घरमुंबईमहापालिका सुधार समितीसाठी सदा परब, बेस्टसाठी प्रविण शिंदे यांना उमेदवारी

महापालिका सुधार समितीसाठी सदा परब, बेस्टसाठी प्रविण शिंदे यांना उमेदवारी

Subscribe

 राहुल शेवाळेंच्या गटाला धक्का

मुंबई महापालिकेच्या सुधार समिती अध्यक्षपदी कोण याबाबत तर्क लढवले जात असताना परिवहन मंत्री अनिल परब यांचे अत्यंत विश्वासू असलेल्या सदा परब यांनाच पुन्हा संधी देत शर्यतीत असलेल्या घोड्यांना लगाम घातला. सदा परब हे सध्या सुधार समितीचे अध्यक्ष असून कोरोनाचा काळ येईपर्यंत त्यांनी आपले अध्यक्षपदाचा कार्यकाळ जवळपास पूर्ण केला होता. परंतु या कालावधीत त्यांना ठोस असे कोणतेही निर्णय घेता नाही. एक निष्क्रिय अध्यक्ष अशीच त्यांची ओळख होती. त्यामुळे त्यांना हटवले जाईल असे बोलले जात असतानाच त्यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली. तर आर्थिक संकटात असलेल्या बेस्टची धुरा जोगेश्वरी येथील प्रविण शिंदे यांच्यावर सोपवून बेस्ट समिती अध्यक्षपदासाठी त्यांना उमेदवारी जाहीर केली.

सुधार समिती व बेस्ट समिती अध्यक्षपदाची निवडणूक ६ ऑक्टोबर रोजी होत असल्याने या समितीच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेने अनुक्रमे सदा परब व प्रविण  शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली.  त्यांनी गुरुवारी सकाळी आपले उमेदवारी अर्ज बेस्ट उपक्रमाच्या चिटणीस यांना सादर केले. यावेळी सभागृहनेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यासह शिवेसना नगरसेवक उपस्थित होते. तर भाजपच्यावतीने सुधार समिती अध्यक्षपदासाठी विनोद मिश्रा आणि बेस्ट समिती अध्यक्षपदासाठी प्रकाश गंगाधरे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. यासर्वांनी गुरुवारी आपले उमेदवारी अर्ज बेस्ट उपक्रमाच्या चिटणीस यांना सादर केले. यावेळी भाजपचे महापालिका गटनेते प्रभाकर शिंदे यांच्यासह पक्षाचे नगरसेवक उपस्थित होते. तर काँग्रेसच्यावतीने बेस्ट समितीवर विरोधी पक्षनेते रवी राजा आणि सुधार समिती अध्यक्षपदासाठी जावेद जुनेजा यांनी आपले उमेदवारी अर्ज भरल्याने या निवडणुकीतील रंगत वाढणार आहे.

- Advertisement -

सुधार समिती अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत सदा परब यांना  कोणतेही धोरणात्मक निर्णय घेता आलेले नाही. महापालिकेची अनेक धोरणे महापालिका सभागृहात तसेच सुधार समितीत प्रलंबित असून अध्यक्ष या नात्याने होणारा पाठपुरावा करण्यात परब कमी पडताना दिसत आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांवर त्यांची वचक नसल्याने अनेक महत्वाचे प्रस्ताव पटलावर आणण्यात त्यांना अपयश आले होते. त्यामुळेच पक्ष त्यांना बाजुला करेल आणि राजू पेडणेकर यांना संधी देईल,असे वाटत होते. पण प्रत्यक्षात परब यांना कायम ठेवून अनिल परब यांनी महापालिकेतील आपले वजन राखले आहे.

सदा परब यांना सुधार समिती अध्यक्षपदी कायम ठेवतानाच शिवसेनेने बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांच्यावर अन्याय केला. सदा परब यांना पुढील सहा महिन्यांकरता अभय देताना पाटणकर यांच्यावर विश्वास न टाकता जोगेश्वरीतील नगरसेवक प्रविण शिंदे यांच्यावर विश्वास टाकला आहे. अध्यक्षपदाची ही निवड सहा महिन्यांकरताच असल्याने आर्थिक डबघाईला आलेल्या बेस्टला सावरण्यासाठी अनिल पाटणकर यांचा अनुभव कामी आला असता. परंतु प्रविण शिंदे यांना उमेदवारी देत नवख्या अध्यक्षाच्या हाती बेस्टचा कारभार दिला. त्यामुळे पुढील सहा महिने असाच आढावा घेत निघून जाणार असून बेस्ट आणखी दिवाळखोरीत जाईल.त्यामुळे खऱ्या अर्थाने बेस्टचा अध्यक्ष कायम ठेवणे हे योग्य ठरले असते. पण पक्षाने पाटणकर यांना बाजुला करत एकप्रकारे त्यांच्यावरच अविश्वास व्यक्त केला.

- Advertisement -

 राहुल शेवाळेंच्या गटाला धक्का

शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक या चेंबूर-देवनारमधील आहेत. तर बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर हे चेंबुरमधील नगरसेवक आहेत. हे दोन्ही नगरसेवक खासदार राहुल शेवाळे यांच्या लोकसभा मतदार संघातील आहेत. त्यामुळे समितीवर पुन्हा अध्यक्षपदासाठी उमेदवारी देताना शेवाळे यांच्या गटातील नगरसेवकांना शिवसेनेला बाजुला केल्याचे दिसत आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -