घरपालघरखडकोली ग्रामस्थांचा खदाणीला विरोध; ब्लास्टिंगमुळे भीतीचे वातावरण

खडकोली ग्रामस्थांचा खदाणीला विरोध; ब्लास्टिंगमुळे भीतीचे वातावरण

Subscribe

तालुक्यातील सफाळे पूर्वेकडील खडकोली गावातील या प्रकल्पासाठी सुरू केलेल्या दगड खाणीतील ब्लास्टिंगमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मुंबई-वडोदरा एक्सप्रेस वेसाठी लागणार्‍या गौण खनिजासाठी पालघर तालुक्यात बेसुमार खदाणी सुरू केल्या आहेत. तालुक्यातील सफाळे पूर्वेकडील खडकोली गावातील या प्रकल्पासाठी सुरू केलेल्या दगड खाणीतील ब्लास्टिंगमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. खाण सुरू करण्यासाठी दिलेला ना हरकत दाखला बेकायदेशीर असून तक्रारीनंतरही खाणीतून दगडाचे उत्खनन सुरूच असल्याने संतप्त गावकर्‍यांनी खाणीचा रस्ता रोखून धरला होता. पोलिसांच्या मध्यस्थी नंतर ग्रामस्थांनी माघार घेतली.

बेकायदा पद्धतीची ना हरकत दाखला घेऊन गावातील नैसर्गिक साधन संपत्तीचा र्‍हास सुरू आहे. शेतकर्‍यांवर ही त्याचा थेट परिणाम जाणवून येतो खदान बंद केल्याशिवाय पर्याय नाही. अन्यथा गावाचे मोठे नुकसान होईल.
– मिलिंद मुदेकर, तक्रारदार ग्रामस्थ, खडकोली

- Advertisement -

खडकोली गावातील गट क्रमांक १८७, १८५, १७७ अ, १७७ ब, या जमिनीवर दगड काढण्याचे काम सुरू केले असून लगतचा नैसर्गिक नाला बुजवण्यात आला आहे. खाणीचा पोहोच रस्ता वन विभागाच्या जागेतून जात असतानाही वनविभागाची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. या ठिकाणी बांधण्यात आलेली विहिर ही नष्ट करण्यात आली आहे. दगड खाणीत होत असलेल्या उच्च क्षमतेच्या ब्लास्टिंगमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. खाणीतील सुरुंग स्फोटामुळे ग्रामस्थांच्या जीवाला धोका असल्याने दगड खाण बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय महसूल अधिकारी, तहसीदार, ग्रामपंचायत केली आहे.

खडकोली-वसरे ग्रामपंचायत ही पैसा ग्रामपंचायत असून याठिकाणी कोणतेही काम करताना ग्रामसभेची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे. तसेच नागरिकांचा या कंपनीला विरोध असतानाही कायद्याचे उल्लंघन करून नाहरकत दाखला दिला असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
– परशुराम चावरा, ग्रामस्थ

- Advertisement -

जीआर इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीमार्फत खडकोली येथील उत्खननाचे काम सुरू आहे. राजरोसपणे कोणत्याही सुरक्षा साधनांशिवाय बोर ब्लास्टिंग सुरू आहे. या ब्लास्टिंगमुळे संपूर्ण गावात हादरे बसत असून नागरिक भितीच्या छायेखाली आहेत. या ब्लास्टिंगमुळे खदानीतील खडी सदृश्य माती आजूबाजूच्या परिसरात कडून भात शेतीचे व बागायतीचे नुकसान होत आहे. येथे असलेल्या मोगरा शेतीवर सिमेंट सदृश्य माती पसरल्याने मोगर्‍याचे नुकसान झाल्याचे आदिवासी शेतकर्‍यांनी म्हटले आहे. गावाला मोठमोठी स्वप्ने दाखवून या कंपनीने खदान सुरू केली व त्यानंतर या स्वप्नांचा भंग केला. याचबरोबरीने गावाचे पर्यावरण बिघडवण्याचे कामही या कंपनीमार्फत राजरोसपणे सुरू आहे. त्यामुळे येथे असलेले खदानीचे काम तात्काळ बंद करावे, अशी मागणी शेकडो ग्रामस्थांनी केली आहे.

मंडळ अधिकारी यांच्याकडून संबंधित प्रकरणात चौकशी केली जाईल. याचबरोबरीने नियमांची पायमल्ली केली असल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल.
– सुनील शिंदे, तहसीलदार, पालघर

जीआर इन्फ्रा व बी. एल. अग्रवाल इन्फ्रा या कंपनीने खडकोली गावातील आदिवासी खातेदाराच्या शेतजमिनीतून दगड उत्खननाला २६ फेब्रुवारी २०२१ रोजी गणसंख्येअभावी रद्द झालेल्या ग्रामसभेच्या प्रोसेडिंगमध्ये फेरफार करून ग्रामस्थांची दुबार नावे आणि खोट्या सह्यांच्या आधारे कोरम पूर्ण झाल्याचे भासवून दगड उत्खननाला परवानगी असणारा ठराव संमत करण्यात आला होता.

हेही वाचा –

कोरोना संसर्ग वाढत असलेल्या राज्यांत चाचण्यांचा वेग वाढवा, केंद्राचे राज्यांना निर्देश

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -