घरपालघरडॉक्टरला मारहाण करणार्‍या मनसेच्या ९ जणांना अटक

डॉक्टरला मारहाण करणार्‍या मनसेच्या ९ जणांना अटक

Subscribe

मनसेचे पालघर जिल्हाप्रमुख समीर मोरे यांनी आपल्या समर्थकांसह बोईसर येथील एका डॉक्टरला बेदम मारहाण करीत रुग्णालयाची तोडफोड केली. या मारहाणीत डॉ. स्वप्नील शिंदे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी वापी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी मारहाण करणार्‍या समीर मोरे आणि त्यांच्या समर्थकांवर बोईसर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करून एकूण ९ जणांना अटक करण्यात आली आहे.

बोईसर येथील प्रसिद्ध शिंदे हॉस्पिटलचे डॉक्टर स्वप्नील शिंदे यांच्यावर शुक्रवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास मनसेचे पालघर (ग्रामीण) जिल्हाप्रमुख आणि नांदगावचे सरपंच समीर मोरे आणि त्यांच्या समर्थकांनी जीवघेणा हल्ला करीत प्रचंड मारहाण करीत रुग्णालयाची तोडफोड केली. शिंदे हॉस्पिटलमध्ये पूर्वी उपचार घेतलेल्या एका रुग्णाचे बिल कमी करण्यावरून समीर मोरे आणि डॉ. शिंदे यांच्यात वाद निर्माण झाला होता.

- Advertisement -

या वादात दोन दिवसांपूर्वी समीर मोरे यांनी डॉक्टरांना मारहाण केली होती. यानंतर डॉ. शिंदे यांनी बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. शुक्रवारी रात्री पुन्हा समीर मोरे आणि त्यांच्या समर्थकांनी शिंदे हॉस्पिटलमध्ये घुसून डॉ. स्वप्नील शिंदे आणि कर्मचार्‍यांना धक्काबुकी करून बेदम मारहाण केली. या मारहाणीत डॉ. शिंदे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी वापी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले.

डॉक्टरांना मारहाणीची ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाठ, नित्यानंद झा यांनी स्वत: बोईसर पोलीस स्टेशनला भेट देऊन मारहाणीच्या घटनेची तात्काळ दखल घेत आरोपींवर कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार बोईसरचे पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन पडळकर यांनी आरोपी समीर मोरे, उल्हास मोरे, मयूर पाटील, सिद्धेश महाले यांच्यासह एकूण ९ आरोपींविरोधात भादंवि कलम ३२६, १२०-ब, ४५२, १४३, १४६, १४७, १४९, ३२३, ५०४, ५०६ आणि महाराष्ट्र वैद्यकीय सेवा अधिनियम २०१० चे कलम ४ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

बोईसरमधील शिंदे हॉस्पिटलचे डॉ. स्वप्नील शिंदे यांना जबर मारहाण केल्याप्रकरणी सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. पालघर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्याची गंभीर दखल घेऊन संरक्षण देण्याची तसेच मारहाणीत सामील आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निवेदन दिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -