घरमुंबईचुकीच्या प्रश्नपत्रिकांचे सत्र सुरूच

चुकीच्या प्रश्नपत्रिकांचे सत्र सुरूच

Subscribe

विद्यापीठाच्या सावळा गोंधळाबाबत कारवाईची मागणी

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने यंदाही परीक्षांमध्ये गोंधळाची परंपरा कायम ठेवली आहे. प्रश्नपत्रिकेत जुने प्रश्न आणि एक प्रश्नपत्रिका तर गेल्या वर्षीची जशीच्या तशी चुकांसह देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. परीक्षा विभागाच्या या गोंधळाला सर्वस्वी कुलगुरू सुहास पेडणेकर जबाबदार असून या प्रकरणांची सखोल चौकशी करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी युवा सेनेच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्याकडे केली आहे.

विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या बॅचलर ऑफ इंजिनियरींग (आयटी)च्या स्टोरेज नेटवर्क मॅनेजमेंट रिट्रायव्हल या विषयाच्या प्रश्नपत्रिकेत अभ्यासक्रमाबाहेरचे प्रश्न असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता मॅकेनिकल इंजिनियरींगच्या रेफ्रिजरेशन अ‍ॅण्ड एअर कंडिशनिंग या विषयाची तसेच बॅचलर ऑफ इंजिनियरींगचा सोमवारी झालेल्या पेपरला विद्यार्थ्यांना गतवर्षीचीच प्रश्नपत्रिका चुकांसह देण्यात आल्याचे समोर आले आहे. विद्यापीठाकडून वारंवार प्रश्नपत्रिकेत होत असलेल्या चुकांमुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. विद्यापीठाच्या या भोंगळ कारभाराची तातडीने चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी युवा सेनेकडून करण्यात आली आहे.

- Advertisement -

मुंबई विद्यापीठाकडून 14 मे रोजी घेण्यात आलेल्या स्टोरेज नेटवर्क मॅनेजमेंट रिट्रायव्हल या विषयाच्या प्रश्नपत्रिकेत अभ्यासक्रमाबाहेरचे प्रश्न आल्याचे युवासेनेने विद्यापीठाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर विद्यापीठाने तज्ज्ञ समिती नेमली. या समितीने दोन प्रश्न चुकीचे असल्याचा अहवाल दिल्याने विद्यार्थ्यांचा पेपर 80 ऐवजी 70 गुणांमध्ये रूपांतरित करण्यात आले असून विद्यार्थ्यांना मिळणार्‍या एकूण गुणाच्या सरासरीनुसार 1 ते 10 गुण देण्याची वेळ विद्यापीठावर आली. हा प्रश्न सुटत नाही तोच पुन्हा विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या मॅकेनिकल इंजिनियरींगच्या रेफ्रिजरेशन अ‍ॅण्ड एअर कंडिशनिंग या विषयाची प्रश्नपत्रिका काही अल्पसे बदल करून जशीच्या तशी देण्यात आली. इतकेच नव्हे तर 20 मे रोजी झालेला बॅचलर ऑफ इंजिनियरींगचा पेपरही गतवर्षीचाच देण्यात आला. विशेष म्हणजे गतवर्षी असलेल्या चुकांसह तो पेपर आहे त्याचपद्धतीने दिला असल्याची माहिती मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य व युवासेना सदस्य प्रदीप सावंत यांनी दिली.

विद्यापीठात परीक्षेदरम्यान सुरू असलेला गोंधळ थांबत नसल्याने याला कुलगुरू सुहास पेडणेकर जबाबदार असल्याचा आरोप, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांना पत्र लिहून परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत झालेल्या गोंधळाला कुलगुरू व विद्यापीठ प्रशासन जबाबदार असल्याने या प्रकरणी त्यांची सखोल चौकशी करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -