घरपालघरबोईसरमध्ये दूषित पाण्यामुळे नागरिक त्रस्त

बोईसरमध्ये दूषित पाण्यामुळे नागरिक त्रस्त

Subscribe

साधारण महिनाभरापासून येथील भंडारवाडा आणि वर्तक गल्ली भागातील नागरिकांना सकाळी सोडलेल्या पिण्याच्या पाण्याला भयंकर दुर्गंधी येत आहे.

सफाळे: मागील महिनाभरापासून बोईसर ग्रामपंचायत हद्दीतील भंडारवाडा आणि वर्तक गल्ली भागात दूषित पाण्याच्या समस्येने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळी सोडण्यात येणार्‍या पिण्याच्या पाण्याला भयंकर दुर्गंधी येत असून सुमारे २५ ते ३० जणांना उलट्या, जुलाबाची लागण लागून तब्बेत खालावल्याने दवाखान्यात उपचारासाठी दाखल करावे लागले होते. यासंदर्भात, स्थानिकांनी वारंवार बोईसर ग्रामपंचायतमध्ये लेखी तक्रार करूनही कोणतीच उपाययोजना न केल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पालघर तालुक्यात बोईसर ग्रामपंचायत महत्त्वाची आणि मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. वाढत्या नागरीकरणामुळे ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतरित करण्याची वारे जोमाने वाहत आहेत. मात्र असे असतानाही आजही ग्रामपंचायत हद्दीतील नागरिक विविध समस्यांनी ग्रासलेले आहेत.साधारण महिनाभरापासून येथील भंडारवाडा आणि वर्तक गल्ली भागातील नागरिकांना सकाळी सोडलेल्या पिण्याच्या पाण्याला भयंकर दुर्गंधी येत आहे.

या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे या भागातील वयोवृद्ध तसेच लहान मुलांना उलट्या आणि जुलाबाची लागण लागली होती. त्यामुळे काही रुग्णांना खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करावे लागले होते. दूषित पाण्याच्या समस्येमुळे त्रस्त असणार्‍या नागरिकांपैकी काहींनी ग्रामपंचायत कार्यालयात वारंवार तक्रार केली. मात्र, यादरम्यान काही ठिकाणी खोदकाम करून केवळ थातूरमातूर कारभार बोईसर ग्रामपंचायतीकडून होत असल्याने या समस्येकडे गंभीरतेने घेतले नसल्याचेच दिसून येते. परिणामी, नागरिकांना पिण्यासाठी बाहेरून विकत पाणी घेण्याची वेळ ओढवली आहे. अशातच सकाळच्या वेळी संसाराचा गाढा उरकून नोकरीनिमित्त बाहेर पडणार्‍या महिलावर्गाची मात्र पाण्याच्या समस्येमुळे भयंकर फरफट होत आहे. निदान आतातरी दुर्गंधीयुक्त पाण्याच्या समस्येवर ग्रामपंचायत ठोस उपाययोजना करणार की, एखाद्याचा दूषित पाण्यामुळे जीव जाण्याची वाट पाहणार? असा संतप्त सवाल येथील नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात, बोईसर ग्रामपंचायतीचे उपसरपंच निलम संखे यांच्याशी दूरध्वनी द्व्यारे संपर्क करण्याच्या प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -