घरमुंबईजिल्ह्यात सेना-भाजप संघर्ष बोईसरमध्ये बॅनरयुद्ध रंगले

जिल्ह्यात सेना-भाजप संघर्ष बोईसरमध्ये बॅनरयुद्ध रंगले

Subscribe

बोईसर शहरात भाजप मुक्त पालघर जिल्ह्याचे शिल्पकार असा मजकूर असलेल्या बॅनरवर जिल्ह्यातील प्रमुख भाजप पदाधिकार्‍यांचे फोटो झळकल्यानंतर सेना आणि भाजपमधील संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.

शिवसेनेने पालघर लोकसभा मतदारसंघ आग्रहाने खेचून घेतल्यानंतर त्याठिकाणी भाजपचे तत्कालीन खासदार राजेंद्र गावीत यांनाही पक्षात घेतले. लोकसभा निवडणुकीत गावीत शिवसेनेच्या तिकीटावर निवडूनही आले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत सेनेने वसई, नालासोपारा, बोईसर आणि पालघर या चार जागा आपल्याकडे घेतल्या. तर भाजपला फक्त डहाणू आणि विक्रमगड या दोनच जागा मिळाल्या. त्यामुळे संतापलेल्या भाजप पदाधिकार्‍यांनी नालासोपारा आणि बोईसर जागेसाठी आग्रह धरला होता. पण, शिवसेनेने आपला हट्ट न सोडल्याने विधानसभा निवडणुकीत त्याचे पडसाद उमटले.

- Advertisement -

बोईसर विधानसभा मतदारसंघात भाजपचे जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे यांनी बंडखोरी केली. पक्षाने त्यांची हकालपट्टी केली. मात्र, जनाठे यांच्या प्रचारात जिल्ह्यातील भाजपचे अनेक पदाधिकारी उघडपणे फिरताना दिसत होते. निवडणुकीत जनाठे यांनी तीस हजार मते मिळवली. तर शिवसेनेचे विलास तरे यांचा अवघ्या 2 हजार 752 मतांनी पराभव झाला. जनाठे यांच्यामुळेच तरे यांचा पराभव झाला. दुसरीकडे, नालासोपार्‍यातही भाजपचे अनेक पदाधिकारी शिवसेनेचा प्रचार करीत नव्हते. स्वतः राजन नाईक जनाठे यांच्यासाठी जास्त वेळ देत होते. त्यांचे समर्थकही शर्मा यांच्या प्रचारापासून अलिप्त राहिले होते. याठिकाणीही सेनेचे शर्मा यांना पराभव पत्करावा लागला.

एकीकडे, भाजपचे पदाधिकारी सेना उमेदवाराच्या प्रचारापासून अलिप्त राहिले असताना विक्रमगड आणि डहाणूत सेनेच्या पदाधिकार्‍यांनी भाजपपासून दूर राहणे पसंत केले. भाजपचे डहाणूचे आमदार पास्कल धनारे आणि विक्रमगडचे आमदार विष्णू सवरा यांचे पूत्र हेमंत सवरा यांना पराभवाचा सामना करावा लागला. लोकसभेची हक्काची जागा शिवसेनेने घेतली. आता हक्काचे दोन्ही आमदारही गेले. त्यामुळे पालघरमधून भाजपाचे अस्तिस्त संपुष्टात आले.

- Advertisement -

निकालानंतर काही दिवसातच बोईसर शहरात भाजपामुक्त पालघर जिल्हा, भाजपामुक्त पालघर जिल्ह्याचे शिल्पकार असे लागलेले बॅनर सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या बॅनरवर संतोष जनाठे, अर्चना वाणी, पास्कल धनारे, लाला वाजपेयी, महावीर सोलंकी, विभा देशमुख, बाबजी काटोले, राजन नाईक, लक्ष्मीदेवी हजारी यांचे फोटो आहेत. तसेच विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि हिंदू युवा वाहिनी यांची नावे आहेत. भाजपमुक्त पालघर जिल्ह्याला ही मंडळी जबाबदार असल्याचे बॅनरमधून सुचित करण्यात आले आहे.

बॅनरवर एका बाजूला भाजपचे कमळ चिन्ह तर दुसर्‍या बाजूला जनाठे यांची निशाणी कपबशी उलटी करून दाखवण्यात आली आहे. या बॅनरविरोधात जनाठे यांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर बोईसर पोलिसांनी शिवसेनेचे प्रभाकर राऊळ, राजू राठोड, जुमाणी आर्ट विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे. शहरातील वातावरण तंग झाल्यानंतर सर्व बॅनर काढून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे सेना आणि भाजपमधील संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.

जिल्ह्यात सेना-भाजप संघर्ष बोईसरमध्ये बॅनरयुद्ध रंगले
Shashi karpehttps://www.mymahanagar.com/author/shashi-karpe/
गेली २५ वर्षे मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पत्रकारिता. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण. वृत्तपत्र क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -