घरमुंबईशरद पवारांची तिसरी पिढी मैदानात उतरणार

शरद पवारांची तिसरी पिढी मैदानात उतरणार

Subscribe

पुणे आणि रायगड अशा दोन जिल्ह्यांत विभागल्या गेलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघावर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लक्ष केंद्रित केले आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार रिंगणात उतरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. खुद्द शरद पवार यांनी याच मतदारसंघात गाठीभेटींना उधाण आणले असल्याने शिवसेनेला टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी मैदानात उतरली असल्याचे चित्र या मतदारसंघात तयार झाले आहे. अजून पार्थ पवार यांच्या राजकीय एंट्रीची अधिकृत घोषणा झाली नसल्याने इतर याच मतदारसंघातील भावी उमेदवार संभ्रमात आहेत.

मावळ मतदारसंघ हा पुणे जिल्ह्यातील मावळ, पिंपरी, चिंचवड आणि रायगड जिल्ह्यातील कर्जत, उरण, पनवेल हे विधानसभा मतदारसंघ मिळून तयार झाला आहे. याची भौगोलिक परिस्थिती पाहता मतदारसंघातील लोकांशी संवाद साधण्यासाठी अतिशय अवघड असा हा मतदारसंघ आहे. यावेळी शिवसेना हॅट्ट्रिक करणार की राष्ट्रवादी काँग्रेस सेनेचा बालेकिल्ला हिसकावून घेणार, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे हे मावळ लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार आहेत. लक्ष्मण जगताप (भाजपा), संजोग वाघिरे (राष्ट्रवादी काँग्रेस), माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे खासदार बारणे यांचे संभाव्य प्रतिस्पर्धी असल्याचे सांगण्यात येत आहे. याच मतदारसंघातील ३ विधानसभा मतदार संघ भाजपकडे, दोन शिवसेनेकडे तर एक राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे.

- Advertisement -

सहापैकी फक्त एकच विधानसभा राष्ट्रवादीकडे असल्याने इतर मतदारसंघावर सर करण्यासाठी राष्ट्रवादीला आपली प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार आहे. मावळ लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा गेल्या १० वर्षांपासून फडकत आहे. यावेळी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उडी घेतलेली पहायला मिळत आहे. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे या मतदारसंघामधून लढण्याची शक्यता आहे. पिंपरी-चिंचवड शहरामधील राजकारणात पार्थ पवार सक्रिय झाल्याचे समोर आले आहे. जर भविष्यात शिवसेना-भाजप युती झाली तर आणि शिवसेनेला मावळ लोकसभा मतदारसंघ सेनेला गेला, तर सेनेचा उमेदवार हा दुबळा ठरून त्यांचा पराभव देखील होऊ शकतो, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

मावळ मतदारसंघात प्रामुख्याने चिंचवड विधानसभा मतदारसंघातील रिंगरोडचा मुद्दा येणार्‍या लोकसभेला गाजण्याची चिन्हे दिसत आहे. तसेच, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आयोजलेली पवना धरण बंद जलवाहिनी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मावळमधील लोकांचा या बंद जलवाहिनी विरुद्ध मोठा जनआक्रोश बाहेर येणार आहे, या बंद जलवाहिनी विरोधात काही दिवसांपूर्वी मावळमध्ये या प्रकल्पाविरोधात मोठे जनआंदोलन उभे केले होते. त्यामध्ये या आंदोलनात तीन शेतकर्‍यांचा मृत्यूदेखील झाला होता. हा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित होऊ शकतो. उरण येथील जेएनपीटीचे प्रकल्पग्रस्त, CWC मधील स्थानिकांच्या नोकर्‍या, पनवेल-उरण लोकल रेल्वे, पनवेल- कर्जत लोकल सेवा, रसायनीतील HOC मधील प्रकल्पग्रस्त अद्यापही न्याय हक्कासाठी झगडत आहे. HOC प्रकल्प बंद झाला. परंतु त्यावरील १६०० एकर जागेवर पुन्हा HP कंपनीचा बाँटलिंग प्लांटला स्थानिक आणि प्रकल्पग्रस्तांचा असलेल्या विरोधाला कधीही विद्यमान खासदार अप्पा बारणे सामोरे गेले नाही. कधीही या बाबतीत केंद्रिय स्तरावरील अधिकार्‍यांना जमिनी हकीगत हाताळण्यास पाठपुरावा केला नाही. उरणमधील जेएनपीटीमध्ये स्थानिकांच्या जमिनी गेल्या, स्थानिकांचा रोजगार बुडाला आहे. मात्र, यावर सदस्यपदी परप्रांतीय असलेल्या स्थानिकांची वर्णी लागली, तरीही खासदार गप्पच आहेत. याविषयी जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांमध्ये आक्रोश आहे.

- Advertisement -

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे हा पूर्णपणे मावळ मतदारसंघातून जातो. म्हणजेच पनवेल तालुक्यातील कळंबोली ते पिंपरी चिंचवडच्या पुण्याकडील वेशीपर्यंत हा रस्ता आहे. यावर रोजच होणारे अपघात, त्यातील जखमी आणि मृतांना अद्यापही १५ वर्षांनंतरही खासगी हॉस्पिटल सेवेवर अवलंबून राहावे लागत आहे. द्रुतगती मार्गावर MSRDC चे स्वत:चे ट्रॉमा सेंटर किंवा मोठ्या हॉस्पिटलची मागणी होत आहे. मात्र, खासदार बारणे यांनी कधीही या संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींना एकत्र आणून या मागणीचा विचारच केला नाही. रायगड जिल्ह्यातील खालापूर आणि कर्जत तालुक्यातून केंद्रिय पेट्रोलियम कंपनी HP तसेच खासगी कंपनी रिलायन्सची गॅस वितरण पाईपलाईन गेली. यामध्ये अनेक शेतकरी भरडले गेले. मात्र खासदार बारणे यांनी शेतकर्‍यांकडे परस्पर दुर्लक्ष केले. याचाही राग शेतकर्‍यांमध्ये आहे. तसेच, पुणे जिल्ह्यातील लोणावळा ते रायगडमधील कर्जतदरम्यान मध्य रेल्वेवरील पॅसेंजर फेर्‍या वाढवण्याची दोन्ही जिल्ह्यांतील जनतेची मागणी असून त्याकडे खासदार बारणे यांनी लक्ष दिले नाही. तसेच रस्ते, रेल्वे आणि वीज या एकाही प्रश्नाला बारणे यांनी हात घातलेला नाही. श्रीरंग बारणे यांनी संसदेत सलग चार वर्षे सर्वाधिक प्रश्न विचारण्याची कामगिरी केली आहे. त्यासाठी त्यांना संसदरत्न पुरस्कारही मिळाला आहे. पण केंद्र सरकारशी निगडीत प्रश्नावर बारणे काहीसे अपयशी ठरल्याचे समोर येत आहे. त्यातून ते स्वतःला कसे सिद्ध करतील, हे येणार्‍या लोकसभा निवडणुकीत पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -