घरताज्या घडामोडीहाफकिनसाठी आराखडा सादर करा, अमित देशमुख यांचे निर्देश

हाफकिनसाठी आराखडा सादर करा, अमित देशमुख यांचे निर्देश

Subscribe

देशातील पहिली जीवशास्त्रीय संशोधन संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हाफकिन प्रशिक्षण, संशोधन आणि चाचणी संस्थेचा नावलौकिक टिकवून ठेवताना कोरोना बाबतची राज्यातील परिस्थिती लक्षात घेता संस्थेचा तपासणी, संशोधन आणि प्रशिक्षण याबाबतचा आराखडा येत्या तीन आठवडयात सादर करावा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी बुधवारी दिले.

आज मंत्रालयात देशमुख यांनी हाफकिन संस्थेची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी हाफकिन संस्थेने सध्याची राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता तपासणी, संशोधन आणि प्रशिक्षण यावर अधिकाधिक भर देणे आवश्यक असल्याचे सांगितले.

- Advertisement -

हाफकिन संस्थेने आजपर्यंत कॉलरा, रेबीज, सर्पदंश, विंचूदंश अशा अनेक रोगप्रतिबंधक लसी शोधून काढल्या आहेत. त्यामुळे कोरोनाची लस शोधून काढण्यासाठी संशोधन येथे होणे आवश्यक आहे. आज राज्यभरात कोरोनाच्या तपासण्या सरकारी आणि खासगी प्रयोगशाळेत करण्यात येत आहेत. परंतु हाफकिन संस्था ही तपासणीमध्ये प्रमुख मानली जाण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. आज हाफकिन संस्थेत तपासण्या होत असल्या तरी त्यांची संख्या वाढविणे आवश्यक आहे, असे अमित देशमुख यांनी सांगितले.

हाफकिन संस्थेने आतापर्यंत केलेले संशोधन पाहता येणाऱ्या काळात संशोधनाची प्रक्रिया कशी असेल, संशोधन पध्दतीचा रोडमॅप कसा असेल याबाबतही आराखडा सादर करावा. तसेच हाफकिन संस्थेत कंत्राटी पध्दतीने संचालकपदाची भरती किंवा ॲड ऑन पध्दतीने पदभरती करताना, संचालक किंवा अधिकारी -कर्मचारी यांना नियुक्ती देताना त्यांना देण्यात येणारी वेतनश्रेणी याबाबत सर्व नियम तपासून पाहण्यात यावे, असेही देशमुख यांनी  स्पष्ट केले.

- Advertisement -

या बैठकीला वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, हाफकिनच्या संचालक शैला ए यांच्यासह हाफकिन संस्थेचे अधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -