घरमुंबईठाण्यात रिक्षा चालकांकडून लूटमार सुरूच

ठाण्यात रिक्षा चालकांकडून लूटमार सुरूच

Subscribe

प्रवासी आणि रिक्षाचालक यांच्यात खटके उडत असल्याचे प्रकार दृष्टीस पडत आहे. रिक्षा चालकांच्या मुजोरीला आळा घालून कडक कारवाई करावी, अशी मागणी ठाणेकरांमध्ये होत आहे.

शहरात रिक्षा चालकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारून प्रवाशांची लूटमार सुरू असल्याचा प्रकार सुरू आहे. प्रवाशांकडून वाहतूक विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या. त्या तक्रारीनुसार पोलिसांनी धडक कारवाई केली. मात्र रिक्षा चालकांची लुटमार अजूनही थांबलेली नाही. त्यामुळे प्रवासी आणि रिक्षाचालक यांच्यात खटके उडत असल्याचे प्रकार दृष्टीस पडत आहे. रिक्षा चालकांच्या मुजोरीला आळा घालून कडक कारवाई करावी, अशी मागणी ठाणेकरांमध्ये होत आहे.

स्टॅन्डपासून दूर रिक्षा उभ्या करतात

ठाणे हे सर्वाधिक गर्दीचे रेल्वे स्थानक म्हणून ओळखले जाते. रेल्वे स्थानकातून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. ठाणे पश्चिमेकडील रेल्वे स्थानकाबाहेर सॅटीसखाली रिक्षा थांबा आहे. येथून मीटर पद्धतीने प्रवासी भाडे आकारले जाते. मात्र या स्टॅन्डपासून काही अंतरावर भर रस्त्यात रिक्षा उभ्या केल्या जातात. मुख्य थांबा सोडून या रिक्षा उभ्या असतात. रस्त्यात अस्ताव्यस्तपणे उभ्या असलेल्या रिक्षांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. मात्र या रिक्षाचालकांकडून प्रवाशांची सर्रासपणे लुटमार सुरू असते.

- Advertisement -

रिक्षाचालकांच्या लुटमारीवर प्रवासी नाराज

घोडबंदर हिरानंदानी अथवा मानपाडा परिसरातील लांबचे प्रवासी भाडे घेतले जातात. मात्र प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारले जाते. या ठिकाणी जाण्यासाठी मीटरने साधारण ६० ते ७० रूपये भाडे होते. मात्र रस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षाचालकांकडून शंभर ते दीडशे रूपये मागणी केली जाते. ठाणे शहरात थांबा सोडून रस्त्यावर अशा अनेक रिक्षा उभ्या असून या रिक्षा चालकांकडून अक्षरश : प्रवाशांची लुटमार होत आहे. मात्र अस्ताव्यस्तपणे उभ्या असलेल्या वा वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या रिक्षांवर वाहतूक पोलिसांकडून कानाडोळा केल्याचेच पाहावयास मिळत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. रिक्षा चालक मनमानीपणे भाडे वसुली करीत असल्याची तक्रार काही प्रवाशांनी ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्याकडे केली होती. त्यांनी वाहतूक पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्यासह ठाणे रेल्वे स्थानक परिसराचा दौरा केला. त्यावेळी अव्वाच्या सव्वा भाडे आकारणाऱ्या व प्रवाशांशी उद्धटपणे वर्तन करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करण्याचे आदेश वाहतूक पोलिसांना दिले होते. त्यानुसार वाहतूक पेालिसांकडून कारवाई सुरू आहे. मात्र पुन्हा जैसे थे असाच प्रकार सुरू आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर ऐकायला मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -