घरमुंबईसिडको - महापालिकेचा जुनाच संकल्प मार्गी लागण्याची चिन्हे

सिडको – महापालिकेचा जुनाच संकल्प मार्गी लागण्याची चिन्हे

Subscribe

शहराचा विकास आराखडा तयार करण्याचे काम २७ वर्षांनंतर मार्गी

आंतरराष्ट्रीय विमानतळासह सिडको आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रकल्प यावर्षी मार्गी लागण्याची शक्यता असल्याने नवी मुंबई तसेच पनवेल शहर हे महामुंबईला वेगळी दिशा देणारे ठरणार आहे. शहराचा विकास आराखडा तयार करण्याचे काम २७ वर्षांनंतर हाती घेण्यात आले असून पालिकेचा नियोजन विभाग हे काम करत आहे. ते अंतिम टप्प्यात असून यंदा पालिका आपला स्वतंत्र विकास आराखडा सादर करणार असून सर्वसाधारण सभा आणि जन सुनावणीनंतर तो शासनाच्या मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. हे एक महत्त्वाचे पाऊल पालिकेच्यावतीने पडणार असल्याने इतर प्रकल्पही त्याच धर्तीवर पार पडतील, अशी अपेक्षा शहरवासीयांना आहे.

नोव्हेंबरमध्ये सुरू होणारी नवी मुंबई मेट्रो, विमानतळासाठी लागणारे सपाटीकरण, नेरुळ ते भाऊचा धक्कापर्यंतची जलवाहतूक, मुंबईत वीस मिनिटांत पोहोचविणारी हॉवरक्राफ्ट , पामबीच मार्ग विस्तार या प्रकल्पांमुळे दळणवळणाच्या दृष्टीने नवीन वर्ष महामुंबईला लाभदायक ठरणार आहे. याशिवाय महागृहनिर्मिती, सायन्स पार्क, दोन मोठी रुग्णालये, बहुउद्देशीय वाहनतळ, तुर्भे, जुईनगर येथील उड्डाणपूल हे पालिकेच्यावतीने उभे राहणारे प्रकल्प महामुंबईला वेगळी दिशा देणारे ठरणार आहेत. या महागृहनिर्मिती बरोबरच नवी मुंबई मेट्रोचे काम अंतिम टप्प्यात आले असून तळोजा येथील एका उड्डाणपुलाची अडचण आहे. मात्र, नोव्हेंबर अखेरपर्यंत बेलापूर ते पेंदार दरम्यान धावणारी मेट्रो सुरू होण्याची शक्यता आहे. विमानतळाला जोडणारा न्हावा-शेवा ते नवी मुंबई खाडी हा ८०० कोटी रुपये खर्चाचा खाडी रस्ता तयार करण्याचे काम सिडको हाती घेणार आहे. खारघर येथे १२० हेक्टर जमिनीवर बीकेसीच्या धर्तीवर कॉर्पोरेट पार्क तयार करण्याचे काम याच वर्षी सुरू होणार आहे.

- Advertisement -

नैना क्षेत्रातील पाण्याची गरज भागविण्यासाठी सिडकोने कर्जत तालुक्यातील कोंढाणे धरणासाठी जलसंपदा विभागाला वित्तपुरवठा सुरू केला आहे. चारशे कोटी या धरणासाठी देण्यात आले आहेत. पण, त्याचे अद्याप काम सुरू झालेले नाही. ते या वर्षी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नैना क्षेत्राचा दुसरा आराखडाही यंदा मंजूर होणार आहे. सिडकोच्या या महाप्रकल्पाबरोबरच नवी मुंबई पालिकेने शहर नियोजनाचे काही प्रकल्प हाती घेतले आहेत. मोठमोठे नवीन प्रकल्प हाती घेण्यापेक्षा आहेत ते प्रकल्प मार्गी लावण्याचे धोरण पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी ठरवले आहे. यात नेरुळ येथील वंडर पार्कमधील जागेत पाच एकरवर अद्ययावत असे सायन्स पार्क बांधण्याचा चंग पालिका प्रशासनाने बांधला आहे. त्याच्या कामाला या वर्षी सुरुवात होणार आहे. याशिवाय सिडकोकडून कत्तलखान्यासाठी घेण्यात आलेल्या २२ एकर जमिनीवर पालिका यावर्षी अद्ययावत कत्तलखान्याचे काम हाती घेणार आहे. डॉक्टर आणि नर्सेस भरती झाल्यानंतर ऐरोली आणि नेरुळ येथील हॉस्पिटल्स पूर्ण क्षमतेने मार्च अखेरपर्यंत सुरू होणार आहेत.

शहरातील पायाभूत सुविधांच्या वार्षिक देखभालीची कामे एकाच वेळी दिली जाणार आहेत. नवी मुंबईत आता शहर नियोजन झालेले आहे. पण, त्याची वार्षिक देखभालीची महत्त्वाची कामे शिल्लक राहणार आहेत. शहरातील अंतर्गत वाहतूक कोंडी टाळता यावी यासाठी सीबीडीला वळसा घालून थेट पामबीचला जोडणारी पर्यायी वाहतूक व्यवस्था सुरू केली जाणार आहे. नवी मुंबईतील वाहनतळ ही एक मोठी समस्या आहे. त्यासाठी बेलापूरमध्ये पाच मजली बहुउद्देशीय इमारतीचे रखडलेले काम यंदा सुरू होणार असून त्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. पामबीचचा विस्तार ऐरोली ते कोपरखैरणे हा रस्ता खारफुटीमुळे रखडला आहे. न्यायालयाने विकासकामांसाठी काही अटी शिथिल केलेल्या आहेत. त्यामुळे शहरातील वाहतुकीला पामबीच हा पर्यायी मार्ग खुला करणार आहे. बेलापूर येथे सिडकोच्यावतीने बांधण्यात येणार्‍या मरिना जेट्टीमुळे जलवाहतुकीला चालना मिळणार असून नेरुळ ते भाऊचा धक्का दरम्यान राज्य मेरीटाईम बोर्डाच्यावतीने नियमित जलवाहतूक सुरू केली जाणार आहे. याच वर्षी जलवाहतुकीला प्राधान्य देताना वाशी तसेच बेलापूर ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत बंद पडलेली हॉवरक्राफ्ट सेवा सुरू केली जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -