खाते उघडताच त्यांना पासबुक, एटीएम कार्ड आणि एटीएमचा पासवर्ड असे सगळे साहित्य बँकेने त्या अधिकार्‍याच्या मुलाला पुरवले होते. पण आतापर्यंत मुलाने या एटीएम कार्डाचा वापर केला नव्हता. मध्यंतरी ऑगस्ट महिन्यात मुलाच्या खात्यातले १ लाख ६५ हजार रुपये चेकच्या सहाय्याने त्याच्या आईच्या खात्यावर जमा करण्यात आले होते पण यावेळीसुद्धा एटीएम किंवा ऑनलाईन बँकिंगचा वापर करण्यात आला नव्हता. १६ नोव्हेंबर रोजी मुलाचा मोबाईल काही कारणास्तव बंद पडला.

- Advertisement -

मोबाईलमध्ये बँकेचे खाते उघडताना दिलेला मोबाईल नंबर होता. पुढचे १४ दिवस मोबाईल बंद असल्याने त्यांना कोणत्याही प्रकारचे कॉल किंवा मेसेज मिळाला नाही, मात्र ३० नोव्हेंबरला मोबाईल सुरु करताच बँकेतून चार वेळा पैसे काढल्याचे मेसेज मिळाले. १६ नोव्हेंबरच्या दरम्यान चार वेळा वेगवेगळ्या रकमेने ३५ हजार ३०० रुपये खात्यातून काढण्यात आल्याची माहिती अ‍ॅक्सीस बँकेतून मिळाली. हि रक्कम एटीएमच्या साहाय्याने काढली असल्याची माहिती बँकेतून मिळताच एटीएम आणि त्याचा पासवर्ड स्वत:कडे असताना अज्ञात आरोपीने संगणकीय कौशल्याचा वापर करुन ही रक्कम लुटली असल्याची माहिती समोर येताच अधिकार्‍याच्या मुलाने मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास सुरु असल्याची माहिती मरीन ड्राईव्ह पोलिसांनी दिली आहे.

अ‍ॅक्सीस बँकेत खाते उघडल्यानंतर एटीएम कार्ड आणि त्याचा पासवर्ड बंद लिफाफ्यातून मिळाला होता पण तो आतापर्यंत अधिकार्‍याच्या मुलाने साधा उघडूनही पाहिला नाही. एटीएम आणि ऑनलाईन बँकिंग या खात्यावरुन केली नसतानाही पैसे अचानक गायब झाल्याने त्याने मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि गुन्हा नोंदविला. बँकेने दिलेल्या माहितीनुसार हे पैसे एटीएमच्या मदतीने काढले गेले असल्याने पोलिसांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -