घरमुंबईपोलीस बनले वसुली एजंट

पोलीस बनले वसुली एजंट

Subscribe

दोन अधिकार्‍यांसह सहाजण निलंबित

जनतेच्या सुरक्षेचे कर्तव्य पार पाडताना मुंबई पोलीस वसुली एजंट झाले की काय, अशी शंका येणारी घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. वांद्रे पोलिसांनी एका व्यावसायिकाला पोलीस ठाण्यात बोलावले. त्याला डिटेक्शन रूममध्ये बसवून त्याच्यावर दबाव आणला. त्यानंतर त्याच्याकडून दोन चेकवर जबरदस्तीने सही करून घेण्यात आल्या. मात्र या व्यावसायिकाने केलेल्या तक्रारीवरून वांद्रे पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकार्‍यांसह सहा जणांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांची सध्या चौकशी सुरू असून हे प्रकरण त्यांच्यावर चांगलेच शेकले आहे.
गजानन चोरमले, धनाजी साठे, श्रीधर वाघमारे, कुंदन कदम, अनिल चौधरी अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. चोरमले आणि साठे हे अधिकारी असून इतर चौघे पोलीस कॉन्स्टेबल आहेत. हे अधिकारी आणि कर्मचारी वांद्रे पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील (डिटेक्शन ) आहेत.
वांद्रे परिसरात राहणारे कासीफ खान आणि बिरेन सेलारका यांच्यात पैशांचा व्यवहार होता, मात्र पैशांच्या देवाण-घेवाणीवरून दोघात वाद सुरू होता. कासीफ खान यांनी ऑगस्ट महिन्यात वांद्रे पोलीस ठाण्यात अर्ज केला होता. या अर्जावरून गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी चोरमले आणि साठे यांनी अर्जदार कासीन खान यांनाच रात्रीच्या सुमारास पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. मध्यरात्री 2 वाजेपर्यंत खान यांना बेकायदेशीररित्या डिटेक्शन खोलीत बसवून ठेवले. इतर पोलीस कर्मचार्‍यांनी त्यांच्यावर दबाव आणला. त्यांचा मानसिक छळ करून जबरदस्तीने खान यांच्या पत्नीच्या बँक खात्यातील दोन धनादेशांवर स्वाक्षरी करायला लावून साडेसात लाख रुपये रोख बिरेन सेलारका याला देण्यास भाग पाडले.
तसेच खान यांच्याकडून काही कागदपत्रांवर स्वाक्षर्‍या घेतल्या. या सर्व प्रकाराबाबत वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याकडे तक्रार दाखल होताच या प्रकरणाचा तपास करण्यात आला. या प्रकरणात दोषी आढळलेल्या पोलीस अधिकारी चोरमले, साठे आणि ४ पोलीस कर्मचारी अशा एकूण सहा जणांना सेवेतून निलंबित करण्यात आले. ही निलंबनाची कारवाई नुकतीच करण्यात आली असून त्यांच्यावर खाते अंतर्गत चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहीती  एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने दिली.
काही तास डिटेक्शन खोलीत बसवून छळ केल्याप्रकरणी तक्रारदार काशिफने अधिकारी आणि अंमलदार यांच्या विरुध्द पोलीस आयुक्तांकडे तक्रार अर्ज दिला होता. या अर्जाची दखल घेत वरिष्ठांनी दोन अधिकारी आणि तीन कर्मचारी अशा एकूण पाच जणांना निलंबित केले आहे. 
– गिरीष अनावकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -