घरमुंबईभररस्त्यात स्वतःवरच कोयत्याने वार

भररस्त्यात स्वतःवरच कोयत्याने वार

Subscribe

बघे मात्र मोबाईल शूटिंग करण्यात दंग

पत्नीशी झालेल्या कौटुंबिक वादातून माथेफिरूने कोयत्याने स्वतःवरच वार करून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी दुपारी ठाणे रेल्वे स्थानकानजीक घडली. भीमराव मोहन भिसे (26 रा. उस्मानाबाद) असे त्याचे नाव असून त्याचा हा थरार मोबाईलमध्ये कैद झाला आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून रक्तबंबाळ अवस्थेत त्याला सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या प्रकरणी, ठाणे नगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पत्नीशी बिनसल्याने भिसे हा विवाहित तरुण पाच दिवसांपूर्वी ठाण्यातील माजिवडा येथील आत्याकडे आला होता. गुरुवारी दुपारी साडे अकराच्या सुमारास ठाणे स्थानक परिसरातील मासळी विक्रेत्याकडील कोयता लांबवून पळत असताना नागरिकांनी चोर चोर असे ओरडल्याने तो बिथरला. आता जमाव आपल्याला पकडून मारणार, असे वाटल्याने त्याने कोयत्याने स्वतःवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. हा प्रकार जवळच उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसांच्या लक्षात येताच ठाणे नगर पोलिसांची कुमक मागवण्यात आली. त्यानंतर त्याच्याकडील कोयता काढून घेतल्यानंतरदेखील तो रस्त्यावर डोके आपटून घेण्याचा प्रयत्न करत असल्याने पोलिसांनी बळाचा वापर करून त्याला जेरबंद केले. डोक्यावर आणि छातीवर निसटते वार झाल्याने तो रक्तबंबाळ झाला होता.

- Advertisement -

पोलिसांनी त्याला उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी, ठाणे नगर पोलीस ठाण्यात नोंद केली असून त्याच्या नातेवाईकांना कळवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान,या घटनेचा थरार मोबाईलमध्ये कैद करणार्‍या अनेकांचे मोबाईल फोन पोलिसांनी काढून घेतले होते. तरीही काही जणांनी सॅटिस पुलावरून हा प्रकार चित्रित करून व्हायरल केला, अधिक तपास पोलीस करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -