घरमुंबईभिवंडीत आदिवासी विकास महामंडळाचा धान भरडाई घोटाळा

भिवंडीत आदिवासी विकास महामंडळाचा धान भरडाई घोटाळा

Subscribe

गोंदियाचा ट्रान्सपोर्ट पास घेऊन ही गाडी हा भात वसई तालुक्यात भिनार येथे विकण्यासाठी घेऊन जात असताना कार्यकर्त्यांनी पकडून गणेशपुरी पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.

भिवंडीत अंबाडी-वज्रेश्वरी रस्त्यावर तिरंगा हॉटेलसमोर श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शासनाने भरडाईसाठी हमी भावात खरेदी केलेल्या भाताचा ट्रक काळ्या बाजारात नेत असताना पकडला आहे. ट्रकमध्ये भाताच्या गोणी आढळल्या आहेत. या ट्रकमध्ये भरलेला भात हा गोंदिया जिल्ह्यातील मिलर्सला भरडाईसाठी दिल्याचे दाखवण्यात आले आहे. गोंदियाचा ट्रान्सपोर्ट पास घेऊन ही गाडी हा भात वसई तालुक्यात भिनार येथे विकण्यासाठी घेऊन जात असताना कार्यकर्त्यांनी पकडून गणेशपुरी पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.

भाताची काळ्याबाजारात विक्री

महिन्याभरापूर्वी श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी शहापूर येथे कर्नाटक येथून बेकायदा येणारे तांदूळ पकडल्याची घटना घडली होती. त्यानंतरही महाराष्ट्र्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ आणि परजिल्ह्यातील व्यापारी, मिलर्स यांचे साटेलोटे कायम असल्याचे उघड झाले आहे. पालघर ते गोंदिया असे तब्बल २५० ते ३०० रुपये प्रती क्विंटल वाहतूक भत्ता घेऊन हा भात उचलला जातो. मात्र गोंदिया येथे भरडाईसाठी न नेता हा भात काळ्याबाजारात स्थानिक पातळीवर अथवा गुजरातमध्ये व्यापाऱ्यांना विकला जात असल्याची माहिती श्रमजीवी संघटनेचे युवक जिल्हा प्रमुख प्रमोद पवार यांनी दिली आहे.

- Advertisement -

असा उघडकीस आला काळा बाजार

आदिवासी विकास महामंडळाच्या गोदामातून उचललेला भात हा काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येणार आहे, अशी माहिती श्रमजीवी संघटनेला मिळाल्याने त्यानुसार पाळत ठेवून हा भाताचा ट्रक पकडण्यात आला आहे. यावेळी गोंदिया येथील मिलर्स मुकेश जैन यालाही ट्रकसोबत पकडून गणेशपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या ट्रकसाठी दोन पास तयार करण्यात आल्याचे तपासात आढळून आले आहे. एक वसईसाठी तर दुसरा गोंदियाकडे जाण्यासाठी असे एकाच ट्रकच्या नावे दोन पास आढळून आल्याने यामध्ये मोठा काळाबाजार दिसून येत आहे.

या भात घोटाळ्यात शासन खरेदी करत असलेल्या एक ते सव्वा लाख टन भाताच्या या बोगस वाहतुकीत शासनाचे १० ते १२ कोटी रुपयांची लूट करून हा भात काळ्या बाजारात विकून अपहार केला जात असल्याचे पकडण्यात आलेल्या ट्रकवरून उघड झाले आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ स्थानिक शेतकऱ्यांकडून हमी भावाने भात खरेदी करीत आहे. हा भात टेंडर प्रक्रिया करून भरडाईसाठी मिलर्सला देऊन त्याची भरडाई करून त्याचे तांदुळ रास्त भाव दुकानात पुरवठा केला जातो. हे काम देताना स्थानिक राईस मिलर्सला प्राधान्य देण्याचे शासन निर्णयात नमूद केले आहे. या प्रमाणे २ स्थानिक मिलर्सने आम्ही १०० टक्के मिलिंग करण्यास तयार असल्याची हमी देणारे पत्र देखील स्थानिक मिलर्सने आदिवासी महामंडळाकडे दिले आहे. असे असताना खूप मोठ्या रक्कमेचा वाहतूक खर्च देऊन हा भात गोंदिया, भंडारा, रायगड आदी ठिकाणच्या मिलर्सला देण्यात येत आहे. परिणामी हा खरेदी केलेला भात काळ्याबाजारात विकला जातो आणि मग त्या बदल्यातील तांदूळ देताना कर्नाटक किंवा आंध्रप्रदेश येथून निकृष्ट दर्जाचा तांदूळ आणून रेशनिंग दुकानांमधून दिला जात आहे.

- Advertisement -

आदिवासी विकास महामंडळाकडे खुलासा मागितला

पकडण्यात आलेला ट्रक गणेशपुरी पोलिसांच्या ताब्यात दिला असून पोलिसांनी शुक्रवारी या भाताच्या चौकशीसाठी विक्रमगड येथील महाराष्ट्र्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना लेखी पत्र देऊन खुलासा करण्यास सांगितले आहे. त्यानंतर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती गणेशपुरी पोलीस ठाण्याचे इन्चार्ज एपीआय महेश सगडे यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -