घरमुंबईवर्धापन दिन शिवसेनेचा, चर्चा नार्वेकरांच्या सेल्फींची!

वर्धापन दिन शिवसेनेचा, चर्चा नार्वेकरांच्या सेल्फींची!

Subscribe

शिवसेनेचा ५२ वा वर्धापन दिन सोहळा मंगळवारी साजरा झाला. या सोहळ्यासाठी राज्यभरातील लोकप्रतिनिधी आणि पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सोहळ्यासाठी पक्षाकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. खरंतर सोशल मीडियात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काय भूमिका घेतली किंवा युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात जो स्वबळाचा नारा दिला त्याची चर्चा व्हायला हवी होती. पण हे सगळे राहिले बाजूला बुधवारी दिवसभर व्हॉट्सअॅपसह इतर सोशल मीडियात चर्चा होती ती शिवसेनेतल्या एका नेत्याच्या सेल्फी विथ शिवसैनिक या व्हिडिओची. या व्हिडिओमुळे फक्त शिवसेनेतीलच नव्हे तर इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांच्याही भूवया उंचावल्या आहेत.

आदित्य ठाकरेंसोबत सेल्फीची संधीच नाही

कार्यक्रमस्थळी शिवसेनेतील सर्व नेत्यांच्या उपस्थितीत सेल्फी किंवा फोटो काढण्यासाठी फक्त एका व्यक्तीकडेच मोठी गर्दी उसळली होती. ते म्हणजे उद्धव ठाकरे यांचे पीए मिलिंद नार्वेकर. खरंतर तरुण पिढीतील असल्यामुळे दरवेळी आदित्य ठाकरे यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी उसळते. पण काल आदित्य ठाकरे कार्यक्रमस्थळी उपस्थित असूनही त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याची संधी कार्यकर्त्यांना मिळालीच नाही आणि मग नार्वेकरांसोबत सेल्फी काढण्यात कार्यकर्ते मग्न झाले. उद्धव ठाकरे यांच्याशी असलेल्या जवळीकीमुळे शिवसेनेत नार्वेकरांना आधीच वेगळं वलय प्राप्त झालं आहे. त्यात आता पक्षाचं सचिवपद अधिकृतपणे मिळाल्यामुळे त्यांच्याभोवती शिवसैनिकांचाही गराडा पडू लागलाय. त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी उसळलेली गर्दी बघून उपस्थित शिवसेनेच्या सर्वच नेत्यांमध्ये चांगलीच कुजबूज रंगली होती. कार्यकर्त्यांच्या सेल्फीप्रेमामुळे नार्वेकरांना वेगळाच सुखद धक्का बसल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होते. या सेल्फी व्हिडिओबद्दल खुद्द नार्वेकर म्हणतात, ही सर्व शिवसैनिकांच्या प्रेमाची पावती आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही जवळीक

केवळ शिवसेनेतच नाही तर भाजपच्या नेत्यांशीही मिलींद नार्वेकर जवळीक साधून आहेत. दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सवात मिलिंद नार्वेकरांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेतले होते. यावेळी त्यांच्यात अर्धा तास चर्चा झाली होती. नारायण राणे जेव्हा एनडीएत स्वतःच्या पक्षासहित सामील झाले तेव्हा त्यांना राज्यात मंत्रीपद मिळेल अशी चर्चा होती. त्यावेळेलाही राणे यांना मंत्रिमंडळात प्रवेश दिल्यास युतीचा विचार करावा लागेल, हा उद्धव ठाकरेंचा निरोप घेऊन नार्वेकरच मुख्यमंत्र्यांकडे गेले होते. ‘माझे एवढे वाईट दिवस आले नाहीत की मी एखाद्या नेत्याच्या पीएने दिलेल्या सल्ल्यानुसार काम करेल’, असे जाहीर वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले होते. तरीही या वक्तव्यानंतर, मिलिंद नार्वेकर हे सज्जन व्यक्ती असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -