घरमुंबईईदचा नमाज सोडून घेतली पीडितांच्या मदतीसाठी धाव

ईदचा नमाज सोडून घेतली पीडितांच्या मदतीसाठी धाव

Subscribe

शहरात कोणतेही संकट आले की लोक जात-धर्म पाहण्याच्या फंदात पडत नाहीत. संकट कुठलेही असो तिथे मदत हाच धर्म समजून लोक मदत करतात. काल ईदचा पवित्र नमाज पढताना परळ येथील क्रिस्टल टॉवरला आग लागली.

शहरात कोणतेही संकट आले की लोक जातधर्म पाहण्याच्या फंदात पडत नाहीत. संकट कुठलेही असो तिथे मदत हाच धर्म समजून लोक मदत करतात. काल ईदचा पवित्र नमाज पढताना परळ येथील क्रिस्टल टॉवरला आग लागली. त्या इमारतीच्या समोरील मशिदीत नमाज पढणार्‍या तरुणांनी पवित्र नमाज थांबवून मदतीसाठी क्रिस्टल गाठले. क्रिस्टल टॉवरमध्ये विविध धर्माचे रहिवासी राहतात. या तरुणांच्या प्रयत्नांमुळे शेकडो रहिवासी आगीतून सुखरूप बाहेर पडू शकले.

परळ येथील क्रिस्टल टॉवरला काल सकाळी 7.45 वाजता आग लागली. ही आग लागल्याची घटना कळताच इमारतीतील नागरिकांनी इमारतीबाहेर धाव घेतली. परंतु अनेकांना बाहेर पडता येत नव्हते. याचवेळी रस्त्याच्या पलिकडे असलेल्या मशीदमध्ये बकरी ईदनिमित्त नमाज पठण करत असलेल्या तरुणांनी इमारतीला आग लागल्याचे पाहिले. ही आग पाहून या तरुणांनी इमारतीकडे धाव घेत आत प्रवेश करून अनेकांना बाहेर पडण्यास मदत केली. मुस्लीम तरुणांनी अग्निशमन दल व पोलीस घटनास्थळी पोहचेपर्यंत अनेकांना इमारतीमधून बाहेर पडण्यासाठी मार्ग दाखवला. तसेच त्यांना सुखरूप बाहेर आणून त्यांना व्यवस्थित सुटका केली, अशी माहिती क्रिस्टल टॉवरमध्ये सातव्या मजल्यावर राहणार्‍या जय शेट्ये यांनी दिली.

- Advertisement -

इमारतीला आग लागल्याचे कळताच सातव्या मजल्यावर राहणार्‍या जय शेट्ये या तरुणाने तातडीने पायर्‍यांकडे धाव घेतली. पण त्याचबरोबर त्याने प्रत्येक मजल्यावर घराचा दरवाजा ठोठावून घरातल्यांंना आगीची कल्पना दिली. एका मजल्यावर फार वेळ थांबणे शक्य नसल्याने दरवाजा ठोठावल्यानंतर ज्यांनी दरवाजा लगेच उघडला त्यांना माहिती दिली. अशाप्रकारे दरवाजा ठोठावत मी इमारतीच्या बाहेर आल्याचे जय शेट्ये यांनी सांगितले. मी इमारतीतून बाहेर पडत असताना समोरच्या परिसरातील मुस्लीम तरुण धावत आले व त्यांनी मदत केल्याने अनेकांचे प्राण वाचण्यास मदत झाली.

बोलणे शेवटचे ठरले

चुलत भावाला बकरी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी झवेरी बाजारमध्ये राहणारा हसन शहनाज शेख (वय 36) ऊर्फ बबलू सकाळीच 1301 रुममध्ये राहणार्‍या अझरूद्दीन अली शेख (वय 31) याच्याकडे आला होता. बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्यानंतर अझरुद्दीन, बबलू व जहाँगीर हे गप्पा मारत बसले होते. त्याचवेळी अचानक इमारतीच्या12 व्या मजल्यावर मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे बबलूने घराचा दरवाजा उघडला असता बाहेर मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता.पसरलेला धूर व लागलेली आग यामुळे बबलूने आपल्या भावाला आवाज देत घराबाहेर पडला. त्याच्यामागोमाग बाहेर पडणार्‍या जहाँगीरला अझरूद्दीनने थांबवले.बबलूला थांबण्यासाठी आवाज दिला. पण तोपर्यंत बबलू पुढे निघून गेला होता. थोड्या वेळाने बबलूने चुलत भाऊ अझरुद्दीनला फोन करून आपण कोठेतरी अडकलो असून, सर्वत्र धूर पसरला असल्याचे सांगितले. त्यानंतर फोन कट झाल्याने बबलूशी त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. बबलूशी झालेले ते बोलणे शेवटचे ठरले, अशी खंत अझरूद्दीनने आपल्या मित्रांकडे व्यक्त केली. बबलूच्या मृत्यूमुळे शेख कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असल्याची माहिती माजीद खान यांनी दिली. बबलू हा झवेरी बाजारमध्ये ज्वेलरी डिझाईन करण्याचे काम करत होता. तो कोलकात्याहून मुंबईत कामासाठी आला होता.

- Advertisement -

दातावरून पटली ओळख

इमारतीला लागलेल्या भीषण आगीत लिफ्टमध्ये सापडलेले अशोक संपत व संजीव नायर या दोघांचा होरपळून मृत्यू झाला. आगीच्या उष्णतेमुळे लिफ्टमध्ये प्रंचड प्रमाणात वाढलेल्या तापमानामुळे लिफ्टमध्ये सापडलेला या दोघांचे कमरेखालील शरीर पूर्णत: जळून गेले होते. तर अशोक संपत यांचाही एक हात शरीरापासून वेगळा झाला होता. आगीच्या उष्णतेमुळे लिफ्टमध्ये वाढलेल्या तापमानामुळे या दोघांचा मृतदेह ओळखणे अवघड झाले होते. त्यातच संजीव नायर याच्या हातातील घड्याळ व गळ्यातील चेनमुळे त्याची ओळख पटण्यास मदत झाली. परंतु अशोक संपत यांची ओळख पटण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे फॉरेन्सिक ऑडोन्टोलॉजी विभागाने संपत यांच्या दाताच्या माध्यमातून त्यांची ओळख पटवण्याचा निर्णय घेतला. कुटुंबाकडून मिळालेल्या छायाचित्रानुसार संपत यांचे पुढील दोन दात हे अन्य दातांपेक्षा मोठे होेते. तर एका दातामध्ये चांदी भरली असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांची ओळख पटवण्यातील अडचण दूर झाल्याचे केईएम हॉस्पिटलमधील ऑडोन्टोलॉजी तज्ज्ञ डॉ. हेमलता पांडे यांनी ‘आपलं महानगर’ला सांगितले. दातांबरोबरच संपत यांच्या खिशात असलेले व्हिजिटींग कार्ड व कमेरेच्या पट्ट्याचीही मदत झाल्याचे केईएममधील फॉरेन्सिक ऑडोन्टोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. हरीष पाठक यांनी सांगितले.

मदतीला गेला तो परतलाच नाही

16 व्या मजल्यावर नवीन संपत (वय 77) व वीना संपत (वय 74) हे दोघे वृद्ध आपली नात निधीसोबत राहत होते. इमारतीला आग लागल्याचे कळताच निधीने शेजारच्या इमारतीत राहत असलेले आपले वडील अशोक संपत यांना फोन करून बोलावून घेतले. संपत यांनीही तातडीने क्रिस्टल टॉवरकडे धाव घेत त्यांनी 16 वा मजला गाठला. 16 व्या मजल्यावर गेल्यावर संपत यांनी प्रथम आपले आई वडील आणि मुलीला अग्निशमन दलाच्या क्रेनच्या साहाय्याने खाली पाठवले. संपत यांनाही त्यांनी खाली येण्यास सांगितले. परंतु नेहमीच सर्वांच्या मदतीला धावून जाणार्‍या संपत यांनी खाली येण्यास नकार देत इमारतीतील अन्य व्यक्तींच्या मदतीसाठी धावून गेले. पण त्यानंतर अशोक कोठे आहेत याचा काहीच पत्ता लागत नव्हता. त्यामुळे त्यांच्या घरातील व्यक्तींमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. त्यांनी अशोक संपत यांचा सर्वत्र शोध घेतला. दुपारी साडेतीनच्या सुमारास सापडलेल्या अनोळखी मृतदेहांपैकी एक मृतदेह अशोक यांचा असल्याचे कळले आणि त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोेंगर कोसळला.

नमाजसाठी गेलो म्हणून वाचलो

बकरी ईद असल्यामुळे 1१ व्या मजल्यावर राहणारे नजीर शेख हे सकाळीच नमाज पठण करण्यासाठी मशिदीत गेले होते. नमाज पठण करून होत असतानाच त्यांना त्यांची मुलगी आफ्रिन हिने इमारतीला आग लागला असल्याचे कळवले. आग लागल्याचे कळताच नजीर यांनी थेट घर गाठले. त्यावेळी आगीचा भडका उडाला होता. मात्र त्यापूर्वीच त्यांची मुलगी, दोन मुले व पत्नी यांची अग्निशमन दलाने सुखरूप सुटका केली होती. या आगीत माझ्या घरातील सर्व सामान भस्मसात झाले आहे. मी नमाज पठण करण्यासाठी गेलो असल्यामुळे या भयंकर आगीपासून वाचलो. तरी इमारतीतील जखमी व मृत व्यक्तींमुळे मी व्याकूळ झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

२० मिनिटे लवकर पोहचलो असतो तर

मी या इमारतीमध्ये राहत नसलो तरी लिफ्टमध्ये अडकून होरपळून मृत्यू झालेला माझा मित्र संजीव नायर व काही मित्र या इमारतीत राहत असल्याने मी वडिलांचा फोन येताच तातडीने माहीमवरून परळकडे धाव घेतली. 9 ते 9.15 च्या सुमारास मी इमारतीखाली आलो तर सर्वत्र गोंधळ पसरलेला होता. अग्निशमन दलाच्या जवानांसोबत मी इमारतीत प्रवेश केला. इमारतीमध्ये प्रवेश करताच जवानांनी तातडीने मदतकार्याला सुरुवात केली. त्यांनी काहीजणांना सुखरूप बाहेर काढले.इमारतीच्या गच्चीवर कोणी अडकले आहे का? असा विचार माझ्या डोक्यात आल्याने मी गच्चीवर धाव घेतली असता तिथे मला एक महिला व एका पुरुषाचा मृतदेह सापडला. मी तातडीने जवानांना याबाबत सांगितले. त्यांनी हे मृतदेह खाली पाठवले. त्यानंतर 12 व्या मजल्यावर अडकलेल्या लिफ्टचा दरवाजा मी जवानांना उघडण्यास सांगितले. परंतु लिफ्ट प्रचंड तापलेली असल्याने दरवाजा उघडणे त्यांना शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी लिफ्टचा दरवाजा उघडण्याकडे दुर्लक्ष केले. परंतु मला माझा मित्र संजीव कोठेच दिसत नसल्याने माझ्या मनात भीतीचे काहूर माजले होते. त्यामुळे मी जवानांचा पिच्छा पुरवून त्यांना दरवाजा उघडण्यास भाग पाडले.लिफ्टचा दरवाजा उघडलावर त्यामध्ये दोन मृतदेह आढळून आले, अशी माहिती खलील इब्राहिम यांनी दिली

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -