घरमुंबईपरवानगीशिवाय झाडांच्या फांद्या छाटण्यास मनाई

परवानगीशिवाय झाडांच्या फांद्या छाटण्यास मनाई

Subscribe

अपघात झाल्यास सोसायट्या जबाबदार

मुंबईतील रस्त्यालगतच्या झाडांच्या धोकादायक फांद्यांची तसेच मृत झाडे महापालिकेच्यावतीने नेमण्यात आलेल्या कंत्राटदाराकडून पावसाळ्यापूर्वी छाटणी करण्यात येते. परंतु खासगी सोसायट्यांसह शासकीय व निमशासकीय वसाहतींच्या आवारातील झाडे कापणे संबंधितांवर बंधनकारक आहे. त्या झाडांची जबाबदारी महापालिका घेणार नसून त्या झाडांमुळे काही अपघात झाल्यास त्याला सोसायट्या जबाबदार असतील. त्यांनी पावसाळ्यापूर्वी झाडांच्या फाद्यांची छाटणी करायची असून त्यासाठी त्यांना पालिकेची परवानगी घ्यावी लागेल.

मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी असणार्‍या झाडांची तथा वृक्षांची निगा महापालिकेच्यावतीने नियमितपणे घेण्यात येते. परंतु खासगी सोसायटी, शासकीय – निमशासकीय संस्था, खाजगी जागा इत्यादींमध्ये असणा-या झाडांची निगा घेण्याची सर्व जबाबदारी ही संबंधित मालकाची किंवा प्राधिकरण तथा मंडळाची असते. पावसाळ्यात झाडे पडून वित्त व जीवितहानी होण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊन याबाबत सर्व संबंधितांनी महापालिकेच्या पूर्व परवानगीने आपल्या परिसरातील अवास्तव वाढलेल्या झाडांच्या फांद्या सुयोग्य पद्धतीने पावसाळ्यापूर्वीच छाटाव्यात, असे आवाहन महापालिकेने केले आहे. तसेच मृत झालेल्या किंवा किडीचा प्रादुर्भाव असलेल्या झाडांबाबत देखील महापालिकेच्या विभाग कार्यालयातील कनिष्ठ वृक्ष अधिकार्‍यांशी संपर्क साधून त्यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य ती कार्यवाही पावसाळ्यापूर्वी करून घ्यावी, असेही आवाहन उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले आहे.

- Advertisement -

अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान खात्याची एक विशेष बैठक झाली. या बैठकीत सिंघल यांनी उद्यान विभागाला पावसाळापूर्व तयारीच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेची पूर्व परवानगी घेऊन झाडांची छाटणी पावसाळ्यापूर्वीच करण्याचे आवाहन महापालिकेच्या उद्यान खात्याद्वारे करण्यात आले आहे.

महापालिका नियुक्त ठेकेदाराद्वारे झाडाची छाटणी करावयाची झाल्यास महापालिकेच्या नियमांनुसार विहित शुल्क पालिकेच्या विभाग कार्यालयाकडे (Ward Office) जमा केल्यानंतर सामान्यपणे त्यापुढील ७ दिवसांत झाडांच्या छाटणीची प्रक्रिया केली जाते. मुंबईतील सर्व खाजगी जागा, शासकीय-निमशासकीय जागांमधील झाडांची छाटणी ही महापालिकेच्या पूर्व परवानगीनुसार पावसाळ्यापूर्वीच करावी, जेणेकरुन संभाव्य जीवित अथवा वित्तहानी टाळता येईल, असे आवाहन परदेशी यांनी केले आहे.

- Advertisement -

मुंबईत सुमारे ३० लाख झाडे
वर्ष २०१८ मध्ये पूर्ण झालेल्या वृक्ष गणनेनुसार महापालिका क्षेत्रात एकूण २९ लाख ७५ हजार २८३ झाडे आहेत. यापैकी १५ लाख ६३ हजार ७०१ एवढी झाडे खाजगी आवारांमध्ये आहेत. तर ११ लाख २५ हजार १८२ एवढी झाडे शासकीय परिसरांमध्ये आहेत. याव्यतिरिक्त १ लाख ८५ हजार ३३३ झाडे ही रस्त्यांच्या कडेला असून उर्वरित १ लाख १ हजार ६७ एवढी झाडे विविध उद्यानांमध्ये आहेत, अशी माहिती उद्यान खात्याद्वारे देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -