घरमुंबईधरणक्षेत्रात पाऊस फुल्ल

धरणक्षेत्रात पाऊस फुल्ल

Subscribe

ठाणे, रायगडमध्ये जोरदार

उशिराने आलेल्या पावसाने आल्याच आपल्या १५ दिवसांचा बॅकलॉक भरून काढण्याचे ठरवले असल्यासारखी स्थिती शुक्रवारी ठाणे, पालघर जिल्ह्यात होती. ठाणे रेल्वेस्थानकातील फलाटावर रेल्वेस्टेशनलगतचे पाणी मोठ्या प्रवाहाने आल्याने फलाटाला धबधब्यासारखे स्वरुप आले होते. तर पहिल्याच पावसात रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांचे हाल झाले. ठाणे शहर परिसराला जोरदार पावसाने झोडपल्याने वाहतूक कोंडी, रस्ते जलमय झाले. तर मागील वर्षी आलेल्या पूरपरिस्थितीच्या आठवणीने वसईकरांनी या पावसाची धास्ती घेतली. वीज खंडीत होणे, झाडे कोसळले, रेल्वेचा बोजवारा, नालेसफाईची पोलखोल या पावसाने केली. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे कल्याणात रस्ता खचला, गटारात पडल्याने भिवंडीत मायलेकी जखमी झाल्या. तर शहापूरमध्ये पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क तुटला. ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या शहापूर तालुक्यातील तानसा, मोडकसागर, मध्यवैतरणा या तीन महत्वाच्या धरणक्षेत्रात शुक्रवारी सकाळपासून जोरदार पाऊस झाल्याने पाणीपातळी वाढली. सायंकाळी सहा वाजेपर्यंत तानसा जलाशयात ६० मिलीमीटर तर मोडकसागर येथे ६९ मिमी तर मध्यवैतरणा धरणक्षेत्रात ७८ मिमी अशा पावसाची नोंद झाली. अशी माहिती तानसा धरणाचे जलअभियंता दिनेश उमवणे यांनी दिली.

- Advertisement -

पनवेलमध्ये घरात ४ फूट पाणी
पनवेल शहरातील मालधक्का परिसरातील झोपड्यांमध्ये पावसामुळे जवळपास २५ घरांत चार फूट पाणी शिरले. सिडको परिसरात येणार्‍या या भागातील मोठा नाला साफ न झाल्यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला.
शहरातील सावरकर चौक येथील ओम बेकरी समोरील एका घराच्या अंगणात असलेला अवाढव्य वृक्ष कोसळल्यामुळे याठिकाणी बाजूला असणार्‍या इमारतीच्या संरक्षण कठड्याचे नुकसान झाले. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. एमएमआरडीएच्या ओरियन मॉल समोरील रस्त्यावर एक कार पाण्यात अडकली.

बदलापुरात विजेचा खेळखंडोबा
बदलापुरात विजांसह जोरदार पाऊस झाला. पाऊस वार्‍यामुळे पूर्वेकडील कात्रप भागातील वीजपुरवठा मेन लाईन तुटल्याने खंडित झाला. सबस्टेशनजवळ अंडरग्राऊंड इनकमर केबलमध्ये बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झालेला असल्याचे महावितरणच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. अशा प्रकारे सातत्याने काही ना काही बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित होण्याचे सत्र उन्हाळा सुरू झाल्यापासून सुरूच आहे. झाडांच्या फांद्यांची छाटणी, किरकोळ दुरुस्ती आदी मान्सून पूर्व कामे करण्यासाठी महावितरण वीजपुरवठा खंडित करीत आहे. त्यामुळे पावसाळ्यात होणारी संभाव्य गैरसोय टळेल. असे नागरिकांना वाटत होते. परंतु त्यानंतर पावसाच्या सुरुवातीलाच महावितरण हतबल झाल्याचे चित्र बदलापूरमध्ये दिसले.

- Advertisement -

ठाकुर्लीत गुडघाभर पाणी
डोंबिवली । मुसळधार पावसामुळे ठाकुर्ली रेल्वे स्थानकाबाहेर गुडघाभर पाणी साचले होते. रेल्वे फाटक बंद केल्यानंतर रेल्वेने त्याठिकाणी सिमेंट काँक्रीटची भिंत उभारली आहे. मात्र पावसाचे पाणी जाण्यासाठी कोणताही मार्ग ठेवण्यात आला नसल्याने याठिकाणी पाणी साचून राहिले. मात्र ही रेल्वेची मालमत्ता असल्याने हद्दीचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर साचलेल्या पाण्याचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी धाव घेत पालिकेकडून पाण्याचा निचरा करण्यात आला. मात्र रेल्वेच्या नियोजनशून्य कारभाराचा स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ठाकुर्ली रेल्वे फाटकातून पूर्व व पश्चिमेला जाण्यासाठी मार्ग होता. मात्र वर्षभरापासून पूर्व व पश्चिमेला रेल्वे पादचारी पूल बांधण्यात आल्याने रेल्वे प्रशासनाने रेल्वे फाटक बंद करून त्याठिकाणी रस्त्याला आडवी काँक्रीटची भिंत बांधली आहे. मात्र पावसाचे पाणी जाण्यासाठी कुठूनही मार्ग ठेवता नव्हता. गुरुवारी जोरदार पाऊस पडल्याने या ठिकाणी पाणी साचले होते. शुक्रवारीही जोरदार पावसामुळे साचलेल्या पाण्याला तळ्याचे स्वरूप आले होते. हा परिसर रेल्वेचा असल्याने पालिकेच्या कर्मचार्‍यांनी याकडे कानाडोळा केला हेाता. रेल्वे प्रशासनाकडूनही या समस्येकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना खूपच त्रास होत असल्याने सोशल मिडीयावर हे व्हिडीओ व्हायरल झाले होते. अखेर मनसेचे शहर अध्यक्ष राजेश कदम गटनेता मंदार हळबे, स्थानिक रहिवासी धनंजय चाळके यांनी घटनास्थळी धाव घेतली. पालिकेच्या कर्मचार्‍यांना पाचारण केल्यानंतर त्यांनी साचलेल्या पाण्याला तातपुरता मार्ग काढला. मात्र पाणी साचू नये यासाठी रेल्वे प्रशासनाने त्वरीत कार्यवाही करावी, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली.

उल्हासनगरात बाजारपेठा पाण्यात
उल्हासनगरातील उच्चभ्रु वसाहती-बाजारपेठा पाण्यात गेल्या असून नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. यात विशेषताः प्रचंड प्रमाणात फर्निचरचे नुकसान झाले आहे. नेहरू चौक, हनिमून कॉटेज, रिजेंसी मैरेज हॉल, वुडलॅन्ड कॉम्प्लेक्स,पूरब पच्छिम अपार्टमेंट, गोल्डन पार्क, कुमार डिपार्टमेंट, मध्यवर्ती शासकीय हॉस्पिटल रोड, गोल मैदान, लिंक रोड, अमन टॉकीज रोड, सपना गार्डन आदी उच्चभ्रु परिसर व येथील बाजारपेठा पाण्यात गेल्या.
शुक्रवारी सकाळ ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत उल्हासनगरात 78 मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती तहसीलदार विजय वाकोडे यांनी दिली.

ठाणे शहरात वाहतूक कोंडीत भर
ठाण्यात दुपारी महाकाली तलाव, सरस्वती इंग्रजी शाळा, कामगार हॉस्पीटल, बी-केबीन, बाळकुम, उथळसर नाका, माजीवडा येथे पाणी साचले होते. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार महापालिकी हद्दीत 446 मिमी पावसाची नोंद झाली. पावसामुळे झाड कोसळणे, पाणी साचणे अशा 21 तक्रारी दाखल झाल्या होत्या. घोडबंदर मार्गावरील काही भागात पाणी साचले होते. तसेच कापूरबावडी ते पातलीपाडापर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेने येणार्‍या प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. कळव्याहून नवी मुंबईच्या दिशेने ये-जा करणार्‍या मार्गावरही वाहतूक कोंडी झाली होती.

पावसामुळे ठाणे, डोंबिवली, कल्याण तसेच कर्जत-कसार्‍याहून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या हजारो प्रवाशांना उशिराने धावणार्‍या लोकलचा मनस्ताप सहन करावा लागला. जलद आणि धिम्या मार्गिकेवरील लोकल रखडत रखडत जात असल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकजवळील रेल्वे रूळावरही दुपारी पाणी साचण्यास सुरुवात झाली होती. नौपाडा येथील भक्ती मंदिर परिसरात झाड कोसळून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारचे नुकसान झाले. शहराच्या विविध भागातील वीज पुरवठा खंडीत झाला.

गेल्या वर्षीच्या पुराची यंदाही भीती
पहिल्याचा पावसात वसईतील मुख्य रस्ते बुडाल्यामुळे महापालिकेने केलेल्या नालेसफाईचा दावा खोटा ठरला आहे. त्यामुळे मोठ्या पावसात यंदाही वसई बुडण्याचे संकेत मिळाले आहेत. गेल्या वर्षी 8 जुलैपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे 9 तारखेपासून 12 तारखेपर्यंत वसई तालुक्यात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यात सहा जण दगावले होते. नालेसफाई न झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली होती. यंदा पहिल्याच पावसात नालासोपर्‍यात कंबरेइतके पाणी झाले होते.

वसई का बुडाली यावर उहापोह करून त्याची कारणे आणि त्यावरील उपाय, नागरिकांच्या सूचना विचारात घेण्याची मागणी विविध पक्ष, संघटना आणि संस्थांनी केली होती. परिणामी 12 कोटी रुपये खर्चून महापालिकेने निरी आणि आयआयटी या संस्थांची नेमणूक केली होती. या संस्थांनी दिलेल्या अहवालात दिखाऊ कामांमुळे वसई जलमय झाल्याचा ठपका ठेवण्यात आला.

भिवंडीत भिंत कोसळली
पंधरा दिवसांपूर्वी हजेरी लावलेल्या पावसात बळीराजाने भाताची पेरणी केली होती. त्यानंतर पाऊस गायब झाला होता. त्यामुळे वरुण राजाच्या दमदार हजेरीने पेरण्या बचावल्या आहेत. तर शिंपणीने लागवड केलेल्या भाजीपाल्याला देखील जीवदान मिळाले आहे. शुक्रवारीही संततधार कायम असल्याने वीज पुरवठा खंडीत झाला. शहरातील निजामपुरा, धामणकर नाका, कामतघर, कणेरी, कमला हॉटेल, नारपोली, पद्मानगर, तीनबत्ती चौक, शिवाजीनगर भाजीमार्केट, नझराना कंपाउन्ड भागातील रस्ते जलमय झाले तसेच घरे दुकानात पाणी शिरले. देवजीनगर, टावरे कंपाउन्डमध्ये झाड पडले. तर शहरातील संगमपाडा येथील पालिका कर्मचारी वसाहतीच्या कंपाऊण्डची भिंत कोसळली. तसेच रावजीनगर व शांतीनगर भागात कमकुवत घराच्या भिंती कोसळल्या मात्र सुदैवाने या घटनांमध्ये कोणीही जखमी झाले नाही. पावसाचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे कल्याण रोड, अंजूरफाटा, रांजणोली बायपास चौक, वंजारपट्टी नाका, नारपोली व शेलार आदी मार्गावरील वाहतूक कोलमडली होती.

एमएसआरडीसी अधिकार्‍यांची हलगर्जी
एमएसआरडीसी अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे कल्याण-भिवंडी मार्गावरील कोनगावातील रस्त्यावर ‘पाणीच पाणी’ साचल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली. विशेष म्हणजे कोन ग्रामपंचायतच्या सरपंच, सदस्यांनी एमएसआरडीसी अधिकार्‍यांकडे गेल्या तीन महिन्यात तब्बल 10 ते 12 वेळा लेखी पत्रव्यवहार करून रस्त्याच्याकडेला असलेल्या गटारी नाले साफसफाई करणे, रस्त्यावरील बंद अवस्थेत असलेल्या लाईटची दुरुस्ती करणे तसेच रस्त्यावर साचलेला कचरा साफ करण्यासाठी मागणी केली आहे. मात्र तीन महिन्यापासून पावसाळ्यापूर्वी करण्यात येणार्‍या या कामाकडे दुर्लक्ष करून एमएसआरडीसी अधिकार्‍यांनी हलगर्जीपणा केल्यामुळे हा भाग जलमय झाला.

मायलेक पडले उघड्या गटारात
भिवंडी-ठाणे रोडवरील राहनाळ इथे होलिमेरी शाळेच्या समोरच असलेल्या उघड्या गटारात विद्यार्थी आणि तिची आई गटारात पडली होती. त्यावेळी तेथील नागरिकांनी पाहिले असता त्यांनी दोघींना वेळीच बाहेर काढल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत. मात्र उघड्या गटारामुळे रोज शाळेत येणार्‍या शेकडो विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका कायम आहे.

शहापूर-मुरबाड वाहतूक ठप्प
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते विकास महामंडळाकडून काम सुरू असलेल्या शहापूर मुरबाड रस्त्याचे रुंदीकरण व नुतनीकरणाचे काम करणार्‍या कंत्राटदार कंपनीने कासवगतीने सुरू केल्याने पहिल्याच जोरदार पावसात शहापूर-मुरबाड वाहतूक ठप्प झाली. पावसामुळे हा रस्ता पाण्याखाली गेला. त्यामुळे 15 गावे व 20 आदिवासी वाड्यांचा संपर्क तुटला. त्यामुळे परिसरातील नडगाव, गोकुलगाव, लेणाड बू, लेनाड खु, भटपाडा, नेहरोली, जांभा, शेंद्रून, ठीले, टेंभरे, कलगाव, दहीवली, भागदल, अल्यानी,चिंचवली, गेगाव व नांदवल या गावातील ग्रामस्थांना गावातच अडकून पडावे लागले. या मार्गावर शेकडो वाहने अडकून पडली होती. त्यांना स्थानिक ग्रामस्थांनी आसरा दिला. वासींद स्टेशनजवळ एक झाड रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक कोंडी झाली.

कसार्‍यात बळीराजा सुखावला
गुरुवारी सकाळी कसारा, वाशाळा,लतीफवाडी आणि घाट आदी भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. जवळपास सर्वच ठिकाणी जोरदार पाऊस पडला. दडी मारलेल्या पावसाने पुन्हा जोर धरला असून सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.आता भात शेतीच्या कामांना गती येणार आहे. पावसाने काही ठिकाणी नुकसान झाले आहे. मोखावणे ग्रामपंचायत हद्दीतील पाटीलवाडी विभागात डोंगर कुशीत वसलेल्या एका घराचे नुकसान झाले असून घराचा जोता आणि पत्र्याचे शेड जमीनदोस्त झाले आहे. माणिक काळू हिरवे यांच्या घराचे नुकसान झाले असल्याची माहिती राजू पारधी या ग्रामस्थांने दिली आहे. तर उंबरमाळी, विहिगाव,माळ,वाशाळा या परिसरातील शेतकर्‍यांच्या शेतात पाणी गेल्याने तळे साचल्याचे चित्र निर्माण झाले आहे. काही ठिकाणी शेतात पाणी साठून केलेली बांधबंदिस्ती फुटून जाण्याच्या स्थितीत आहेत. तर काही भागात झाडे उन्मळून पडली आहेत. हा पाऊस पेरणीनंतरच्या शेतीच्या कामासाठी उपयोगी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -