घरमुंबईअशोका ॲकॅडमी विरोधात पालकांची पोलीस ठाण्यात धाव; राज ठाकरेंनाही घातले साकडे

अशोका ॲकॅडमी विरोधात पालकांची पोलीस ठाण्यात धाव; राज ठाकरेंनाही घातले साकडे

Subscribe

अंधेरीतील अशोका ॲकॅडमी या सीबीएसई शाळेविरोधात पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या शाळेने विद्यार्थ्यांना इंटर्नल टेस्टचे गुण कमी दिल्याचा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे. याशिवाय पालकांनी या बाबतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.

उच्चभ्रूंचे निवास असलेल्या अंधेरी लोखंडवाला परिसरातील अशोका ॲकॅडमी या सीबीएसई अभ्यासक्रम शिकवणाऱ्या शाळेने दहावीच्या मुलांना इंटर्नल टेस्टमध्ये मिळालेले गुण मुद्दामहून कमी करून सीबीएसई बोर्डाला पाठवल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याचा आरोप करत या विद्यार्थ्यांच्या पालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाच “राजसाहेब, आता तुम्हीच आमची आशा आहात” असं म्हणत या प्रकरणात लक्ष घालण्याची लेखी विनंती केली आहे. त्यामुळे पालकांना न्याय मिळवून देण्यासाठी मनसेनेचे वर्सोवा विभागअध्यक्ष संदेश देसाई आणि शाखाध्यक्ष प्रशांत राणे यांनी पुढाकार घेतला आहे.

 

- Advertisement -

शाळेने मुद्दामहून कमी गुण दिल्याचा आरोप

याविषयी अधिक माहिती देताना मनसेचे विभागअध्यक्ष संदेश देसाई यांनी सांगितलं की, सीबीएसई दहावीच्या परीक्षेच्या निकालात शाळेत वर्षभरात होणाऱ्या इंटर्नल टेस्टचे गुण अत्यंत महत्वाचे असतात. प्रत्येक विषयाची ही इंटर्नल टेस्ट २० गुणांची असते. मात्र अशोका अकॅडमीच्या अनेक हुशार विद्यार्थ्यांना इंटर्नल टेस्टमध्ये मिळालेले गुण शाळेने मुद्दामहून कमी करून बोर्डाला पाठवल्याचा आरोप पालकांनी केला आहे. ज्या विद्यार्थ्यांना लेखीपरीक्षेत ९० टक्के गुण मिळाले आहेत, त्या विद्यार्थ्यांना इंटर्नल टेस्टमध्ये अत्यंत कमी गुण मिळाल्यामुळे त्यांचे एकत्रित गुण ८५ टक्क्यांवर आल्याचं पालकांचं म्हणणं आहे. मात्र आपली ही तक्रार शाळेपर्यंत नेण्याचा प्रयत्न केल्यानंतरही मुख्याध्यापिका मंजू तिवारी यांनी अपेक्षित प्रतिसाद न दिल्यामुळे पालकांनी ओशिवरा पोलीस ठाणे गाठले.

“एकूण १३ पालकांनी त्यांचं स्वाक्षरी केलेलं पत्र राजसाहेबांच्या नावाने दिलं आहे. हे पालक शाळेत गेले असता त्यांना बाऊन्सर्सचा धाक दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासंदर्भात, पालक आणि शाळेच्या मुख्याध्यापिका यांची समोरासमोर चर्चा होणं आवश्यक आहे. पोलीस घेऊन आम्ही काल मुख्याध्यापिका मंजू तिवारी यांच्या घरी गेलो, मात्र त्यांनी कोणतीही चर्चा करण्यास नकार दिला”, असंही विभागअध्यक्ष संदेश देसाई यांनी सांगितलं.

- Advertisement -

विशेष म्हणजे, “गेल्या आठवड्यात शाळेच्या अध्यक्षा दिलशाद इराणी आणि मुख्याध्यापिका मंजू तिवारी यांच्याशी झालेल्या बैठकीत त्यांनी शाळेकडून इंटर्नल टेस्टच्या गुणांमध्ये चूक झाल्याचं कबूल केलं होतं. शाळेने सीबीएसई बोर्डाला यासंदर्भात ईमेल पाठवला असून त्यांच्याकडून गुणपत्रिकेत बदल करण्याबाबत प्रतिसाद अपेक्षित असल्याचं त्यांनी पालकांना सांगितलं, मात्र कोणतीही गोष्ट लेखी द्यायला त्यांचा नकार आहे”, असं फरहान या विद्यार्थ्याचे पालक रेझा मुल्ला यांनी सांगितलं. यासोबतच रुपेन काटकर यांचा मुलगा दक्ष याला सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत ८८ टक्के गुण मिळाले. पण त्याला इंटर्नल टेस्टमध्ये मिळालेले गुण शाळेने मुद्दामहून कमी न करता सीबीएसई बोर्डाला अचूकपणे पाठवले असते, तर त्याला ९३ टक्के गुण मिळाले असते, असे त्याच्या पालकांनी सांगितले.

पालक पत्रात म्हणतात,

“राजसाहेब, आम्हाला तुमच्या मदतीची-सहकार्याची गरज आहे, कारण आम्ही या प्रकरणात असहाय्य झालो आहोत. आता तुम्हीच आमची आशा आहात!” आपल्या पाल्यांच्या गुणपत्रिकेत सुधारणा करून मिळावी व त्यासाठी शाळा प्रशासनाशी अधिकृतपणे बोलणी करता यावी, यासाठी विद्यार्थ्यांचे पालक शुक्रवारी सकाळपासून ओशिवरा पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले आहेत. दरम्यान, “या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांचा विषय आम्ही आता शिक्षण खात्याच्या सचिवांपुढे मांडणार आहोत”, असं मनसेचे विभागअध्यक्ष संदेश देसाई व शाखाध्यक्ष प्रशांत राणे यांनी सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -