घरमुंबईमिठीच्या प्रदूषणाला झोपडपट्टीवासीय, उद्योग जबाबदार

मिठीच्या प्रदूषणाला झोपडपट्टीवासीय, उद्योग जबाबदार

Subscribe

एमपीसीबीचा कृती आराखडा सादर

झोपडपट्ट्यांमधून टाकला जाणारा कचरा, स्क्रॅप मटेरिअल तसेच नदी नजीकच्या उद्योगांमुळे मिठी नदीचे रूपांतर नाल्यामध्ये झाले आहे. वाढते शहरीकरण, उद्योगांकडून सोडण्यात येणारे पाणी, घनकचरा फेकला जाणे ही मिठी नदीच्या प्रदूषणाची प्रमुख कारणे आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) मिठी नदीच्या १६ वेगवेगळ्या ठिकाणी नमुने घेऊन नदीच्या पाण्याचे परीक्षण केले आहे. घनकचरा व्यवस्थापनाच्या नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याची आवश्यकता एमपीसीबीमार्फत व्यक्त करण्यात आली आहे. तसेच नदीमध्ये घनकचरा टाकणार्‍यांवर कारवाई करण्याची गरजही व्यक्त करण्यात आली आहे.

मिठी नदी स्वच्छ करण्यासाठीचा आराखडा एमपीसीबीमार्फत सादर करण्यात आला आहे. राष्ट्रीय हरित लवादाने महाराष्ट्रातील नद्यांच्या प्रदूषणाच्या मुद्यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला रिव्हर अ‍ॅक्शन प्लॅन सादर करण्याचे आदेश दिले होते. एमपीसीबीने मुंबईच्या मिठी नदीसह राज्यातील ५३ नद्या प्रदूषित असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जाहीर करण्यात आले होते. त्यापैकी १२ नद्यांना नदी पुनरूज्जीवन समितीच्या बैठकीत प्रदूषित नद्यांच्या यादीतून वगळण्यात आले आहे. यामुळे राज्यातील प्रदूषित नद्यांचा आकडा आता ४१ इतका झाला आहे. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नदी पट्ट्यात होत असलेले प्रदूषण कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना व माहितीचे कृती आराखडे ३० जानेवारीला केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळासमोर मांडण्यात आले आहेत. राज्यातील ५३ नद्यांच्या प्रदूषणाच्या पातळीनुसार पाच वर्गात या नद्यांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

- Advertisement -

मिठी नदीच्या पात्राच्या शेजारी अनेक औद्योगिक क्षेत्रामार्फत तसेच असंघटित क्षेत्रामार्फत प्रदूषण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामध्ये हॉटेल, रेस्टॉरन्ट्स, बेकरी, इटरी, एमआयडीसी तसेच सिप्झमधील अनेक उद्योग, डाइंग, ब्लिचिंग, कारच्या गॅरेजपासून ते म्हैशींच्या तबेल्यासारख्या अनेक गोष्टी नदीचे पाणी प्रदूषित करण्यासाठी कारणीभूत ठरल्या आहेत. मिठी नदी प्रदूषित झाल्यामुळेच २००६ मध्ये मुंबईत पूरपरिस्थिती निर्माण झाल्याचे एमपीसीबीच्या अहवालात नमुद करण्यात आले आहे. अल्प आणि दीर्घ उपाययोजनाही एमपीसीबीच्या अ‍ॅक्शन प्लॅनमध्ये सुचविण्यात आल्या आहेत. तात्काळ अमलात आणण्यात येणार्‍या उपायांमध्ये हॉटेल आणि रेस्टॉरंट तसेच मोठ्या इंडस्ट्रीजमध्ये अ‍ॅफ्ल्युएन्ट ट्रिटमेंट प्लॅन्ट तसेच सिव्हेज ट्रिटमेंट प्लॅन्ट उभारणे अपेक्षित आहे. मिठीच्या पाण्यात मलमूत्र विसर्जन करण्यात येते. हेही एक नदी प्रदूषित होण्याचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे हगणदारी असणार्‍या ठिकाणी सुलभ शौचालये उभारण्याची सूचना करण्यात आली आहे. कचर्‍याच्या व्यवस्थापनाअंतर्गत कचरा गोळा करण्यापासून त्याची विल्हेवाट लावण्यासारख्या उपाययोजनाही अल्प मुदतीच्या पर्यायात सुचविण्यात आल्या आहेत. नदीच्या पाण्याला येऊन मिळणार्‍या नाल्याच्या ठिकाणीही वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून प्रक्रिया केलेले पाणी सोडले जाणे अपेक्षित आहे. वाकोला नाला, सीएसटी ब्रिज याठिकाणी पाण्यात मिसळणारे काळे पाणी थांबवणे आवश्यक आहे.

मुंबईत आलेल्या पुरासाठी मिठी नदी मुख्य कारण होते. त्यामुळेच नदीच्या अनुषंगाने नदी व्यवस्थापन आणि पूर परिस्थिती नियंत्रणाच्या अनुषंगाने दीर्घकालीन नियोजन होणे अपेक्षित आहे. सर्व नाल्यांचे पाणी प्रक्रिया करूनच नदीत सोडले जाणे अपेक्षित आहे, असेही सूचवण्यात आले आहे. नदीच्या परिसरातील उघड्यावरची हगणदारी तसेच थेट नदीच्या पाण्यात कचरा टाकण्याचे प्रकार थांबविण्यासाठी याठिकाणी सुरक्षा व्यवस्था उभारणे गरजेचे आहे. ऑटोमोबाईलच्या गॅरेजमधून नदीच्या पाण्यात कोणतेही पाणी सोडले जाणार नाही यासाठीही काळजी घेणे गरजेचे आहे. नदी पात्राच्या शेजारी हरितपट्ट्याची निर्मिती करणे गरजेचे आहे. त्यामुळे पूर परिस्थितीसारख्या गोष्टी नियंत्रणात येणे शक्य होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -