घरमुंबईशिवसेनेने भाजपला दाखवला कात्रजचा घाट

शिवसेनेने भाजपला दाखवला कात्रजचा घाट

Subscribe

नुकत्याच पार पडलेल्या पाचपैकी मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांमध्ये मंगळवारी जाहीर झालेल्या विधानसभांच्या निकालाने भाजपला छोबीपछाड मिळाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. सहकारी मित्र पक्षाला कमी लेखल्यावर होणारे परिणाम काय असू शकतात, हे शिवसेनेने भाजपला विधानसभेच्या या निवडणुकांत दाखवून दिले. केंद्रात तसेच राज्यात सत्तेत एकत्रित असणार्‍या शिवसेनेला भाजपने मागील चार वर्षात कायम सापत्न वागणूक दिली.

याचा बदला शिवसेनेने चार राज्यांच्या निवडणुकीत भाजपला कात्रजचा घाट दाखवून घेतला. विशेषतः मध्य प्रदेशमध्ये भाजपने बर्‍याच ठिकाणी थोडक्यात जागा गमावल्या परिणामी त्यांच्या हातून सत्ता निसटली आणि कारणीभूत ठरली ती शिवसेना. शिवसेनेच्या १०१ उमेदवारांना तब्बल ६३ हजार ७०० मते मिळाल्याने मुख्यमंत्री शिवराज सिंह यांचे सलग चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न धुळीस मिळाले.

- Advertisement -

पाच राज्यांमध्ये सेनेने २३९ ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते. यातल्या ५७ जणांनी २ ते ५ हजार इतकी मते घेतली. भाजपच्या अल्प मतांनी पराभूत झालेल्या उमेदवारांना सेनेच्या या चालीने फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे. एकार्थी आपल्याशी कस्पटासमान वागणार्‍या भारतीय जनता पक्षाची खोड मोडल्याची चर्चा सेनेत आहे. या पक्षाने आपल्या उपद्रवमूल्याची जाणीव या निवडणुकीत भाजपला करून दिल्याचे बोलले जात आहे. पाच राज्यांपैकी मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यांमध्ये शिवसेनेने आपल्या पक्षाचे उमेदवार दिले होते. यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या मध्य प्रदेशातील उमेदवारांची संख्या १०१ इतकी होती.

या व्यतिरिक्त राजस्थान ३८, छत्तीसगड ५१ आणि तेलंगणा ४९ या प्रमाणात शिवसेनेच्या उमेदवारांची संख्या होती. सेनेच्या या उमेदवारांनी दीड लाख मते घेऊन भाजपच्या काठावरच्या उमेदवारांची चांगलीच गोची केली. मध्य प्रदेशात सेनेच्या उमेदवारांनी १०० ते ५ हजार मते घेऊन भाजपच्या काठावर नापास झालेल्या सहा उमेदवारांना अस्मान दाखवले. यात सुवारसा, नेपानगर, भोपाळ, जावरा या मतदारसंघांचा आवर्जून उल्लेख केला जातो. सुवारसा मतदारसंघात काँग्रेसचे हरदिप सिंग विजयी झाले.

- Advertisement -

त्यांच्या आणि भाजपचे पराभूत उमेदवार राध्येशाम पाटीदार यांच्या मतांमधील फरक ३५० मतांचा आहे. तिथे सेनेचे जितेंद्र सिंग सुरू यांनी १५०० मते घेतली. सेनेच्या सुरू यांच्यामुळे पाटीदार यांना पराभव पत्करावा लागला आहे.

नेपानगर मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार सुमित्रा देवी या १२६४ मतांनी विजयी झाल्या. देवी यांना ८५३२० मते पडली. तर त्यांच्यापुढील भाजपचे उमेदवार मंजू राजेंद्र यांना ८५,०५६ मते पडली. या मतदारसंघात सेनेचे गणसिंग पटेल या उमेदवाराने ३७२१ मते घेतली. सेनेच्या उमेदवारामुळे मंजू यांचा पराभव झाल्याचे स्पष्ट झाले. अशा सेनेच्या सहा उमेदवारांमुळे भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाल्याचे स्पष्ट झाले. मध्य प्रदेशच्या निवडणुकीत यश अजमावण्यासाठी उभ्या असलेल्या सेनेच्या उमेदवारांनी ६३ हजार ७०० मते घेतल्याचे निवडणूक आयोगाकडील आकडेवारीतून स्पष्ट होते. भोपाळ आणि जावरा मतदारसंघातही सेनेच्या उमेदवारांमुळे भाजपला फटका बसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

हीच स्थिती राजस्थानमध्ये होती. या राज्यात भाजपचा दारूण पराभव झाला असला तरी सेनेच्या उमेदवारांमुळे भाजपच्या तीन उमेदवारांना पराभव चाखावा लागला आहे. राजस्थानमध्ये शिवसेनेने ३८ जणांना उमेदवारी दिली होती. या उमेदवारांनी ३४ हजार २०० मते घेतली.भाजपला डोकेदुखी ठरलेल्या मतदारसंघात मारवाड(जंक्शन) आणि पाचपडसा मतदारसंघाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. मारवाड मतदारसंघात भाजपचे केसाराम चौधरी यांचा काँग्रेसच्या खुशवीर सिंग यांनी केवळ २५१ मतांनी पराभव केला. याच मतदारसंघात सेनेच्या अमर सिंग या उमेदवाराला ११०३ मते पडली. पाचपडरा मतदारसंघात काँग्रेसच्या मदन प्रजापत यांनी भाजपचे अमर राम यांचा २३९५ मतांनी पराभव केला. तर पन्नालाल या सेनेच्या उमेदवाराला या मतदारसंघात मिळालेली मते २६९८ इतकी होती. राजस्थानात दारूण पराभव झाल्याने सेनेच्या उमेदवारांच्या उपद्रवमूल्याची फारशी दखल भाजपने अद्याप घेतलेली दिसत नाही.

छत्तीसगडच्या निवडणुकीत सेनेने ५१ उमेदवार दिले होते. या उमेदवारांनी ३४ हजार ३०० इतकी मते घेतली. या उमेदवारांनी भाजपच्या चार उमेदवारांना आपल्या ताकदीचा अंदाज दाखवून दिला. खैरागड मतदारसंघात भाजपच्या कोमल जंगेल यांचा केवळ ८७० मतांनी पराभव झाला. या मतदारसंघातील सेनेचे दिनेश सिंग या उमेदवाराने १७७५ मते घेतली. या चारही राज्यातील सेनेच्या उमेदवारांनी फारशी तयारी न करता निवडणुका लढवल्या. पूर्ण तयारीने निवडणुका लढवण्यात आल्या असत्या तर आजचे परिणाम अधिकच उठावदार आले असते, हे स्पष्ट दिसते. सेनेचे अनेक उमेदवार तीन ते पाचव्या क्रमांकावर होते. बसपा आणि समाजवादी पार्टीच्या उमेदवारांहून सेनेच्या उमेदवारांची कामगिरी सरस होती, हे आलेल्या निकालावरून स्पष्ट दिसते.

पाच राज्यांतील निवडणूक
चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकी

शिवसेनेला झालेले मतदान
राज्य          उमेदवार      मिळालेली मते
मध्यप्रदेश        १०१          ६३ हजार ७००
राजस्थान         ३८          ३४ हजार २००
छत्तीसगड       ५१           ३४ हजार ३००
तेलंगणा         ४९            १४ हजार २००

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निर्णयानुसार प्रत्येक राज्यात शिवसेनेने उमेदवार उभे करण्याचे ठरवले होते. त्यानुसार मंगळवारी निकाल लागलेल्या 5 राज्यांमध्ये शिवसेनेने उमेदवार उभे केले होते, मध्य प्रदेशमध्ये आमचे 49 उमेदवार होते. तसेच राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणालाही सेनेने आपल्या कार्यकर्त्यांना उमेदवारीची संधी दिली होती. मात्र शिवसेना कोणाला हरवण्यासाठी किंवा जिंकण्यासाठी निवडणुकांमध्ये उतरली नव्हती, तर देशभर पक्षाचा विस्तार व्हावा, याच उद्देशाने आम्ही निवडणुका लढलो

.- खासदार अनिल देसाई, सचिव, शिवसेना.

Pravin Puro
Pravin Purohttps://www.mymahanagar.com/author/ppravin/
विविध वृत्तपत्रांमध्ये ३२ वर्ष पत्रकारिता. वृत्तपत्र आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, राज्य आणि राष्ट्रीय विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -