घरमुंबईसुट्टीचा अर्ज करूनही वाशी विभाग अधिकारी निलंबित

सुट्टीचा अर्ज करूनही वाशी विभाग अधिकारी निलंबित

Subscribe

रीतसर सुट्टीचा अर्ज करून सुट्टीवर गेलेल्या विभाग अधिकार्‍याला महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी निलंबित केल्याने पालिका वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. विभाग अधिकारी सुट्टीवर आहेत, हे माहित असतानाही त्याची कल्पना आयुक्तांना न दिल्यामुळे आयुक्तांनी हा निर्णय घेतला. त्यामुळे हा प्रकार फक्त उपायुक्तांच्या हलगर्जीपणामुळे घडला असल्याचे वाशी विभाग अधिकारी महेंद्रसिंग ठोके यांनी म्हटले आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या कामाकडे दुर्लक्ष, नागरिकांच्या तक्रारी आणि आयुक्तांच्या पाहणी दौर्‍यादरम्यान कोणतीही सूचना न देता गैरहजर राहिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. ’माझा कोणताही दोष नसून माझी बाजू मी मांडली आहे, त्यामुळे मला योग्य तो न्याय मिळेल’, अशी अपेक्षा ठोके यांनी व्यक्त केली आहे.

शनिवार, ५ जानेवारी रोजी स्वच्छ भारत सर्वेक्षण अंतर्गत पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी वाशी विभागात स्वच्छतेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी वाशी रेल्वे स्थानक तसेच इतर महत्वाच्या ठिकाणी पाहणी केली. त्यावेळी त्यांना स्वच्छता समाधानकारक नसल्याची गंभीर बाब निदर्शनास आली. त्याचवेळी विभाग अधिकारीही उपस्थित नसल्याचे त्यांना दिसून आले. यावर त्यांनी उपायुक्तांकडे याची विचारणा केली असता, याबाबत आम्हाला काहीही माहित नसल्याचे सांगितले. यावर आयुक्तांनी नाराजी व्यक्त करत वाशी विभाग अधिकारी महेंद्रसिंग ठोके यांच्यावर कोणतीही सूचना न देता गैरहजर राहिल्याचा ठपका ठेवत थेट निलंबणाची कारवाई केली. त्याच दिवशी सकाळी सुट्टीवरून परतलेले ठोके १० च्या सुमारास विभाग कार्यालयात हजर झाले. मात्र त्यांना हा प्रकार समजला आणि त्यांनी नाराजी व्यक्त करत आपली बाजू मांडली. वाशी हा नवी मुंबईमधील अत्यंत महत्त्वाचा असा भाग आहे. वाशी डेपो, विष्णुदास भावे नाट्यगृह, शिवाजी चौक परिसर, वाशी चौपाटी, मिनी शी शोर, सेक्टर नऊचा मार्केट परिसर, सेक्टर १७ मधील व्यवसायिक संकुल, बाजार यांमुळे हा भाग नेहमी गजबजलेला असतो. या भागाकडे पालिकेला विशेष लक्ष द्यावे लागते. त्यामुळे आयुक्तांनी तडकाफडकी निर्णय घेतल्याने पालिका वर्तुळात खळबळ माजली आहे. यावर पालिका उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांना विचारले असता त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला.

- Advertisement -

पनवेल पालिका कर्मचार्‍यांची रविवारची सुटी रद्द
पनवेल महापालिकेत स्वच्छ सर्वेक्षण सुरू आहे. फारसा गाजावाजा न करता स्वच्छता सर्वेक्षणाची तयारी पनवेल महापालिकेने सुरू केली आहे. केंद्र सरकारच्या समितीचा पाहणी दौरा अचानक होणार असल्यामुळे तयारी करण्यासाठी कर्मचार्‍यांची हक्काची सुटी रद्द केली आहे. रविवारची सुटी रद्द करण्याचे परिपत्रक मुख्यालय उपायुक्तांनी शनिवारी काढले. जास्तीत जास्त नागरिकांच्या मोबाइलमध्ये स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी महापालिकेच्या कर्मचार्‍यांना उद्दिष्ट देण्यात आले होते. प्रत्येकाने ५० जणांच्या मोबाइलमध्ये अ‍ॅप डाऊनलोड करणे अपेक्षित आहे. हे काम पूर्ण होत असतानाच आता कर्मचार्‍यांना सुटीच्या दिवशीही कामावर बोलवण्यात येणार आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ सर्वेक्षण २०१९ च्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारच्या समितीचा पाहणी दौरा आहे. ही समिती महापालिकेला कोणतीही पूर्वसूचना न देता स्वच्छतेची पाहणी करणार असल्यामुळे पूर्वतयारीसाठी रविवारची सुटी रद्द करत असल्याचे परिपत्रक शनिवारी महापालिका मुख्यालयाचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी काढले होते.

शुक्रवारी मी एक दिवसाच्या सुट्टीवर गेलो असता तसा रीतसर अर्ज मी उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांच्या कार्यालयात दिला होता. दुसर्‍या दिवशी उशिरा कामावर हजर होईन याचीही कल्पना उपायुक्तांना देण्यात आली होती. त्यांनी त्यावर विचार करून माझी रजा नामंजूर केली असती तर मी गेलोच नसतो. त्यातच त्यांना आयुक्तांच्या पाहणी दौर्‍यात चुकीची माहिती देण्यात आल्याने आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे माझे म्हणणे मी आयुक्तांकडे मांडले आहे. यावर आयुक्त काय निर्णय घेतील हे पहावे लागेल.
– महेंद्रसिंग ठोके, विभाग अधिकारी, वाशी विभाग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -