घरमुंबईभाऊ दाजी वस्तुसंग्रहालयाची जागा ताब्यात घेण्यात टाळाटाळ

भाऊ दाजी वस्तुसंग्रहालयाची जागा ताब्यात घेण्यात टाळाटाळ

Subscribe

करार रद्द केल्यानंतरही संस्था ठाण मांडून शिवसेनेला विसर

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय (राणीबाग) येथील डॉ. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयाचा करार संपुष्टात आणण्याचा ठराव मंजूर होऊनही अद्याप ही जागा महापालिकेच्या ताब्यात आलेली नाही. अडीच वर्षे उलटत आली तरी ही जागा अद्यापही इंटक आणि जमनालाल बजाज फाऊंडेशनच्या ताब्यातच आहे. त्यामुळे करार रद्द करण्याचा ठराव मंजूर करूनही सत्ताधारी शिवसेना आणि प्रशासनाला याचा विसर पडला की काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय जमनालाल बजाज फाऊंडेशन आणि इंटक यांना देखरेख करण्यासाठी देण्यात आले आहे. संग्रहालयाच्या या व्यवस्थापनाबाबत बजाज फाऊंडेशन आणि इंटक तसेच महापालिका यांच्यात 16 जानेवारी 2003 मध्ये ठराव करण्यात आला होता.

- Advertisement -

परंतु, व्यवस्थापनाकडून संग्रहालयाच्या जागेचा गैरवापर केला जात असल्याने मनसेच्या तत्कालीन नगरसेविका समिता नाईक आणि मनसेचे महापालिका गटनेते संदीप देशपांडे यांनी करार रद्द करण्यासाठी महापालिकेच्या ठरावाचा फेरविचार करण्यात यावा, अशी मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. समिता नाईक यांची ठरावाची सूचना तीन वेळा फेटाळण्यात आल्यानंतर मनसे अध्यक्ष संदीप देशपांडे यांची याबाबतची ठरावाची सूचना मंजूर करण्यात आली. त्यामुळे बारा वर्षांपूर्वी केलेला करार रद्द करून याचे व्यवस्थापन महापालिकेच्या ताब्यात घेण्याचा मार्ग मोकळा झाला होता.मनसेच्या मागणीनुसार हा ठराव रद्द करण्यात आला होता. परंतु, ठरावाची सूचना मंजूर केल्यानंतर तत्कालीन महापौर स्नेहल आंबेकर, सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव आणि स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन वस्तुसंग्रहालयाच्या व्यवस्थापनाचा करार रद्द झाल्याची माहिती दिली. वस्रुसंग्रहालयाच्या व्यवस्थापनात महापौर अध्यक्ष आहेत. परंतु, महापौरांनाच विचारात घेतले जात नाही. महापालिकेची कोणतीही परवानगी घेतली जात नाही. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्यासाठी करार रद्द करून सुधारित करार करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले होते.

त्यामुळे पुन्हा याच संस्थेकडे व्यवस्थापन सोपवावे की अन्य संस्थेची नेमणूक करावी याचा निर्णय गटनेत्यांच्या बैठकीत घेतला जाईल,असेही तत्कालीन महापौरांनी स्पष्ट केले होते. परंतु, आजतागायत यावर गटनेत्यांच्या सभेत यावर निर्णय झालेला नाही ना हे व्यवस्थापन महापालिकेच्या ताब्यात आले.

- Advertisement -

महापालिका आणि बजाज फाऊंडेशन व आमच्याबरोबर झालेला करार अजून आहे. महापालिका म्हणतेय की करार संपण्यास एक वर्ष आहे आणि आमच्या म्हणण्यानुसार पाच वर्षे आहेत. यावर यावर तोडगा काढला जाईल. महापालिकेसोबत आमच्या संस्थांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्यावर सकारात्मक मार्ग निघेल. महापालिकेने हे वस्तुसंग्रहालय ताब्यात घेतले तरी त्यांच्याकडे तज्ज्ञ व्यक्ती नाहीत. त्यामुळे पुढे या म्युझियमसह त्यातील वस्तूंचे योग्यप्रकारे जतन व्हायला हवे.
– तसनीम मेहता, व्यवस्थापकीय विश्वस्त, भाऊ दाजी लाड वस्तूसंग्रहालय

मुळात बजाज फाऊंडेशन आणि इंटकच्या ताब्यातून भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय ताब्यात घेण्यासाठी करार रद्द करण्याचा ठराव केला. त्यानुसार ते ताब्यात घ्यायला हवे होते.परंतु, जे सत्ताधारी आमच्या मागणीनंतर ठराव मंजूर केल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन करार रद्द केल्याची घोषणा करतात, त्याच सत्ताधारी पक्षाने हे वस्तुसंग्रहालय ताब्यात घेऊन दाखवायला हवे होते. पण, तसे न करता एकप्रकारे शेपूट घालून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करताना दिसतात, हे दुर्दैवी आहे.
संदीप देशपांडे, सरचिटणीस-मनसे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -