घरमुंबईगोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठीच्या बोगद्यामुळे ८५० कोटींचा खर्च वाढला

गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठीच्या बोगद्यामुळे ८५० कोटींचा खर्च वाढला

Subscribe

फिल्मसिटीतील रस्त्यांवरील वाहतुकीमुळे चित्रीकरणाच्या कामात होणारे अडथळे आणि ध्वनी प्रदुषण टाळण्यासाठी महापालिकेने जीएमएलआर प्रकल्पांतर्गत फिल्मसिटीतून वाहतुकीसाठी भुयारी मार्ग बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी (जीएमएलआर) संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून भूमिगत बोगदा बनवण्यात येत असला तरी या प्रमुख मार्गाला जोडण्यासाठी गोरेगाव येथील आरे कॉलनीतील चित्रनगरी अर्थात फिल्मसिटीतून बोगदा बनवण्यात येणार आहे. फिल्मसिटीतील रस्त्यांवरील वाहतुकीमुळे चित्रीकरणाच्या कामात होणारे अडथळे आणि ध्वनी प्रदुषण टाळण्यासाठी महापालिकेने जीएमएलआर प्रकल्पांतर्गत फिल्मसिटीतून वाहतुकीसाठी भुयारी मार्ग बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा खर्च ८५० कोटींनी वाढला.

गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या कामांसाठी आरे कॉलनी तसेच भांडुप कॉम्प्लेक्समधून जाणार्‍या उन्नत मार्गाचा पुनर्विचार करणे, रस्त्यांचे योग्य संरेखन निश्चित करणे, सर्वसाधारण आराखडा तयार करणे तसेच वैधानिक मजुरी व परवानग्या प्राप्त करण्याची जबाबदारी महापालिकेने पेन्टॅकल कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची नियुक्ती केली आहे. या कंपनीच्या कामांचे पुनर्विलेखन करण्यासाठी पेडिको कंपनीची जानेवारी २०१६ मध्ये तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती.
या सल्लागारांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून प्रस्तावित भुयारी वाहतूक मार्गाचे भूगर्भिय सर्वेक्षण करून सर्वसाधारण आराखडा सादर केला. परंतु संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणार्‍या मुख्य भुयारी मार्गाकडे जाणारा रस्ता हा गोरेगाव येथील चित्रनगरीच्या भागातून जातो. गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यामुहे चित्रनगरीच्या परिसराचे विभाजन टाळण्यासाठी तसेच प्रस्तावित रस्त्याच्या वाहतुकीमुळे चित्रनगरीमधील चित्रीकरणाच्या कामात निर्माण होणारे संभावीत अडथळे आणि ध्वनी प्रदुषण टाळण्यासाठी हा रस्ता कट तसेच कव्हर बॉक्स बोगदा स्वरुपात बांधण्याचा प्रस्ताव आहे. दोन वर्षांपूर्वी तत्कालिन मुख्यमंत्र्यांनी तशाप्रकारचे निर्देश महापालिकेला दिले होते.

- Advertisement -

राष्ट्रीय वन्यजीव मंडळामार्फत प्रकल्पास वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत आवश्यक असलेली परवानगी मिळाली असून वन्य कायद्यांतर्गत परवानगी मिळायची आहे. उर्वरीत सर्व वैधानिक मंजुर्‍या प्राप्त झाल्यानंतर प्रस्तावित बोगद्याचे काम आणि गोरेगाव चित्रनगरी हद्दीत प्रस्तावित कट आणि कव्हर बॉक्स बोगद्याचे काम एकत्र हाती घेण्यात येईल, असे महापालिकेच्या रस्ते विभागाच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

गोरेगाव येथील चित्रनगरीमधून मुख्य भुयारी मार्गाकडे जाणार्‍या १७०० मीटर लांबीच्या रस्त्यापैकी सुमारे १२०० मीटर लांबीच्या प्रत्येकी तीन मार्गिकेसह कट अँड कव्हर बॉक्स बोगद्याची बांधणी करण्याची पध्दत विकसित करण्यात येणार आहे. कृत्रिम वायूविजनसह असलेल्या या दुहेरी बॉक्स बोगद्यामध्ये आपत्कालिन व्यवस्थेकरता ३०० मीटर अंतरावर छेदमार्गाने दोन्ही बोगदे जोडले जाणार आहेत. त्याच संरचनेचे आरेखन करण्याचे अतिरिक्त काम सल्लागाराकडे सोपवण्यात आले आहे. त्यामुळे या कामांसाठी ६५लाखांचा खर्च वाढला आहे. त्यामुळे सल्लागार शुल्क २.६७ कोटींवरून ३.३२ कोटींवर झाले आहे.

- Advertisement -

गोरेगावमुलुंड लिंक रोडचा सुरुवातीला अंदाजित खर्च हा ३८०० कोटी रुपये एवढा होता. परतु फिल्मसिटीतील सहा मार्गिकेच्या भुयारी मार्गामुळे हा प्रकल्प खर्च ४६७८ कोटींवर पोहोचला आहे. यावर्षी या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी प्रस्तावित बोगद्यासाठी लागणार्‍या वैधानिक परवानगीसाठी केंद्रीय पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाकडे पर्यावरण व वन विभाग आणि वन्य जीव विभागाची परवानगी मिळवण्यासाठी अर्ज करण्यात आल्याचेही अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा –

गुडविन ज्वेलर्स फसवणूक प्रकरणी ६९ जणांनी केली तक्रार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -