घरमुंबईईव्हीएम घोटाळ्यात भाजपने सेनेच्या ४ जेष्ठ नेत्यांना पाडले!

ईव्हीएम घोटाळ्यात भाजपने सेनेच्या ४ जेष्ठ नेत्यांना पाडले!

Subscribe

राज ठाकरेंचा घणाघाती आरोप

शिवसेनेच्या चार ज्येष्ठ खासदारांना मंत्रीपद द्यायचे नव्हते, म्हणून त्यांना ईव्हीएमचा घोटाळा करून पाडण्यात आले, असा घणाघाती आरोप करत असताना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी या चार खासदारांची यादीच वाचून दाखवली. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शुक्रवारी वांद्रे येथे कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करत असताना भाजपवर हा खळबळजनक आरोप केला.

शिवसेनेचे ज्येष्ठ खासदार आनंदराव अडसूळ हे अमरावतीमधून पराभूत झालेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत नवनीत कौर राणा यांनी त्यांचा पराभव केला. शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवेसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव राष्ट्रवादीच्या डॉ. अमोल कोल्हे यांनी केला. या दोघांना हरवण्याचे आधीच ठरवले होते, याकडे राज यांनी लक्ष वेधले.

- Advertisement -

याचबरोबर औरंगाबाद मतदारसंघात शिवेसेनेचे ज्येष्ठ खासदार चंद्रकांत खैरे यांचाही पराभव करण्यात आला, असे राज म्हणाले. हिंदू-मुस्लिम तणाव निर्माण करण्यासाठी एक माणूस या लोकांना हवाच होता. त्यामुळे याठिकाणी एमआयएमचा खासदार निवडून आणण्यात आला. ज्यामुळे एमआयएमकडे सातत्याने बोट दाखवून धार्मिक तणाव वाढवता येईल. रायगड लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार हे सोळाव्या लोकसभेत मंत्री होते. त्यांचाही यावेळी पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरे यांनी त्यांचा पराभव केला. यावर राज यांनी प्रकाश टाकला.

काँग्रेसचा एकच खासदार निवडून आला, यावर राज म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या एक आठवड्यापूर्वी एक माणूस शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आला. जो काँग्रेसलाच नको होता. तोच निवडून आला आणि बाकी सगळे काँग्रेसवाले पडले, हे कसं काय झालं?

- Advertisement -

ईव्हीएमविरोधातील मोर्चा पुढे ढकलला

येत्या २१ मार्चला राज ठाकरे यांच्यासोबतच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमान शेतकरी संघटना अशा सर्वच विरोधी पक्षांनी ईव्हीएमविरोधात मुंबईत मोर्चा काढण्याचे जाहीर केले होते. मात्र, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक या जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा २१ तारखेला होणार नसून पुढे ढकलण्यात आल्याचे स्वत: राज ठाकरेंनीच जाहीर केले. पुढच्या तारखेविषयी येत्या एक-दोन दिवसांमध्ये कळवले जाईल, असे राज यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -