तीन पिढ्यांचा गीतकार जावेद अख्तर

जावेद अख्तर यांचे शब्द वडिलांना त्यांच्या काळातील प्रेमाची आठवण करून देतात, तर मुलाला प्रेमात पडायला भाग पडतात. जीवनात नाउमेद झालेल्या तरुणाला कधी ‘चले चलो’ म्हणत तर कधी ‘लक्ष्य को हर हाल में पाना है’ म्हणत प्रेरणा देतात. गेल्या २०-२२ वर्षांच्या कारकिर्दीत जावेद साहेबांनी ‘ओम शांती ओम’, ‘डॉन’, ‘जिंदगी मिलेगी ना दोबारा’, ‘रॉक ऑन’, ‘दिल धडकने दो’, ‘रईस’ यांसारख्या सिनेमांसाठी गाणी लिहिली. एक दोन नव्हे तर सिलसिलापासून ते आजवर त्यांनी तीन पिढ्यांना प्रेमाचे गीत दिले, म्हणून तर जावेद अख्तर केवळ बॉलिवूडचेच गीतकार नाहीत, तर ते तीन पिढ्यांचे गीतकार आहेत.

javed akhtar
लेखक जावेद अख्तर

काही गाणी लिहिली जातात आणि काही गाणी बनतात. किस्सा आहे एका अशाच गाण्याचा. गाण्याची ट्यून रेडी होती आणि संगीत दिग्दर्शक लक्ष्मीकांत गीतकार जावेद अख्तर यांना डमी शब्दांनी ट्यून समजावून सांगत होते. ते डमी शब्द होते, एक…दोन…तीन…चार…पांच…छह…सात…जावेद साहेबांना लक्ष्मीकांत यांची ही ओळ भावली आणि त्यांना एक ओळ सुचली, ‘तेरा करू दिन गिन गिनके इंतजार’ बस्स या एका ओळीवर एक गाणं लिहिलं गेलं, जे आजही लाखो चाहत्यांच्या ओठावर आहे. जावेद अख्तर म्हणजे बॉलिवूडमधील एक असं नाव ज्यांच्यापुढे संवाद लेखक, पटकथा लेखक, गीतकार अशी अनेक विशेषणं लावली जातात, पण एक गीतकार म्हणून त्यांनी लिहिलेली अशी अनेक गाणी आहेत, ज्यांनी काहींचं तारुण्य सुरेख केलं, तर अनेकांचं प्रेम मिळवून दिलं.

एक संवाद लेखक म्हणून एण्ट्री केलेल्या जावेद अख्तर यांना पहिल्यांदा गाणं लिहिण्याची संधी मिळाली ती १९८१ सालच्या ‘सिलसिला’ सिनेमासाठी. शिवकुमार शर्मा आणि हरिप्रसाद चौरसिया यांचाही हा पहिलाच सिनेमा होता. त्या सिनेमात लिहिलेलं हे गाणं आज रिल्सच्या माध्यमातून पुन्हा एकदा ट्रेंडिंगला आलं आहे. त्या गाण्याचे बोल आहेत…देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए. होय, हे जावेद अख्तर यांचं सिनेमासाठी लिहिलेलं पहिलं गाणं, ज्याने त्यांना प्रसिद्धी मिळाली. याच सिनेमात त्यांनी ‘ये कहाँ आ गए हम’ आणि ‘नीला आस्मान’ यांसारखी गाणीदेखील लिहिली होती.

१९८० ते १९९० च्या या १० वर्षांत जावेद साहेबांनी अनेक सुपरहिट गाणी लिहिली, ज्यांचं सिनेमा सुपरहिट करण्यात मोठं योगदान होतं. त्यातले काही सिनेमे तर असे होते, जे केवळ गाण्यामुळे लोकांच्या लक्षात राहतात. मशाल, दुनिया, सागर, अर्जुन, मिस्टर इंडिया, तेजाब, जमाई राजा यांसारख्या सिनेमांसाठी त्यांनी गीतकार म्हणून काम केलं. यातले तीन सिनेमे आणि त्यातली गाणी मला वैयक्तिक खूप जास्त आवडतात. ज्यात सागर, मिस्टर इंडिया आणि तेजाबच्या गाण्यांचा समावेश होतो. जावेद अख्तर हे एक उत्कृष्ट पटकथा लेखक आहेत. त्यांच्या गाण्यांच्या शब्दातूनदेखील तेच आपल्याला दिसतं. बर्‍याचदा कथेची मागणी किंवा मसाला म्हणून गाणी सिनेमात येतात, पण जावेद अख्तर यांनी ८० च्या दशकात लिहिलेली ही गाणी कथा पुढे नेण्यास मदत करणारी असायची. त्यांचं स्थान कथेत महत्त्वाचं असायचं. सागर सिनेमातलं डिंपल कपाडिया आणि ऋषी कपूर यांच्यावर चित्रित झालेलं सागर किनारे हे गाणं ऐकलं की आपल्याला त्याची प्रचिती येते.

काळासोबत जो बदलतो, ज्याला आजच्या पिढीत काय घडतंय याची जाण असते तो खरा कलाकार. जावेद अख्तर हे त्या मोजक्या गीतकारांपैकी आहेत, ज्यांना प्रत्येक पिढीच्या ओठावर आपले शब्द आणता येतात. त्यांच्या मनात काय चाललं आहे हे त्यांना कळतं. १९९० ते २००० दरम्यान त्यांनी लिहिलेली गाणी पाहिली की हे लक्षात येईल. तो काळ सर्वत्र रोमँटिक सिनेमे येण्याचा होता. शाहरूख, सलमान चॉकलेट हिरो बनत होते आणि तेव्हाच एक सिनेमा आला, १९४२ अ लव्ह स्टोरी. या सिनेमातलं एक गाणं आजही नवीन प्रेमवीरांसाठी त्याच्या भावना सांगणारं गाणं बनतं. त्या गाण्याची पण आपली एक कथा आहे. जावेद अख्तर यांनीच याबद्दल सांगितलं होतं, तर आधी एक ओळ सुचली आणि ती ओळ म्हणजे छोटं स्वप्न… ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा,’ ही ती ओळ. त्या ओळीशी प्रामाणिक राहत मग जे जे सुचलं ते ते या गाण्याचा भाग बनलं.

शेवटी रसिकांना मिळालं एक सुमधुर रोमँटिक गाणं, जे अजरामर झालं, पण जावेद अख्तर केवळ रोमँटिक लिहीत नाहीत, ते स्वप्नात काय घडतं याबद्दल लिहीत नाहीत, ते जितक्या आत्मियतेने प्रियकराची कथा मांडतात, तितक्याच आपलेपणाने सीमेवर असणार्‍या सैनिकाचीदेखील व्यथा आपल्या गाण्यातून मांडतात. १९९७ साली आलेल्या ‘बॉर्डर’ सिनेमात त्यांनी लिहिलेली गाणी हे त्याचंच उदाहरण. अनू मलिकसोबत त्यांनी जेव्हा ‘संदेसे आते है’ लिहिलं तेव्हा अनेकांच्या पापण्या ओल्या झाल्या. संदेसे आते हैं, हमें तड़पाते हैं, जो चिट्ठी आती है, वो पूछे जाती है, के घर कब आओगे, के घर कब आओगे, लिखो कब आओगे, के तुम बिन ये घर सूना सूना है। या ओळी आणि त्यानंतर येणारा प्रेयसीचा, आईचा उल्लेख सगळं काही अप्रतिम होतं. या दशकात त्यांनी दिलजले, विरासत, रूप की राणी चोरो का राजा, डुप्लिकेट, बादशाह यांसारख्या सिनेमांसाठी गाणी लिहिली. त्यातली बरीच गाणी प्रचंड गाजली.

जावेद यांच्या सिनेकारकिर्दीचा तिसरा टप्पा म्हणजे २००० ते आजवर. हा काळ अनेकदृष्ठ्या महत्त्वाचा होता. कारण रसिकांची टेस्ट इथं बदलली होती. रॅप कल्चर आणि दोन-अडीच मिनिटांत संपणारी गाणी असा हा काळ आहे, पण यातही त्यांनी आपण खास आहोत, आपल्याला या तरुण पिढीचा आवाज होता येतं हे दाखवून दिलं. २००१ साली आलेल्या ‘लगान’ सिनेमासाठी त्यांनी लिहिलेली गाणी असू देत किंवा त्यानंतर आलेल्या दिल चाहता है, मै हू ना, कल हो ना हो, लक्ष्य, वीर झरा आणि स्वदेससाठी लिहिलेली गाणी प्रत्येकाची आपली एक खासियत आहे. त्यांच्याकडे असलेले शब्द एकाच वेळी वडिलांना त्यांच्या काळातील प्रेमाची आठवण करून देतात, तर मुलाला प्रेमात पडायला भाग पडतात.

जीवनात नाउमेद झालेल्या तरुणाला कधी ‘चले चलो’ म्हणत तर कधी ‘लक्ष्य को हर हाल में पाना है’ म्हणत त्यांना प्रेरणा देतात. गेल्या २०-२२ वर्षांच्या कारकिर्दीत जावेद साहेबांनी ‘ओम शांती ओम’, ‘डॉन’, ‘जिंदगी मिलेगी ना दोबारा’, ‘रॉक ऑन’, ‘दिल धडकने दो’, ‘रईस’ यांसारख्या सिनेमांसाठी गाणी लिहिली, ज्यातील बरीच गाजली, पण त्या सगळ्यात विशेष एक गाणं ज्याचा उल्लेख करणं मला महत्त्वाचं वाटतं. त्या सिनेमाचं नाव ‘गली बॉय’ आणि त्या गाण्याचं नाव दुरी. हे एक रॅप साँग होतं, जे रॅपर डिवाईन आणि जावेद अख्तर यांनी लिहिलंय. देखा एक ख्वाब लिहिणारा गीतकार उत्तर रॅपदेखील लिहू शकतो हे जावेद अख्तर यांनी दाखवून दिलं. एक-दोन नव्हे तर सिलसिलापासून ते आजवर त्यांनी तीन पिढ्यांना प्रेमाचे गीत दिले, म्हणून तर जावेद अख्तर केवळ बॉलिवूडचेच गीतकार नाहीत, तर ते तीन पिढ्यांचे गीतकार आहेत.