घरमुंबईभगवान दादांच्या नवरात्रोत्सवात घडतात खेळाडू

भगवान दादांच्या नवरात्रोत्सवात घडतात खेळाडू

Subscribe

अलबेलाफेम

नवरात्रोत्सव म्हटले की गरबा-दांडियाचे चित्र नजरेसमोर उभे राहते. परंतु स्वर्गीय अभिनेते भगवान दादा व त्यांचे बंधू शंकर पालव यांनी सुरू केलेल्या नवरात्रोत्सव मंडळाने याला छेद दिला आहे. हे मंडळ गरबा-दांडियाऐवजी दरवर्षी नवरात्रोत्सवादरम्यान कबड्डीचे सामने भरवते. विशेष म्हणजे दरवर्षी देशात सुरू होणार्‍या कबड्डी स्पर्धांच्या मोसमाला या स्पर्धेतून सुरुवात होते. 50 वर्षांपासून होत असलेल्या या कबड्डी सामन्यांमुळे आजवर अनेक  नामवंत कबड्डी व खो-खो खेळाडू घडले आहेत.
दादर (पूर्व) येथील शिंदेवाडीतील शिवनेरी सेवा मंडळातर्फे दरवर्षी देवीची प्रतिष्ठापना करण्यात येते. यावर्षी नवरात्रोत्सव मंडळाचे 83 वे वर्षे असून सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करणारे मुंबईतील एकमेव नवरात्रोत्सव मंडळ आहे. भगवान दादा व त्यांचे बंधू शंकर पालव यांनी पुढाकार घेऊन ओम भारत क्रीडा मंडळांतर्गत 1936 मध्ये दादर रेल्वे स्थानकाशेजारी नवरात्रोत्सवात देवीची स्थापना केली. यावेळी देवीच्या तैलचित्राची पूजा करण्यात येत होती. त्यानंतर 1942 मध्ये या मंडळातर्फे देवीच्या मूर्तीची स्थापना करण्यात येऊ लागली. नायगाव, भोईवाडा, दादर, हिंदमाता या परिसरातील नागरिक एकत्र येऊन या देवीची स्थापना करत असत.
परंपरेसोबत आपल्या परिसरातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी ओम भारत क्रीडा मंडळातर्फे कबड्डीचे सामने भरवण्यात येऊ लागले. यावेळी भगवान दादा यांच्यातर्फे कबड्डी स्पर्धेसाठी ‘पालव ढाल’ बक्षीस म्हणून देण्यात येत असे. यामुळे भविष्यात ओम भारत क्रीडा मंडळाची देवी म्हणजे कबड्डी आणि कबड्डी म्हणजे ओम भारत क्रीडा मंडळ हे समीकरण तयार झाले. विशेष म्हणजे भगवान दादा दादरमधून अन्यत्र राहण्यास गेल्यानंतरही मंडळांने परंपरा व क्रीडा हे समीकरण कायम ठेवत मंडळाचा लौकिक कायम ठेवला. मात्र त्यानंतर काही वर्षांनंतर ओम भारत क्रीडा मंडळाचे नामांतर विकास क्रीडा मंडळ झाले. त्यानंतर मोहन नाईक व उदय लाड यांनी 19६9 मध्ये शिवनेरी सेवा मंडळाच्या माध्यमातून नवरात्रोत्सव मंडळामार्फत होणार्‍या कबड्डी स्पर्धेला प्रायोजकत्व दिले. त्यामुळे नवरात्रोत्सव मंडळाची उत्सव व क्रीडा ही परंपरा कायम राहण्यास मदत झाली.
 शिवनेरी सेवा मंडळामार्फत सलग 50 वर्षे कबड्डी स्पर्धा भरवण्यात येत आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवावेळी मंडळातर्फे भरवण्यात येणारी कबड्डी स्पर्धा ही देशातील कबड्डी स्पर्धांच्या मोसमाची नांदी ठरत आहे. इतकेच नव्हे तर या सामन्यांतून पुढे येणार्‍या उदयोन्मुख खेळाडूंच्या पाठीशी हे मंडळ उभे राहत आहे. आतापर्यंत सुवर्णा बारटक्के ही आंतरराष्ट्ीय कबड्डी खेळाडू, तर अजय मयेकर, नंदू वाघमारे हे कुमार गटातील प्रतिभावान खेळाडू या स्पर्धेतून घडले आहेत. तसेच उद्यान्मुख खो-खोपटू सायली दुणे ही सुद्धा याच मंडळात सराव करत आहे, अशी माहिती नवरात्रोत्सव मंडळाचे प्रमुख कार्यवाह सुनील कांबळी यांनी दिली.
नवरात्रोत्सवावेळी कबड्डी सामने भरवण्याबरोबरच मंडळातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमाला, इंग्लिश स्पिकिंग कोर्स, मोफत चष्मा शिबीर वाटप, वृद्ध व महिलांसाठी देवदर्शन, वैद्यकीय तपासणी शिबिर असे विविध सामाजिक कार्यक्रम करण्यात येतात. त्याचप्रमाणे मुंबईसह बाहेरून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनाला येत असल्याने नऊ दिवसात दर्शनासाठी येणार्‍या भाविकांकडून 800 पेक्षा अधिक साड्या देवीला अर्पण करण्यात येतात. यातील काही साड्यांचा लिलाव करण्यात येतो तर अर्ध्यापेक्षा जास्त साड्या या आदिवासी महिलांना वाटप करण्यात येतात.
-सुरेश मोरे,अध्यक्ष, शिवनेरी सेवा मंडळ.
मी दादरच्या शिंदेवाडीची रहिवाशी असून शिवनेरी सेवा मंडळाने मला खेळाडू म्हणून घडवले. सब ज्युनियर आणि ज्युनियर पातळीवर याच मंडळाकडून मी कबड्डी खेळले. पावसाळ्याच्या चार महिन्यातील सरावानंतर प्रत्यक्ष स्पर्धेत खेळण्याचा अनुभव ही स्पर्धा देते आणि म्हणूनच देशातील कबड्डी मोसमाची सुरुवात करणार्‍या या स्पर्धेत खेळण्यासाठी माझ्याप्रमाणे सर्व कबड्डीपटू उत्सुक असतात. 
– सुवर्णा बारटक्के, आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू
Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -