राज्यपालांच्या अभिभाषणावरून वादाची नांदी; रोहित पवार म्हणतात….

रोहित पवारांचं हे ट्वीट सध्या प्रचंड चर्चेत आलं आहे.

rohit-pawar-slams-maharashtra-budget-session-2023

Maharashtra Budget Session 2023: राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. आजपासून सुरू झालेले अधिवेशन वेगवेगळ्या वादामुळेअधिकच गाजणार असं चित्र दिसतंय. या वादाची सुरूवात राज्यपालांच्या अभिभाषणाने झाली आहे. नुकतंच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर टीका केलीय. “दिल्लीच्या प्रभावाने सरकारलाच मराठीचा विसर पडलाय” असं रोहित पवार यांनी म्हटलंय.

आजपासून शिंदे-फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होते. त्यानुसार, महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस यांनी अभिभाषण करत अधिवेशनाची सुरूवात केली. या अभिभाषणात राज्यपालांनी राज्य सरकारच्या कामांची, मदतनिधीची, तसेच वेगवेगळ्या योजना राबवणार असल्याची माहिती दिली. या अधिवेशनात विरोधकांकडून सरकारला विविध मुद्द्यांवरून घेरण्याचा प्रयत्न होणार हे उघड उघड दिसत होतं. याला अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच सुरूवात झाली आहे. आजच्या राज्यपालांच्या अभिभाषणावरून विरोधकांनी टीकेला सुरूवात केली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी नुकतंच त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून एक ट्विट शेअर केलंय. “आज #मराठीभाषागौरवदिन असताना राज्यपाल महोदयांनी अभिभाषण मराठीत केलं असतं किंवा भाषणाची सुरवात जरी मराठीत केली असती तरी मराठी मनाला आनंद झाला असता. पण यात राज्यपालांचीही चूक नाही. अभिभाषण तर राज्य सरकार तयार करत असतं! कदाचित दिल्लीच्या प्रभावाने सरकारलाच मराठीचा विसर पडलाय!” असं त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलंय.

राज्यपालांच्या अभिभाषणावरून टीका होण्याची ही काही पहिली वेळ नाही, यापूर्वीही अनेकदा अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावरून टीकासत्र सुरू झालं होतं. रोहित पवारांचं हे ट्वीट सध्या प्रचंड चर्चेत आलं आहे.