घरनवी मुंबईकारवाईपूर्वीच डिझेल तस्करांचा छू बाल्या; शासकीय कर्मचार्‍यांकडून ‘टीप’?

कारवाईपूर्वीच डिझेल तस्करांचा छू बाल्या; शासकीय कर्मचार्‍यांकडून ‘टीप’?

Subscribe

समुद्र किनार्‍यापासून काही नॉटिकल मैल अंतरावर असणार्‍या जहाजांतील डिझेलची तस्करी करून त्याचा साठा केला जात असल्याची माहिती मिळताच कारवाईसाठी घटनास्थळी निघालेले तहसील कार्यालयाचे पथक तेथे पोहचण्यापूर्वीच कारवाईची कुणकूण लागलेल्या तस्करांनी छू बाल्या केल्याने या पथकाला हात हलवत परताव लागल्याचा प्रकार नवी मुंबई विमानतळबाधित क्षेत्रातील वाघीवली या ठिकाणी घडला आहे. दरम्यान, कारवाईची ‘टीप’ तहसीलच्या कर्मचार्‍यांकडूनच मिळाल्याची उघड चर्चा सुरू झाली असून, कारवाईचा तो केवळ ‘फार्स’ होता का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पनवेल:  दीपक घरत
समुद्र किनार्‍यापासून काही नॉटिकल मैल अंतरावर असणार्‍या जहाजांतील डिझेलची तस्करी करून त्याचा साठा केला जात असल्याची माहिती मिळताच कारवाईसाठी घटनास्थळी निघालेले तहसील कार्यालयाचे पथक तेथे पोहचण्यापूर्वीच कारवाईची कुणकूण लागलेल्या तस्करांनी छू बाल्या केल्याने या पथकाला हात हलवत परताव लागल्याचा प्रकार नवी मुंबई विमानतळबाधित क्षेत्रातील वाघीवली या ठिकाणी घडला आहे. दरम्यान, कारवाईची ‘टीप’ तहसीलच्या कर्मचार्‍यांकडूनच मिळाल्याची उघड चर्चा सुरू झाली असून, कारवाईचा तो केवळ ‘फार्स’ होता का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
देशातील सर्वात व्यस्त असणार्‍या जेएनपीए बंदरात येणार्‍या परदेशी जहाजांतील कर्मचार्‍यांशी संधान बांधून समुद्र किनार्‍यापासून दूर काही नॉटिकल मैल अंतरावर उभ्या राहणार्‍या या जहाजांतील डिझेल छोट्या बोटीत उतरवून खाडी मार्गाने तस्करी करण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून जोमात सुरू आहे. पोलीस, कोस्टल गार्ड यांना हुलकावणी देऊन ही तस्करी सुरू असल्याचा आभास निर्माण केला जात असला तरी त्याची माहिती दोन्ही विभागाच्या अधिकार्‍यांना असून, या अधिकार्‍यांच्या आशीर्वादानेच हे व्यवसाय राजरोसपणे सुरू असल्याची खुलेआम चर्चा परिसरात आहे. परदेशी जहाजातून जवळपास ३० रुपये लीटरने मिळणारे हे डिझेल बाजारपेठेत ज्यादा दराने विक्री करून महसूल बुडविण्याचे काम हे तस्कर करीत आहेत.
निर्माणाधीन नवी मुंबई विमानतळबाधित क्षेत्रात असलेल्या वाघीवली गावातील टाटा पॉवर हाऊसमागे असलेल्या खाडी किनार्‍यावर तस्करी करून आणण्यात आलेल्या डिझेलचा साठा करून वितरण केले जात आहे. काही वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकारची माहिती रायगडचे नव्याने आलेले जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांना मिळताच सदर ठिकाणी कारवाई करण्याचे निर्देश पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांना दिले. म्हसे यांच्या निर्देशानुसार गुरुवारी ९ फेब्रुवारी रोजी वाघीवली येथे कारवाईसाठी निघालेले तहसील विभागाचे पथक कारवाई स्थळी पोहचण्यापूर्वीच कारवाईची माहिती मिळाल्याने तस्कर आपल्या बोटींसह पसार झाल्याने पथकाच्या हाती काहीच लागले नाही. मात्र अशी कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने केली जात असताना घटना स्थळ आलबेल असल्याचा निर्माण करण्यात आलेला देखावा संशयाच्या भोवर्‍यात सापडला आहे.

पोलीस आयुक्तांचे दुर्लक्ष
नवी मुंबई पोलीस आयुक्तपदी मिलिंद भारंबे यांची नियुक्ती झाल्यानंतर आयुक्तालय हद्दीतील जवळपास सर्वच बेकायदेशीर धंदे बंद झाले आहेत आणि सर्वसामान्य जनतेनेही त्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. वाघीवली येथे सुरू असलेल्या प्रकाराची माहिती भारंबे यांना देण्यात आली होती. या माहितीनंतरही आयुक्तांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र जिल्हाधिकारी म्हसे यांनी संबंधित प्रकाराची तात्काळ दखल घेत करावाई करण्याचे निर्देश दिले.

- Advertisement -

तहसीलच्या काही कर्मचार्‍यांची साथ?
तहसील विभागातील काही कर्मचार्‍यांशी डिझेल तस्करांनी संधान साधले असून, हे कर्मचारीच कारवाईची माहिती तस्करांना देत असल्याची उघड चर्चा आहे. त्याचप्रमाणे डिझेल तस्करीत सक्रिय आलेल्या एका तस्कराचा नातेवाईक तहसीलदार कार्यालयात कार्यरत असल्याची खात्रीलायक माहिती प्रस्तुत प्रतिनिधीला मिळाली आहे.

शासकीय यंत्रणांचा आशीर्वाद?
भर समुद्रात उभ्या जहाजातून काढले जाणारे डिझेल छोट्या बोटीत भरून भरतीच्या वेळी खाडी मार्गाने पनवेलमध्ये आणले जाते. वाघीवली येथे बोटीतील डिझेल मोठ्या टाक्यांमध्ये भरले जाते. त्या नंतर ३५ लीटर क्षमतेच्या ड्रममध्ये भरून त्याचे अवैधरित्या वितरण केले जाते. दररोज जवळपास ३५ हजार लीटर डिझेलचा साठा आणला जात असल्याची माहिती असून, यात करोडो रुपयांची उलाढाल होत आहे. यामुळे या अवैध व्यवसायाला शासकीय यंत्रणांचा आशीर्वाद मिळत असल्याच्या चर्चेला पुष्टी मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -