घरमुंबईप्रभारी जलअभियंता,पूल विभागाच्या प्रमुख अभियंत्याच्या बढतीचे प्रस्ताव रोखले

प्रभारी जलअभियंता,पूल विभागाच्या प्रमुख अभियंत्याच्या बढतीचे प्रस्ताव रोखले

Subscribe

कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांचा पालिकेचा आरोप

मुंबई महापालिकेच्या प्रभारी जलअभियंता अजय राठोर आणि पूल विभागाचे प्रभारी प्रमुख अभियंता बाबासाहेब साळवे या दोन्ही अधिकार्‍यांची उपप्रमुख पदावरुन प्रमुख अभियंतापदी होणारी बढती महापालिकेने रोखून धरली. या दोन्ही अधिकार्‍यांवर पाणी पुरवठ्याच्या कामांमध्ये पदांचा गैरवापर करत महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवल्याचा आरोप महापालिका सभागृहात नगरसेवकांनी केला. त्यामुळे या दोन्ही अधिकार्‍यांवर कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप करत यांच्या बढतीचा प्रस्ताव रोखून धरत अन्य तीन अधिकार्‍यांच्या प्रस्तावांना सभागृहाने मान्यता दिली.

उपप्रमुख अभियंता असलेल्या संजय जाधव, बाबासाहेब साळवे, अजय राठोर, विवेक मोरे तसेच अरुण भोईर यांना प्रमुख अभियंतापदावर बढती देण्याचा प्रस्तावा स्थापत्य शहर समितीपुढे मंजूर करण्यात आल्यानंतर महापालिका सभागृहात मंजूरीला पटलावर ठेवण्यात आला होता. हा प्रस्ताव पुकारताच स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी यापैंकी जाधव, मोरे आणि भोईर यांना बढती देण्यात यावी, परंतु राठोर आणि साळवे यांची बढती रोखली जावी,अशी सूचना केली. या दोन्ही अधिकार्‍यांनी माझगाव रेतीबंदर, कोळसाबंदर आदी ठिकाणी बोटी धुण्यासाठी पदाचा गैरवापर करत अतिरिक्त पाणी दिल्याचा आरोप त्यांनी केला. याठिकाणी प्रतिदिन १०लाख लिटर एवढे पाणी देणे अपेक्षित असताना, त्यांना अधिक पाणी दिले जात होते आणि हे दोन्ही अधिकारी यामध्ये सामील होते,असा आरोप जाधव यांनी केला. त्यामुळे या दोघांकडून खुलासा येईपर्यंत यांची बढती रोखली जावी,अशी मागणी त्यांनी केली.

- Advertisement -

याला विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पाठिंबा देत, या प्रकरणांत तब्बल ६८० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी,अशी सूचना त्यांनी केली. तर भाजपचे प्रभाकर शिंदे यांनी या दोन्ही अधिकार्‍यांना निलंबित केले गेले पाहिजे,असे स्पष्ट केले. त्यामुळे अखेर या दोन्ही अधिकार्‍यांचे बढती रोखून ठेवत उर्वरित तिघांच्या बढतीचे प्रस्ताव मंजूर केले जावे,अशी उपसूचना मांडली गेली. त्यानुसार महापौर किशोरी पेडणेकर यांनी उपसूचना मंजूर करत दोघांची बढती रोखून ठेवत त्यांच्या कारवाई करण्याचे निर्देश देत उर्वरित तिघांच्या बढतीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -