घरपालघरउज्ज्वला गॅस योजना लाभार्थ्यांच्या मुळावर?; सातत्याने गॅस दरवाढीमुळे योजना फेल

उज्ज्वला गॅस योजना लाभार्थ्यांच्या मुळावर?; सातत्याने गॅस दरवाढीमुळे योजना फेल

Subscribe

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत ग्रामीण भागात घरोघरी गॅस आला. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांची चुलीच्या धुरापासून मुक्ती मिळाली. मात्र, गॅस सिलेंडरच्या किंमतीत भरमसाठ दरवाढीमुळे मोखाडा तालुक्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत. महागाईने सर्वसामान्य, गोरगरीब जनतेचे कंबरडे मोडले असताना त्यात गॅस सिलेंडरच्या एकाच महिन्यात तब्बल ५० रुपयांनी वाढलेल्या दराने सर्वसामान्य लोक हैराण झाले आहेत. सरकारी योजनाच आता गरिबांच्या मुळावर उठल्या आहेत का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने चूलमुक्त भारताचे स्वप्न साकारण्यासाठी गोरगरीब लाभार्थ्यांना उज्ज्वला योजनेंतर्गत फक्त शंभर रुपयांत गॅस कनेक्शनचे वाटप केले. मात्र, मागील दीड वर्षात गॅस सिलिंडरच्या किमती साडेनऊशे रुपयांवर पोहोचल्या आहेत. त्यामुळे गोरगरीब लाभार्थ्यांना गॅस सिलिंडर भरून घेणे अवघड झाले आहे. गॅस सिलेंडरच्या दरवाढीमुळे ही योजना फसली असल्याचे चित्र दिसत असून महिला पुन्हा चुलीकडे वळल्याचे वास्तव ग्रामीण भागात पहायला मिळत आहे.

उज्वला योजनेतून सिलेंडर मिळाल्याने सुरुवातीला खूप आनंद झाला होता. मात्र, नियमितपणे वाढत जाणारी महागाई चिंतेची बाब ठरत आहे. त्यात आता गॅस सिलेंडरचे दर वाढत असल्याने गॅस वापरणे अवघड झाले आहे. महागडा गॅस परवडत नसल्याने पुन्हा चुलीचा वापर करावा लागत आहे.
– माया पाटील, गृहिणी (लाभार्थी), पाथर्डी

- Advertisement -

मागील दीड वर्षांपासून गॅस सिलेंडरच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. यामुळे सर्वसामान्यांचे बजेट आवाक्याबाहेर गेले असून किचनमधील बजेट बिघडले आहे. दर महिन्याला ९६०.५० रुपये महागाईचा सिलेंडर भरावा कसा?, असा सवाल केला जात आहे. महागाईबरोबरच दिवसेंदिवस गॅसची भाववाढ सातत्याने सुरू असल्याने ग्रामीण कुटुंबाना गॅस भरणे कठीण झाले. त्यामुळे सातत्याने सिलेंडरच्या किंमतीत वाढ होत असल्याने ग्रामीण भागातील महिलांकडून पुन्हा चूल पेटवणे सुरू झाले आहे. स्वच्छ इंधन, बेहतर जीवन असा नारा देत केंद्र शासनाने प्रधानमंत्री उज्वला योजनेंतर्गत देशातील दारिद्र्य रेषेखालील गरीब, गरजू महिलांना मोफत घरगुती एलपीजी गॅस उपलब्ध करून देत महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. मात्र, सद्यस्थितीत पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात गॅस सिलेंडरच्या दरात चालू आर्थिक वर्षात भरमसाठ दरवाढ झाल्याने मोलमजुरी करून हातावर पोट भरणाऱ्या महिलांना महिना काठी ९६०.५० पर्यंत रुपये भरून गॅस सिलेंडर खरेदी करणे जिकरीचे होऊन गेले असून महागाईमुळे सिलेंडरचे आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे शासनाची धुरमुक्त योजना फोल ठरली आहे.

कोविड काळापासून सबसिडीची प्रतिक्षाच

गेल्या दोन वर्षांपासून सिलेंडरचे दर तर वाढतच आहेत. परंतु, उज्वला योजनेतून लाभार्थ्यांना मिळणारी सबसिडी गायब झाली आहे. कोविडच्या कालावधीमध्ये गायब सबसिडीच्या लाभार्थी प्रतीक्षेत असून गॅस सिलेंडर दरवाढीने गरीब, आदिवासी जनता हैराण झाली आहे. ना गॅस सबसिडी त्यात प्रचंड महागाई यामध्ये ग्रामीण गोरगरीब, आदिवासी जनता भरडली जात आहे.

- Advertisement -

महिनातील सिलेंडर दरवाढ 

  • जानेवारी – ९१०.५०
  • फेब्रुवारी – ९१०.५०
  • मार्च – ९६०.५०
  • एप्रिल – ९६०.५०

तालुक्यातील गॅस सिलेंडर जोडणी

  • उज्वला योजना लाभार्थी – ५६३०
  • सर्वसाधारण – १०४७८

(ज्ञानेश्वर पालवे – हे मोखाड्याचे वार्ताहर आहेत.)

हेही वाचा –

शरद पवार बिनचिपळ्यांचे नारद- प्रकाश महाजन यांचा घणाघात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -