घरमुंबईफेरीवाल्यांना आहे त्याच जागी बसवा, नव्या फेरीवाला क्षेत्रांना नगरसेवकांचा विरोध

फेरीवाल्यांना आहे त्याच जागी बसवा, नव्या फेरीवाला क्षेत्रांना नगरसेवकांचा विरोध

Subscribe

मुंबई महापालिकेने फेरीवाला धोरणाची अंमबजावणी करण्याच्या दृष्टीकोनातून फेरीवाला क्षेत्रांची सुधारीत यादी तयार करून त्यानुसार जागांची आखणी करण्यास सुरुवात केली. पण, ज्या भागांमध्ये कधीही फेरीवाले नव्हते, त्याठिकाणी फेरीवाले क्षेत्र बनवल्याने स्थानिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मुंबई महापालिकेने फेरीवाला धोरणाची अंमबजावणी करण्याच्या दृष्टीकोनातून फेरीवाला क्षेत्रांची सुधारीत यादी तयार करून त्यानुसार जागांची आखणी करण्यास सुरुवात केली. पण, ज्या भागांमध्ये कधीही फेरीवाले नव्हते, त्याठिकाणी फेरीवाले क्षेत्र बनवल्याने स्थानिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे, या माध्यमातून अशांतता निर्माण होत असल्याने, नवीन फेरीवाला क्षेत्र बनवण्याऐवजी ज्या ठिकाणी फेरीवाले बसतात, तिथेच त्यांना बसू द्यावे अशी सूचना नगरसेवकांनी केली आहे. मात्र, यापुढे नगरसेवकांना विश्वासात घेतल्याशिवाय एकही फेरीवाला क्षेत्रातील अंमलबजावणी करू नये,अशीही सूचना त्यांनी केली.

मुंबईतील अनेक भागांमध्ये सध्या फेरीवाला क्षेत्र जाहीर करून त्यासाठी जागा निश्चित करून त्या रंगवल्या जात आहेत. त्यामुळे याबाबत महापालिका सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी हरकतीच्या मुद्दयाद्वारे तीव्र नाराजी व्यक्त करत कोणालाही विश्वासात न घेता टाऊन वेंडींग कमिटीच्या मान्यतेने थेट पट्टे मारण्यात आले आहेत असं सांगितलं. त्यामुळे कधीही न बसलेल्या रस्त्यांवर आता फेरीवाले बसवले जात आहेत. हे चुकीचे असून स्टॉलधारकांनाही आता फेरीवाल्यांप्रमाणे जागा दिल्या जात आहे. याबाबत खुद्द परवाना विभागाच्या अधिक्षकांना याची कल्पना नाही. त्यामुळे हे फेरीवाला क्षेत्र रद्द करून पट्टे मारणे बंद करावे अशी सूचना राऊत यांनी केली.

- Advertisement -

यावेळी सर्वच नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घेऊनच याची अंमबजावणी केली जावी. तसेच, टाऊन वेंडींग समितीमध्ये नगरसेवकांचाही समावेश करावा अशी सूचना केली. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी टाऊन वेंडींग कमिटीमध्ये कुणाचा समावेश असावा याबाबतचे परिपत्रकातील नियमांकडे सर्वांचे लक्ष वेधले. फेरीवाल्यांचे अन्य जागांवर पुनर्वसन न करता सध्या जिथे ते धंदा करतात तिथेच त्यांना व्यवसाय करण्यास परवानगी दिली जावी, अशी सूचना राजा यांनी केली. त्याचवेळी स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घ्यायलाच हवे, अशीही सूचना त्यांनी केली.

भाजपच्या ज्योती अळवणी यांनी विलेपार्ले येथील मार्केट आता तेजपाल रोडवर हलवले आहे. त्यामुळे तेथील नागरिक आता संतप्त झाले आहेत. तसेच ज्या श्रध्दानंद रोडवर कधीही फेरीवाले नव्हते, तिथेही फेरीवाले बसत असल्याचे सांगितले.
फेरीवाला क्षेत्रांमुळे शांत भागांमध्ये अशांतता पसरवली जात असल्याचे सांगत भाजपच्या राजेश्री शिरवाडकर यांनी षण्मुखानंद येथील फेरीवाल्यांना दूर नेऊन बसवले जात असल्याचे सांगितले. त्यामुळे भविष्यात रहिवासी आणि फेरीवाले यांच्यामध्ये वाद होण्याची शक्यता असून यामुळे वातावरण बिघडल्यास त्याला प्रशासन जबाबदार असतील,असा इशारा त्यांनी दिला. तर शिवसेनेच्या सानप यांनी महापालिका मुख्यालयाशेजारीच संध्याकाळच्या वेळेत फेरीवाले बसत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. टाऊन वेंडींग कमिटी नगरसेवकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप शिवसेनेचे संजय घाडी यांनी केला, तर शिवसेनेच्या सुजाता पाटेकर यांनी फेरीवाला धोरणाबाबत आधी भूमिका स्पष्ट करावी, अशी भूमिका मांडली. सर्वे झालेला असतानाही प्रशासन म्हणते की,  आपण नव्याने पुन्हा सर्वे करणार आहोत. म्हणजे नेमके धोरण काय आहे, अशी विचारणा त्यांनी केली. त्यामुळे अखेर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी फेरीवाल्यांना बसवताना रहिवासी, पादचारी आणि स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घ्यावे अशी सूचना करत प्रशासनाची मनमानी सहन केली जाणार नाही,असा इशारा दिला. यावेळी चर्चेत आसिफ झकेरिया,विजय शिंदे, चंद्रशेखर वायंगणकर, राखी जाधव,सुरेश पाटील, जावेद जुनेजा, अरुंधती दुधवडकर आदींनी भाग घेत तीव्र नाराजी व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -