घरमुंबईपॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला राज्यात प्रारंभ

पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला राज्यात प्रारंभ

Subscribe

राज्यभरात १ लाख ११ हजार जागा

तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने गुरुवारी राज्यातील अभियांत्रिकी पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. या अभ्यासक्रमांसाठी राज्यभरात ३८७ संस्थांमध्ये १ लाख ११ हजार जागा आहेत. ऑनलाईन पद्धतीने १८ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज सादर करता येतील.

पॉलिटेक्निकला अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा यासाठी यावर्षी प्रथमच ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया एक महिना अगोदर सुरू करण्यात आली आहे. गतवर्षी ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया 26 जूनला सुरू करण्यात आली होती. परंतु विद्यार्थी संख्या वाढावी यासाठी यावर्षी 30 मेपासून सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशप्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात त्यांची वैयक्तिक माहिती भरायची आहे. त्यानंतर दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना केवळ गुण अपडेट करावी लागणार आहे. खुल्या वर्गासाठी 400 तर मागासवर्गींसाठी 300 रुपये प्रवेश अर्जाची किंमत आहे. प्रवेश अर्जासोबत मिळालेल्या लॉगिन किटच्या आधारे http://poly19.dtemaharashtra.org या संकेतस्थळावर अर्ज सादर करायचे आहेत. याबाबतची अधिसूचना गुरुवारी काढण्यात आली. यंदा प्रवेशाच्या तीन फेर्‍या होणार असून, ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी 18 जूनपर्यंत मुदत आहे. 2 ऑगस्टला सर्व प्रक्रिया पूर्ण होणार असून, 5 ऑगस्टपर्यंत महाविद्यालय सुरू होतील. प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी तब्बल 359 सुविधा केंद्र उभारण्यात आली आहेत, अशी माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी दिली. नोंदणी सुरू केल्यानंतर प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ताटकळत न ठेवता झटपट प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी डीटीई प्रयत्नशील असल्याचेही वाघ यांनी सांगितले.

- Advertisement -

असे आहे प्रवेशाचे वेळापत्रक
* ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करणे आणि कागदपत्रांची छाननी- ३० मे ते १८ जून अखेर.
* कच्ची गुणवत्ता यादी- १९ जून
* यादीवर हरकती – २० ते २१ जून
* पक्की गुणवत्ता यादी- २४ जून
* कॅप राउंडसाठी रिक्त जागांचा तपशील- २४ जून
* पहिली विकल्प फेरी – २५ ते २८ जून
* पहिली यादी (कॅप राउंड १) – १ जूलै
* पहिल्या यादीतील प्रवेशासाठी मुदत- २ ते ५ जुलै.
* कागदपत्रे व फी भरण्यासाठी – २ ते ६ जुलै.
* दुसर्‍या कॅप राउंडसाठी रिक्त जागांचा तपशील- ८ जुलै
* दुसरी विकल्प फेरी- ९ ते १२ जुलै
* दुसरी यादी ((कॅप राउंड २)- १५ जुलै
* दुसर्‍या यादीतील प्रवेशासाठी मुदत – १६ ते १९ जुलै
* कागदपत्रे व फी भरण्यासाठी – १६ ते २० जुलै
* तिसर्‍या कॅप राउंडसाठी रिक्त जागांचा तपशील- २२ जुलै
* तिसरी विकल्प फेरी- २३ ते २६ जुलै
* तिसरी प्रवेशाची यादी (कॅप राउंड ३) – २९ जुलै
* तिसर्‍या फेरीतील प्रवेशासाठी मुदत – ३० ते १ ऑगस्ट
* कागदपत्रे व फी भरण्यासाठी – ३० जुलै ते २ ऑगस्ट
* कॉलेज प्रारंभ – ५ ऑगस्ट
* कटऑफ डेट सर्व प्रवेश -: १४ ऑगस्ट सायंकाळी ५ वाजेपर्यंत

यंदाचे बदल
* पॉलिटेक्निक प्रवेशासाठी गणित आणि विज्ञान विषयाबाबत असलेल्या संपूर्ण अट काढून टाकण्यात आली आहे.
* आरक्षणातही वाढ झाली असून एसईबीसी करिता १६ टक्के, अर्थिक दुर्बल प्रवर्गासाठी १० टक्के आणि अनाथ मुलांसाठी १ टक्का आरक्षण प्रवेशात देण्यात आले आहे.

- Advertisement -

पॉलिटेक्निकला प्रवेशासाठी 359 समुपदेशन केंद्र
पॉलिटेक्निकला विद्यार्थ्यांचा ओढा वाढावा व विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यात अडचणी येऊ नये यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाकडून राज्यामध्ये तालुकास्तरावर तब्बल 359 समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही पॉलिटेक्निकला प्रवेश घेण्यासंदर्भात मार्गदर्शन मिळणार आहे. विद्यार्थ्यांना समुपदेशन करता यावे यासाठी 22 मे रोजी तंत्रशिक्षण संचालनालय व महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून राज्यातील सर्व सरकारी व अनुदानित संस्थांचे प्राचार्य, विभाग प्रमुख यांना प्रवेश नियमावली व केंद्रीभूत प्रवेशप्रक्रियेची माहिती व्हावी यासाठी कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेत विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींकडूनही प्राचार्यांना कंपन्यांची गरज, विद्यार्थ्यांना कशाप्रकारे मार्गदर्शन करण्यात यावे याची माहिती दिली. समुपदेशन केंद्रात विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया कशी आहे, कोणते अभ्यासक्रम आहेत, कोणत्या अभ्यासक्रमाला सर्वाधिक मागणी आहे. याची माहिती देण्यात येणार आहे.

अडचणीसाठी हेल्पलाईन
प्रवेशादरम्यान विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण आल्यास ती सोडवण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी अडचण आल्यास 9607957950, 9607957954 या क्रमांकावर सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत संपर्क साधता येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -