घरमुंबईबिल्डरच्या चुकीची शिक्षा आम्हाला का? 'दोस्ती'च्या रहिवाशांचा सवाल

बिल्डरच्या चुकीची शिक्षा आम्हाला का? ‘दोस्ती’च्या रहिवाशांचा सवाल

Subscribe

दोस्ती बिल्डरच्या चुकीमुळे दुर्घटना घडली आहे. बिल्डरच्या चुकीची शिक्षा आम्हाला का? असा प्रश्न येथील रहिवाशांनी उपस्थित केला आहे. आमच्या सुरक्षेसाठी काय करायचे ते करावे, पण आमची घरे वाचवावीत अशी मागणी येथील रहिवाशांची आहे.

वडाळा दोस्ती एकर येथील लॉयड इस्टेट इमारतीजवळील रस्त्याचा भाग दोन दिवसांपूर्वी खचला होता. या इमारतीला धोका असल्याचे सांगत इमारत खाली करण्याच्या सूचना पालिकेने दिल्या आहेत. इमारत खाली केल्यास आम्ही रस्त्यावर येणार आहोत. दोस्ती बिल्डरच्या चुकीमुळे दुर्घटना घडली आहे. बिल्डरच्या चुकीची शिक्षा आम्हाला का ? असा प्रश्न येथील रहिवाशांनी उपस्थित केला आहे. आमच्या सुरक्षेसाठी काय करायचे ते करावे, पण आमची घरे वाचवावीत अशी मागणी येथील रहिवाशांची आहे.रस्ता खचलेल्या लॉयड इस्टेट इमारतीजवळ दोस्ती बिल्डरचे काम सुरू आहे. या ठिकाणी इमारतीचे बांधकाम करण्यासाठी बिल्डरने 40 फुटांहून खोल खड्डा खणला आहे. हा खड्डा खणताना गेले दीड ते दोन वर्षे आम्हाला त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत तक्रार करूनही बिल्डरवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. आम्ही पहाटे झोपेतून उठलो तेव्हा इमारती खालील जमीन खचल्याचे पाहिले. ही दुर्घटना पहाटे झाली म्हणून जिवीतहानी झालेली नाही. संध्याकाळी दुर्घटना झाली असती तर रहिवासी, लहान मुले या दुर्घटनेत जखमी किंवा मृत्युमुखी पडली असती, अशी भीती ब्लॉसम इमारतीमध्ये राहणाऱ्या सोनिया निर्लेकर यांनी व्यक्त केली.

दुर्घटनेनंतर इमारत पडण्याची भीती

बिल्डरच्या खोदकामामुळे जमीन भुसभुशीत झाली आहे. इमारतीचे पिलर वाकडे झाले आहेत, मीटर रूम खराब झाली आहे. मंगळवारी सायंकाळी पुन्हा जमीन खचली आहे. ही नैसर्गिक आपत्ती नसून मानवनिर्मित आपत्ती आहे. यामुळे बिल्डरवर कारवाई करण्यासाठी आम्ही तक्रार पालिका आणि पोलिसांकडेही दिली. मात्र त्याबाबत वेळीच कारवाई झाली नाही. असे निर्लेकर यांनी सांगितले. या दुर्घटनेनंतर इमारत पडण्याची भीती आहे. या ठिकाणी इमारतीभोवती सुरक्षा भिंत बांधावी, स्टिलचे रॉड लावावेत किंवा इतर काही उपाययोजना कराव्यात. मात्र आमची घरे वाचवावीत, अशी मागणी निर्लेकर यांनी केली. आम्हाला घरे रिकामी करा, असे पालिकेकडून सांगण्यात आले. आता आम्ही काय करणार? आमची यात काहीच चूक नाही, बिल्डरची चूक आहे. गेले दीड वर्षे आम्ही यासाठी भांडत आहोत. मात्र, पालिका किंवा संबंधित यंत्रणा कोणीही लक्ष देत नाही, अशी व्यथा स्वाती पंडित यांनी मांडली.

- Advertisement -

प्रकरण दडपले जात आहे

ज्या ठिकाणी खोदकाम सुरू आहे. तेथून ब्लॉसम इमारत जवळ आहे. इमारतीच्या पोडियमला धोका आहे. संरक्षक भिंत बांधली नसल्याने माती घसरली. येथील बेकायदा खोदकाम थांबवावे. तसेच रहिवाशांच्या जीवाशी खेळ करून या ठिकाणी उंच इमले बांधणे थांबवावे, असे रहिवासी विनय वत्स म्हणाले. तक्रार करूनही हे प्रकरण दडपले जात आहे. आज लॉयड इमारत रिकामी करायला सांगितली. येथील जमीन खचली तेथून लॉयड इमारतीपेक्षा ब्लॉसम इमारत या धोकादायक ठिकाणावरून जवळ आहे. आम्हाला या दुर्घटनेची जास्त भीती असल्याने भविष्यात ब्लॉसम आणि कार्नेशन इमारतही खाली करा असे सांगितले जाऊ शकते. अशी धास्ती येथील रहिवाशांना आहे, असे संगीता काशीद यांनी सांगितले. दरम्यान येथील रहिवाशांनी पालिकेच्या उप प्रमुख अभियंता (इमारत प्रस्ताव) शहर या कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी बिल्डरचे काम बंद करावे, लॉयड, ब्लॉसम इतर इमारतींची दुरुस्ती करावी, सुरक्षा भिंत का बांधली नाही ? ही दुर्घटना का घडली ? याचा तपास करावा इत्यादी मागण्या करण्यात आल्या. बिल्डरचे काम थांबवले आहे. संरक्षण भिंत बांधून देऊ, असे लेखी आश्वासन पालिका अधिकाèयांनी शिष्टमंडळाला दिले असल्याची माहिती संगीता काशीद यांनी दिली.

मोर्चाच्या राजकीय स्वरूपाला विरोध 

दोस्ती एकर येथील ब्लॉसम, कार्नेशन, लॉयड इस्टेटच्या रहिवाशांना न्याय मिळावा म्हणून काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात रहिवासी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते. रहिवाशांचा मोर्चा काँग्रेसने हायजॅक करण्याचा प्रयत्न केला. मात्र रहिवाशांनी त्याला विरोध केला. यामुळे काँग्रेसचे बॅनर आणि पोस्टर न वापरता काँग्रेसला मोर्चाला पाठिंबा द्यावा लागला.

- Advertisement -

उच्चभ्रू रहिवाशांचा दुसरा मोर्चा

मुंबईत उच्चभ्रू इमारतीमधील रहिवाशांचा हा दुसरा मोर्चा अलिकडच्या काळातला आहे. याआधी कॅम्पा कोला इमारतीमधील रहिवाशांनी आपले घरे वाचवण्यासाठी मोर्चा काढला होता. आपल्या मागण्यांसाठी वंचित घटकांचे अनेक मोर्चे निघतात. मात्र या मोर्चातील उच्चभ्रू रहिवाशांच्या सर्वच मागण्या मान्य झाल्या आहेत. तसा दिलासा सर्वसामान्यांना गिरणी कामगार, झोपडपट्टीधारक किंवा संक्रमणशिबिरातील रहिवाशांना मिळतो का, असा प्रश्न यानिमित्त विचारला जात होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -