घरमुंबईराष्ट्रवादीचे गोलमाल! शरद पवार म्हणतात- पक्षात फूट नाही; वेगळी भूमिका घेतलेल्यांना पुन्हा...

राष्ट्रवादीचे गोलमाल! शरद पवार म्हणतात- पक्षात फूट नाही; वेगळी भूमिका घेतलेल्यांना पुन्हा संधी नाही

Subscribe

मुंबईराष्ट्रवादी काँग्रसमध्ये फूट पडलेली नाही. एका गटाने वेगळा निर्णय घेतला आहे. त्याला फूट म्हणता येत नाही. ज्यांनी वेगळा निर्णय घेतला आहे त्यांना पुन्हा पक्षात संधी नाही. संधी एकदाच मिळते, परत मागायची नसते. असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष एकसंध असल्याचे सांगत अजित पवारांसाठी पक्षाचे दार बंद झाल्याचे संकेत दिले आहेत. पवारांची आज कोल्हापूरमध्ये सभा आहे. त्यासाठी ते बारामतीहून कोल्हापूरच्या दिशेने निघाले आहेत. बारामती येथून निघताना आणि सातारा येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. 

राष्ट्रवादी पक्षात फूट पडलेली नाही. काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली. त्याला फूट म्हणण्याचे कारण नाही. लोकशाहीत तो त्यांचा अधिकार आहे. असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामती येथील पत्रकार परिषदेत केले. त्यानंतर ते कोल्हापूरसाठी रवाना झाले. साताऱ्यात  पोहचल्यानंतर शरद पवारांनी पुन्हा माध्यमांशी संवाद साधला.  पत्रकार परिषदेत ते म्हणाले,  ‘अजित पवार हे आमचे नेते, असं मी  म्हटलेलं नाही. पहाटेच्या शपथविधीवेळी एकदा संधी दिली होती, परत संधी द्यायची नसते आणि मागायचीही नसते, असे म्हणत पवारांनी अजित पवारांसाठी राष्ट्रवादीचे दार बंद झाल्याचे संकेत दिले आहेत. एकीकडे सकाळी पक्षात फूट नाही म्हणायचे आणि दुपारी वेगळा मार्ग स्वीकारलेल्यांना पुन्हा संधी नाही म्हणायचे यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं चाललयं तरी काय, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.

- Advertisement -

हेही वाचा : शरद पवारांचे ‘त्या’ वक्तव्यावरून घुमजाव, म्हणाले – “मी असे…”

शरद पवारांचे तीन वक्तव्य : राष्ट्रवादीतील संभ्रम कायम

शरद पवार यांनी आज सकाळी बारामतीमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना पहिला प्रश्न चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यासंबंधी विचारण्यात आला. बावनकुळे म्हणाले आहेत की, लोकसभा निवडणुकीपर्यंत शरद पवार हे भाजपसोबत येतील. या प्रश्नावरुन पवार पत्रकारावर संतप्त झाले. त्यांनी पत्रकाराला मध्येच थांबवले आणि ते म्हणाले, “काहीही प्रश्न काय विचारता? थोडी अक्कल तर वापरा.”
सुप्रिया सुळे असे म्हणाल्या आहेत की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली नाही. अजित पवार आमचे नेते आहेत, यावर पत्रकारांनी पवारांची प्रतिक्रिया विचारली. त्यावर ते म्हणाले, “आहेच ना. यामध्ये वादच नाही. फूट पडणे याचा अर्थ काय… पक्षात फूट कधी होते? जर पक्षातील एक मोठा गट वेगळा झाला, देशपातळीवर, आज तशी स्थिती इथे नाही. काही लोकांनी समजा पक्ष सोडला. काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली. लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे. त्यांनी काही निर्णय घेतला, म्हणून फूट म्हणायचे काही कारण नाही. तो त्यांचा निर्णय आहे.” असे म्हणत शरद पवारांनी अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आठ नेत्यांपूरता एक गट बाहेर गेला आहे. तो गट म्हणजे पक्ष नाही किंवा ती पक्षातील फूट नाही, सांगितले आहे.
राष्ट्रवादीत फूट पडलेली नाही, या पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. 2019 च्या पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवार परत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले, तसेच आता पुन्हा एकदा ते परत येणार का? अशी चर्चा सुरु झाली. पवारांच्या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ राजकीय पंडित लावायला लागले. ही पवारांची गुगली आहे का? पवार जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करत आहेत का? अजित पवारांवर कोणतीही कायदेशीर कारवाई होऊ नये, पक्ष आणि चिन्ह सुरक्षित राखण्यासाठी पवारांनी अशा प्रकारचे वक्तव्य केले असण्याचीही शक्यता व्यक्त केली गेली. पवारांच्या वक्तव्यावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली, तेव्हाच पवार साताऱ्यात पोहचले आणि तिथे पुन्हा एकदा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

- Advertisement -

सकाळी केलेल्या वक्तव्यावरुन पवारांनी दुपारी यूटर्न घेतला आहे. ‘अजित पवार आमचे नेते आहेत, असं मी म्हणालो नाही.’ असं त्यांनी साताऱ्यातील पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. “सुप्रिया त्यांची (अजित पवार) धाकटी बहिण आहे. बहिण-भावाच्या नात्यातील सहजपणाने त्या बोलत असतील. तर त्याचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही,” असंही पवारांनी स्पष्ट केलं. “आज जी भूमिका आमच्या सहकाऱ्यांनी घेतली, ते आमचे कुणाचेही नेते नाहीत.” असं पवारांनी साताऱ्यात म्हटलं आहे.

हेही वाचा : ‘ही फूट नाही तर काय’? राऊतांचा थेट शरद पवारांना प्रश्न

संधी एकदाच, परत संधी मागायची नसते – शरद पवार

शरद पवारांनी अजित पवारांचे परतीचे दारही आज बंद केले असल्याचे संकेत दिले आहे. ते म्हणाले, “फूट म्हणजे एखादा मोठा गट फुटला तर त्याला फूट म्हणतात. आमच्यातल्या काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली. पहाटे शपथविधी झाला, त्यावेळी आम्ही त्यांना संधी दिली. आता परत संधी द्यायची नसते आणि मागायची नसते.” असं म्हणत शरद पवारांनी अजित पवारांचे परतीचे दोरही एक प्रकारे कापल्याचे संकेत दिले आहेत.

शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ‘इंडिया’ आघाडीत सहभागी आहे. त्यांनी या आघाडीसोबतच राहाण्याचा निर्धार वारंवार बोलून दाखवला आहे. मात्र राष्ट्रवादीत बंडखोरी करुन महायुतीसोबत गेलेल्या अजित पवार आणि इतर आठ नेत्यांविरोधात त्यांनी अद्याप कोणतीही ठोस कायदेशीर कारवाई केलेली नाही, किंवा त्यांच्याबद्दल जाहीर भाष्यही केले जात नाही, असा पवारांवर आरोप होतो.
कोल्हापूरमध्ये आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ‘निर्धार’ सभा आहे. या सभेत अजित पवारांबद्दलची भूमिका ते सविस्तरपणे स्पष्ट करतात का, हे पाहाणे औत्सूक्याचे राहाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -