घरक्रीडाअपराजित भारत

अपराजित भारत

Subscribe

वर्ल्डकप स्पर्धेत विराट कोहलीच्या भारतीय संघाने विजयी मालिका कायम राखताना विंडीजवर १२५ धावांनी विजय मिळवला. एकेकाळी जलदगती गोलंदाजांचा तोफखाना बाळगणार्‍या विंडीजला ओल्ड ट्रॅफर्डवर जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी यांच्या आक्रमणाचा मुकाबला करता आला नाही. वर्ल्डकप स्पर्धेत १९९२ नंतर विंडीजला भारतावर मात करता आलेली नाही. यावरुनच विंडीजच्या अधोगतीचे चित्र स्पष्ट हेाते. यंदाच्या स्पर्धेत पाकवरील एकमेव विजयाचा अपवाद वगळता विंडीजला ५ पराभवांना सामोरे जावे लागले आहे.

शिखर धवनला दुखापत झाल्यामुळे लोकेश राहुलला सलामीला बढती मिळाली. पाकविरुध्द अर्धशतकी खेळी करताना त्याने रोहितच्या साथीने शतकी सलामी दिली. अफगाणिस्तानविरुध्द ३ तर कॉटरेल, रोच, होल्डर, थॅामस या विंडीजच्या तेज चौकडीचा नेटाने मुकाबला करता राहुलने ६४ चेंडूत ४८ धावा केल्या. विराट कोहली, धोनी या आजी-माजी कर्णधारांनी अर्धशतकी खेळी करत भारताला २५० पार नेले. हार्दिक पांडयाची ४६ धावांची खेळी उपयुक्त ठरली. ओल्ड ट्रॅफर्डच्या खेळपट्टीवर ३०० चा टप्पा गाठणे अवघड होते, याची जाणीव ठेवूनच कोहली प्रभृतीनी खेळ केला.

- Advertisement -

२५ जूनला भारतीय क्रिकेटमध्ये आगळेच महत्व आहे. लॉर्ड्सवर २५ जून १९३२ रोजी भारताने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. २५ जून १९८३ रोजी लॉर्डसवरच कपिल देवच्या भारतीय संघाने क्लाईव्ह लॉईडच्या विंडीजवर ४३ धावांनी विजय मिळवून प्रुडेन्शियल वर्ल्डकप पटकावला. त्यानंतर विंडीजला आजतागायत वर्ल्डकपची अंतिम फेरी गाठता आलेली नाही! वर्ल्डकपमध्ये विंडीजला पराभवाचा पहिला दणका दिला तो कपिलच्याच संघाने ओल्ड ट्रॅफर्डवर, ९-१० जून १९८३ रोजी भारताने विंडीजवर वर्ल्डकप साखळी सामन्यात ३४ धावांनी विजय मिळविला. इथेच वर्ल्डकप जेतेपदाची चुणूक भारताने दाखवली. रवी शास्त्रीने माल्कम मार्शल (२), मायकेल होल्डिंग (८) , जोएल गार्नर (३७) यांना माघारी पाठवून भारताला विजय मिळवून दिला.

९ बाद १५७ अशी विंडीजची अवस्था झाली होती, अँडी रॉबर्ट्स (नाबाद ३७) जोएल गार्नर या अखेरच्या जोडीने किल्ला लढवत ६१ धावांची भागी रचली. पावसाच्या व्यत्ययामुळे ६० षटकांचा हा सामना दुसर्‍या दिवशी खेळवण्यात आला. गार्नर, रॉबर्ट्सची ही तळाची जोडी फुटत नव्हती. त्यामुळे सुनील गावस्करने कर्णधार कपिल देवला रवीच्या हाती गोलंदाजीसाठी चेंडू देण्याचा सल्ला दिला. रवीने गार्नरला चकवून किरमाणीकरवी यष्टिचीत केले आणि भारताचा विजय साकारला. अँडी रॉबर्ट्स ३७ धावांवर नाबाद राहिला.

- Advertisement -

पहिल्यावहिल्या वर्ल्डकपमध्ये (१९७५) भारत व विंडीज वेगवेगळ्या गटात असल्यामुळे त्यांची आपापसात लढत झाली नाही. १९७९ च्या वर्ल्डकपमध्ये विंडीजने भारताला सहज नमवले. या सामन्यात गार्नर, रॉबर्ट्स, होल्डिंग, क्रॉफ्ट या विंडीजच्या तोफखान्यासमोर गुंडप्पा विश्वनाथने ७९ धावांची बहारदार खेळी केली. परंतु, ती व्यर्थ ठरली. १९९२ च्या वर्ल्डकप स्पर्धेत विंडीजने भारताला नमवले. १९९६ वर्ल्डकपमध्ये विंडीजने उपांत्य फेरी गाठली, पण ऑस्ट्रेलियाने त्यांना हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. १९९६ नंतर मात्र विंडीजला वर्ल्डकपमध्ये आपली छाप पाडता आली नाही. भारतीय संघाने मात्र १९८३ च्या जेतेपदानंतर मात्र २-३ अपवाद वगळता (१९९२, १९९९, २००७) किमान उपांत्य फेरी गाठली. २०११ मध्ये वानखेडे स्टेडियमवर भारताने श्रीलंकेचा पराभव करुन दुसर्‍यांदा वर्ल्डकपवर आपले नाव कोरले. धोनीच्या षटकाराने भारताचा विजय साकारला. अष्टपैलू युवराजने स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान संपादला.

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये विराट कोहलीचा भारतीय संघ अपराजित असून ११ गुणांसह ऑस्ट्रेलियापाठोपाठ दुसर्‍या क्रमांकावर आहे. रविवारी भारताची गाठ पडेल यजमान इंग्लंडशी. त्यानंतर बांगलादेश, श्रीलंका यांच्याशी भारताचे सामने बाकी असून यापैकी एक सामना जिंकला तरी भारताचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित होईल. सध्याचा भारतीय संघाचा फॉर्म पाहता प्रतिस्पर्ध्यांना भारतावर विजय मिळवणे कठिण दिसते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -