घरमुंबईमुंबई महापालिकेकडून धोकादायक झाडांची छाटणी करण्यासाठी 'ऑनलाईन' परवानगी

मुंबई महापालिकेकडून धोकादायक झाडांची छाटणी करण्यासाठी ‘ऑनलाईन’ परवानगी

Subscribe

पालिका संकेतस्थळ आणि "MCGM 24 x 7" या भ्रमणध्वनी ॲपवर मोफत परवानगी

मुंबईत नुकत्याच झालेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे शहर व उपनगरात २ हजार ३६४ ठिकाणी झाडे, फांद्या यांच्या पडझडीच्या घटना घडल्या. पावसाळ्यात दरवर्षीच झाडे, फांद्या यांची मोठ्या प्रमाणात पडझड होऊन वित्तीय व जीवित हानी होण्याच्या घटना घडतात. या दुर्घटना टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने पावसाळ्यापूर्वीच धोकादायक झाडे, मृत झाडे, किडकी झाडे, अवास्तव वाढलेल्या व धोकादायक ठरणाऱ्या फांद्या यांची छाटणी करण्यासाठी नागरिकांना ‘ऑनलाईन’ सुविधा उपलब्ध केली आहे.

नागरिकांना घरबसल्या वृक्ष छाटणी परवानगीसाठी अर्ज करण्याची सुविधा महापालिकेच्या “portal.mcgm.gov.in” या संकेतस्थळावर आणि “MCGM 24×7” या भ्रमणध्वनी आधारित अँड्रॉइडवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे, मृत झालेल्या किंवा किडीचा प्रादुर्भाव असलेल्या झाडांबाबत अथवा सकृतदर्शनी धोकादायक झालेल्या झाडांबाबत महापालिकेच्या नागरी सेवा सुविधा विषयक १९१६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच, महापालिकेच्या विभाग कार्यालयातील कनिष्ठ वृक्ष अधिकाऱ्यांशीही देखील संपर्क साधल्यास त्यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य ती कार्यवाही पावसाळ्यापूर्वी करवून घेता‌ येईल.

- Advertisement -

या सर्व परवानग्या मोफत आहेत. जीवित वा वित्तहानी टाळण्यासाठी ऑनलाइन परवानगी घेऊन झाडांची सुयोग्य व शास्त्रशुद्ध छाटणी पावसाळ्यापूर्वी करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनात उद्यान खात्याची विशेष बैठक नुकतीच पार पडली. यावेळी, त्यांनी, पालिका उद्यान विभागाने पावसाळापूर्व तयारीच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याचे आदेश दिले. त्यानुसार महापालिकेची पूर्व परवानगी घेऊन झाडांची छाटणी पावसाळ्यापूर्वीच करण्याचे आवाहन महापालिकेचे उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले आहे.

मुंबईत २९ लाख ७५ हजार २८३ झाडे

मुंबई महापालिकेने २०१८ मध्ये केलेल्या वृक्ष गणनेनुसार पालिका क्षेत्रात एकूण २९ लाख ७५ हजार २८३ झाडे आहेत. यापैकी, १५ लाख ६३ हजार ७०१ झाडे खाजगी आवारांमध्ये तर ११ लाख २५ हजार १८२ एवढी झाडे शासकीय परिसरांमध्ये आहेत. याव्यतिरिक्त १ लाख ८५ हजार ३३३ झाडे ही रस्त्यांच्या कडेला असून उर्वरित १ लाख १ हजार ६७ एवढी झाडे विविध उद्यानांमध्ये आहेत, अशी माहिती उद्यान खात्याद्वारे देण्यात आली आहे.

- Advertisement -

झाडांची देखभाल करणे संबंधितांची जबाबदारी

मुंबई महापालिका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी असणा-या झाडांची / वृक्षांची देखभाल ही महापालिकेद्वारे नियमितपणे करण्यात येते. मात्र सोसायटी, शासकीय – निमशासकीय संस्था, खाजगी जागा इत्यादींमध्ये असणा-या झाडांची देखभाल घेणे ही सर्व जबाबदारी ही संबंधित मालकाची किंवा वापरकर्त्याची असते. पावसाळ्याच्या काळात झाडे पडून वित्त व जीवितहानी होण्याची शक्यता असते.

हे टाळण्यासाठी संबंधितांनी महापालिकेच्या पूर्व परवानगीने आपल्या परिसरातील अवास्तव वाढलेल्या झाडांच्या फांद्या सुयोग्य व शास्त्रीय पद्धतीने पावसाळ्यापूर्वीच छाटाव्यात, असे आवाहन महापालिकेद्वारे करण्यात आले आहे. तसेच, छाटणी झाल्यानंतर झाडाच्या तोडलेल्या फांद्या व इतर कच-याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ही संबंधितांचीच आहे. पालिकेच्या वार्ड कार्यालयातही संबंधित विभागात परवानगी घेऊन पालिकेच्या ठेकेदाराकडे वृक्ष, फांदी छाटणीसाठी सेवाशुल्क भरून कार्यवाही करता येईल. तसे केल्यास ठेकेदारच त्या छाटलेल्या झाडांची, फांद्यांची विल्हेवाट लावतो.

ऑनलाईन परवानगी प्रक्रिया

नागरिकांना घर बसल्या वृक्ष छाटणी परवानगीसाठी अर्ज करण्याची सुविधा महापालिकेच्या “portal.mcgm.gov.in” या संकेतस्थळावर आणि “MCGM 24×7” या भ्रमणध्वनी आधारित अँड्रॉइडवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
“MCGM 24 x 7” हे भ्रमणध्वनी आधारित अँड्रॉइड ॲप गुगल प्ले स्टोअर वर मोफत उपलब्ध आहे. हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर व ओटीपी पडताळणी (OTP Verification) केल्यानंतर ॲप मधील ‘गो टू सर्विस’ (Go to service) या लिंक वर क्लिक केल्यावर उघडणाऱ्या ‘ट्री ट्रिमिंग’ (Tree Trimming) या लिंक अंतर्गत झाडे छाटणी ची ऑनलाइन परवानगी मिळण्याची प्रक्रिया सुरू होते.

तसेच, मुंबई महापालिकेच्या “portal.mcgm.gov.in” या संकेतस्थळाद्वारे देखील ऑनलाइन पद्धतीने झाडे छाटणीची परवानगी मिळू शकते. यासाठी महापालिकेच्या सदर संकेतस्थळावर गेल्यानंतर ‘नागरिकांकरिता’ (For Citizen) या अंतर्गत ‘अर्ज करा’ (Apply) या पर्यायामध्ये ‘उद्यान व वृक्ष’ (Garden & Tree) या पर्याय अंतर्गत झाडे छाटणीच्या परवानगीची ऑनलाइन प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -