घरमुंबईआरेचे वारे खा..रे

आरेचे वारे खा..रे

Subscribe

कारशेडसाठी रॉयल पाम देऊ करतेय ३० ते ६० एकर जागा,मुहम्मद नॅन्सींना हवाय ४ एफएसआय, वनशक्तीही रॉयल पामसाठी आग्रही,कांजुरमार्गला कारशेड केल्यास एफएसआयसह मेट्रोचे तिकीट वाढणार,झाडांच्या आड एफआयएसचा मलिदा

आरे मधील मेट्रोच्या कारशेडवरून कलगीतुरा रंगला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आरेचे वारे खा..रे’ असल्याचे संकेत दिले आहेत. आरेतील कारशेडला विरोध करणारे वेगळ्या मनसुब्यांनी खोडा घालत आहेत, असा जोरदार प्रहार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. आरेतील कारशेडचा विरोध बघून स्वत:च्या मालकीची ३० ते ६० एकर जागा रॉयल पामच्या मुहम्मद नॅन्सी यांनी देऊ केली आहे. मात्र त्याबदल्यात आपल्याला आरेतील निवासी इमारती, गोल्फ कोर्स या विकसित जागांसाठी चार अतिरिक्त एफएसआय देण्याची मागणी मुहम्मद नॅन्सी यांनी राज्य सरकारकडे केली आहे. आरेतील कारशेडला मुंबई हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट आणि हरित लवादाने ग्रीन सिग्नल दिला आहे. मात्र पर्यावरणाच्या आड काही मनसुभेदार कारशेडला विरोध करून मुंबईकरांना वेठीस धरत आहेत. नॅन्सी कुटुंबियांचे सगळ्याच ठाकरे कुटुंबियांशी ‘स्नेहबंध’ आहेत.

आरे आणि नाणारवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होऊनही शिवसेना-भाजप युती होणार की नाही याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सोमवारी चिंता व्यक्त केली. त्याचवेळी आरे कारशेडला विरोध करणारे वेगळ्या मनसुब्याने काम करत आहेत का हे तपासायला हवे, असे म्हणत शिवसेनेला टोला लगावला आहे. त्यामुळे आरे कारशेडच्या आड काय मनसुबे आहेत याबाबत ‘आपलं महानगर’ने अधिक खोलात जाऊन चौकशी केली असता मुख्यमंत्र्यांच्या आरोपात तथ्य असल्याचे आढळत

- Advertisement -

मेट्रो-3 च्या प्रस्तावित आरे कारशेडसाठी 2700 झाडे तोडावी लागणार असल्याने पर्यावरणवादी आणि युवासेना प्रुमख आदित्य ठाकरेंसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही विरोध दर्शविला आहे. आरेतील प्रस्तावित कारशेडच्या बाजूलाच रॉयल पामचा २४० एकरचा खाजगी भूखंड आहे. त्यापैकी मेट्रो कारशेडसाठी आवश्यक ३० ते ६० एकरचा जमिनीचा तुकडा देण्याची तयारी रॉयल पामचे व्यवस्थापकीय संचालक मुहम्मद नॅन्सी यांनी दर्शवली आहे. मात्र त्याबदल्यात ४ अतिरिक्त एफएसआय महापालिकेच्या पार्किंग योजनेंतर्गत देण्याची मागणी नॅन्सी यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन आणि मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांच्याकडे 2015 पासून सलग चार वर्षे नॅन्सी यांनी पत्रव्यवहार केला आहे. (याबाबतचा सर्व पत्रव्यवहार ‘आपलं महानगर’कडे उपलब्ध आहे.)

मुहम्मद नॅन्सी यांनी मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडे १७ जुलै २०१५, ३० जुलै २०१५, २७ एप्रिल २०१६, २ मे २०१६ असा पत्रव्यवहार केला आहे. तर वनशक्तीने २५ सप्टेंबर २०१५ रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. इतिहासात डोकावले असता 1995 साली युती सरकारच्या काळात गोरेगाव येथील आरेच्या हिरव्या टेकड्यांवरील हजारो झाडे कापून श्रीमंतांसाठी रॉयल पाम आणि पंचतारांकित गोल्फ क्लब बांधण्यात आले. ते नॅन्सी यांच्या परिवाराचे आहे. या परिवाराशी ठाकरे कुटुंबियांचे स्नेहपूर्ण संबंध होते. त्यामुळेच युतीचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी रॉयल पामचे उद्घाटन बाळासाहेब ठाकरे यांच्या सूचनेनुसारच केले होते. त्यामुळेच रॉयल पाम आणि तेथील क्लबमध्ये शिवसेनेच्या नेत्यांचा आणि लोकप्रतिनिधींचा वावर असतो.

- Advertisement -

आश्चर्याची गोष्ट म्हणजे वनशक्ती नावाची आरे वाचवण्यासाठी पुढे असणारी स्वयंसेवी संस्थेनेही रॉयल पामची जागा मेट्रो कारशेडसाठी योग्य आहे, अशी भलामण मेट्रो कॉर्पोरेशन आणि मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. आरेमध्ये कारशेड केल्यास राज्य सरकारचे सुमारे 6000 कोटी वाचतील, असे मेट्रोच्या वरिष्ठ अधिकार्‍यांंचे म्हणणे आहे. आरेतील कारशेड सोडून इतर कुठेही म्हणजे रॉयल पामच्या सुमारे 60 एकर जागेत अथवा कांजूरमार्गच्या खार जमिनीवर कारशेड नेल्यास मुंबईकरांवर 6000 कोटी भुर्दंड पडेल, अशी भीती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. तसेच चर्चगेट ते सीप्झ मेट्रो संपल्यानंतर खाली रेक कांजूरमार्गपर्यंत नेण्यासाठी अतिरिक्त टनेल आणि इंधन वाया जाणार असल्याने कांजूरमार्ग हा पर्यायही राज्य सरकारने रद्द केला आहे.

त्यामुळेच आरेतील कारशेडला होणारा शिवसेनेकडून विरोध पाहता हा नक्की मुंबईकरांसाठी आहे की तो बेगडी विरोध आहे, असा सवाल भाजपच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने ‘आपलं महानगर’कडे केला. त्यामुळे पर्यावरण, मुंबईच्या फुफ्फुसाची काळजी करण्याचा आव आणणारी शिवसेना रॉयल पामच्या जागेसाठी तर विरोध करीत नाही ना असा सवालही उपस्थित होत आहे. मेट्रो-३ प्रकल्प मुंबईतील वाढते ट्रॅफीक पाहता अतिशय महत्त्वाचा आहे. तो येत्या २०२१ साली पूर्ण होणार होता. मात्र त्याला होणारा विरोध पाहता हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी ३ ते ४ वर्षांचा अतिरिक्त कालावधी लागू शकतो. त्या दरम्यान मुंबईच्या ट्रॅफिक समस्येने गंभीर स्वरुप धारण केलेले असू शकते.

आरेला विरोध करणार्‍यांचे मनसुबे वेगळे-मुख्यमंत्री

आरेसाठी ज्या सूचना, हरकती मागवण्यात आल्या होत्या, त्यामध्ये बंगळुरू येथील एकाच कंपनीच्या आयपी अ‍ॅड्रेसवरून १३ हजारांपैकी १० हजार इतक्या हरकती आल्या होत्या. आरेमधील कारशेडला विरोध करणारे वेगळ्या मनसुब्याने काम करत आहेत का? हे तपासून पहावे लागेल. मेट्रो-३ च्या कारशेडला कांजूरमार्गच्या पर्यायी जागेची वारंवार मागणी होत आहे. त्यामधून मुंबईकरांचा मेट्रो प्रवास पावणेदोन पटीने महागणार आहे, आणि राज्यावर ६००० कोटींचा भुर्दंड पडणार आहे. असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मेट्रो-३ चे कारशेड आरे कॉलनी ऐवजी कांजूर येथे हलवले तर त्याचा फटका हा मुंबईकरांना तिकिटाच्या स्वरूपातच बसेल, असेही स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. सध्या मेट्रो-३ कारशेडसाठी झाडे कापण्याबाबत महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या परवानगीविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. राज्य सरकार आपली भूमिका या प्रकरणात मांडेल, असे सांगून पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी आपली आरे कारशेड डेपोच्या वृक्षतोडीला पाठिंबा देण्याची भूमिका जाहीर केली.

आरेत कोण, किती जागा वापरत आहे? (एकर)
मॉडर्न बेकरी १८
कोकण कृषी विद्यापीठ १४५.८०
फिल्म सिटी ३२९
महानंद डेरी २७
वॉटर कॉम्प्लेक्स (पवई) ६५

आरेमधील एकूण झाडांची संख्या ४.८ लाख
आरेमध्ये होणारी वृक्षतोडीची संख्या -२१८५
मेट्रो ३ साठी आवश्यक जागा -३० हेक्टर
पुनर्रोपण करण्यात येणार्‍या झाडांची संख्या- ४६१
पुनर्रोपण करण्यात आलेली झाडे -१०४५
नव्याने लावण्यात येणार असलेली झाडे -१३ हजार
आरेमध्ये आतापर्यंत झालेले जमीनीचे अधिग्रहण -३३३.५० हेक्टर
आरे कॉलनीची एकूण जागा -१२८१ हेक्टर
आरे कॉलनीतील विदेशी झाडांचे प्रमाण -४० टक्के

Sanjay Sawant
Sanjay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanjay/
आपलं महानगरचे संपादक, माय महानगरचे संस्थापक-संपादक. गेली २२ वर्ष पत्रकारितेत. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा दांडगा अनुभव. शिवसेना, महापालिका ते मंत्रालय, मुंबई आणि राजकारणावर सातत्याने लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -