घरपालघरपद वाटपाच्या चिखलातून कमळ कसे फुलणार ?

पद वाटपाच्या चिखलातून कमळ कसे फुलणार ?

Subscribe

या नाराजांनी वरिष्ठ पातळीवरील नेत्यांची भेट घेऊन आपली खंत त्यांच्याजवळ व्यक्त केली होती. विधानसभा-लोकसभा निवडणुकीत या नव्या कार्यकारिणीतील पदाधिकारी प्रभाव पाडू शकणार नाहीत, असे मत अनेकांनी त्यावेळी वरिष्ठांजवळ व्यक्त केले होते.

वसईः अल्पसंख्याक मोर्चा कार्यकारिणी व शहर मंडळ कार्यकारिणीची निवड करताना पुन्हा एकदा सक्रिय व महत्त्वाच्या कार्यकर्त्यांना बेदखल करण्यात आल्याने वसई भाजप कार्यकर्त्यांतील धुसफूस वाढली आहे. मराठा समाजासह अल्पसंख्याक मोर्चा कार्यकारिणीत इतर समाजातील कार्यकर्त्यांना स्थानच नसल्याने अनेक पदाधिकार्‍यांनी वरिष्ठांविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. वसई-विरार महापालिकेसह पालघर लोकसभा व वसई, नालासोपारा व बोईसर या तीन विधानसभांच्या निवडणुका लक्षात घेऊन मागील महिन्यात वसई भाजप जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली होती. या निवडीदरम्यान, जिल्हाध्यक्ष पदासाठी दावेदार असलेल्या अनेकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले. तर काहींची विधानसभा संघटक म्हणून वर्णी लावून त्यांच्या घोडदौडीला लगाम घातला गेला. अन्य पक्षांतून भाजपमध्ये आलेल्यांनाही बेदखल करत त्यांचा ‘स्वाभिमान दुखावला गेला. जिल्हा कार्यकारिणीच्या निवडीत मराठा समाजातील पदाधिकार्‍यांनाही जाणीवपूर्वक डावलण्यात आले. या नाराजांनी वरिष्ठ पातळीवरील नेत्यांची भेट घेऊन आपली खंत त्यांच्याजवळ व्यक्त केली होती. विधानसभा-लोकसभा निवडणुकीत या नव्या कार्यकारिणीतील पदाधिकारी प्रभाव पाडू शकणार नाहीत, असे मत अनेकांनी त्यावेळी वरिष्ठांजवळ व्यक्त केले होते.

अनेक पदाधिकार्‍यांच्या नाराजीवर वरिष्ठ योग्य तो निर्णय देऊ शकलेले नाहीत. या सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा वसई शहर मंडळ व अल्पसंख्याक मोर्चा कार्यकारिणी जाहीर झाली आहे. मात्र या कार्यकारिणीतही अनेक सक्रिय कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आले असल्याची भावना भाजप कार्यकर्त्यांत निर्माण झाली आहे. अल्पसंख्याक मोर्चा कार्यकारिणीतील पदाधिकार्‍यांची निवड करताना इतर समाजाला डावलण्यात आल्याने भाजपच्या सर्वसमावेशक राजकारणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहे.

- Advertisement -

वादग्रस्त कार्यकर्त्यांची पुन्हा निवड?

काही पदाधिकारी ‘मराठा आरक्षणासाठी आंदोलने करतात म्हणून त्यांना जिल्हा कार्यकारिणीबाहेर ठेवण्यात आले आहे. भाजपच्या या भूमिकेमुळे पालघर जिल्ह्यातील 30 टक्के मराठा समाजाची नाराजी भाजपला ओढवून घ्यावी लागणार आहे. दरम्यान, शहर मंडळ कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी स्थगिती देण्यात आलेल्या वादग्रस्त कार्यकर्त्यांची पुन्हा निवड करून सामान्य जनतेच्या विश्वासाला वसई भाजपने तडा दिला असल्याचे मत वसई-विरारकरांनी व्यक्त केले आहे. वसई भाजपची सहाऐवजी आता दहा शहर मंडळे झाली आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -