घरमुंबईसर्पदंशमुक्त महाराष्ट्रासाठी ‘झिरो बाईट’ मोहीम

सर्पदंशमुक्त महाराष्ट्रासाठी ‘झिरो बाईट’ मोहीम

Subscribe

पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी साप बाहेर पडताना दिसून येतात. याची प्रचिती काही महिन्यापूर्वी मुंबईच्या लोकलमधील प्रवाशांना आली. महाराष्ट्रात दरवर्षी 35 हजारांपेक्षा अधिकजणांना सर्पदंश होतो. सर्पदंशामुळे होणारे मृत्यू व येणारे अपंगत्त्व यामुळे दरवर्षी अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असतात. सर्पदंशाचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारकडून फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. महाराष्ट्रातील सर्पदंशाचे प्रमाण शून्यावर आणून उद्ध्वस्त होणार्‍या कुटुंबांची संख्या रोखण्यासाठी ऑर्गनायझेशन फॉर वाईल्ड लाईफ स्टडीजने (ओऊल) ‘झिरो बाईट’ ही मोहीम हाती घेतली आहे.

महाराष्ट्रातील सर्पदंशाचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी ओऊलतर्फे चंद्रपूर, लातूर, भोर आणि उरण या चार तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर मोहीम राबवण्यात येत आहे. सर्पदंश झाल्यावर डॉक्टरकडे किंवा दवाखान्यात जाण्याऐवजी लोक देवदेवस्कीला प्राधान्य देतात. तसेच ग्रामीण भागात पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याने सर्पदंश झालेल्या अनेक व्यक्तींचा हॉस्पिटलला पोहचण्यापूर्वीच मृत्यू होतो. ग्रामीण भागातील अनेक डॉक्टरांना सर्पदंशावर कोणते उपचार करायचे याबाबत प्रशिक्षण मिळत नसल्याने त्या व्यक्तीला उपचार मिळण्यात अडचणी येतात. याबाबी लक्षात घेऊन ओऊलने ‘झिरो बाईट’ ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेतून गावागावात प्रबोधन करून नागरिकांना काय करावे याचे प्रशिक्षण व मार्गदर्शन करणे, सर्पदंश सुरक्षा दल निर्माण करणे, कमी वेळेत रुग्णाला रुग्णालयात कसे न्यावे, 108 अ‍ॅम्ब्युलन्स, खासगी वाहने, रिक्षा यांची व्यवस्था करणे तसेच डॉक्टरांसाठी दर सहा महिन्यांनी प्रशिक्षण शिबिर घेणे, प्रकल्पाच्या माध्यमातून सर्पदंशावरील औषधांचा साठा तालुका पातळीवर जमा करणे, हॉस्पिटलला औषधे उपलब्ध करून देणे आदी गोष्टी करण्यात येणार आहेत. सर्पदंशामध्ये दंश झालेल्या भागाला संसर्ग होऊन तो भाग दुर्बल होतो. त्यामुळे सर्पदंश झालेल्या व्यक्तीचा हात, पाय लुळा पडून अवयव निकामी होतो. सर्पदंशामुळे होणारे मृत्यू रोखणे तसेच त्यामुळे येणारे अपंगत्त्व रोखणे हेही या मोहिमेसमोर मोठे आव्हान असल्याचे मोहिमेचे प्रमुख गणेश मेहंदळे यांनी सांगितले.

- Advertisement -

राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार दरवर्षी 35 हजार जणांना सर्पदंश होत असला तरी यामध्ये मृतांचा आकडा अधिक आहे. परंतु सर्पदंश झालेले अनेक रुग्ण हॉस्पिटलला पोहचत नसल्याने त्यांची नोंदच होत नाही. त्यामुळे त्यांच्या मृत्यूची नोंद आकस्मिक आजाराने केली जात असल्याने सर्पदंशामुळे मृत्यू होणार्‍यांचा 100 टक्के आकडा कळणे अवघड असल्याचे गणेश मेहंदळे यांनी सांगितले.

कसा राबवणार प्रकल्प
सर्पमित्र हे परिसरात आलेल्या सापांना पकडून त्यांची सुटका करतात. त्यांना त्यांच्या भागातील सापांची ओळख असते. त्यामुळे सर्पमित्रांची मदत घेण्यात येणार आहे. सर्पमित्रांमुळे नागरिकांमध्ये मोहिमेबद्दल विश्वास निर्माण करणे शक्य होईल. ओऊलतर्फे समन्वयाची भूमिका पार पाडण्यात येत आहे. तसेच सर्पमित्रांना प्रसार, प्रचार साहित्य उपलब्ध करून देण्यात येते.

- Advertisement -

चार तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबवल्यानंतर त्यात येणार्‍या अडचणींचा अंदाज व अभ्यास करून अन्य राज्यात हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. संपूर्ण राज्यामध्ये हा प्रकल्प सुरू करण्यासाठी किमान पाच वर्षेे लागतील. पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाल्यानंतर मदतीसाठी सरकारकडे आम्ही संपर्क साधणार आहोत.
– गणेश मेहंदळे, स्ट्रक्चरल इंजिनियर.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -